नाना पाटेकर यांच्या एका गाजलेल्या चित्रपटातील त्या  चित्रपटाहून गाजलेला त्यातील एक संवाद एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है!...

मच्छर व तो मारण्यासाठी टाळ्या वाजवण्यासारखी येणारी हतबलता त्यातून अधोरेखित झाली होती त्यात मच्छर व आदमी यातून पुरूषार्थाचाही पंचनामा होतो… एक मच्छर औरत को असं काही नव्हतं! त्यामुळे यातील प्रखर वास्तव अनेकांना झोंबू शकते.

आता हे आठवण्याचे वा लिहिण्याचे कारण की एक अकेला सबपे भारी या चिरपरिचित एकपात्री प्रयोगाची जागा कधी नव्हे ती अचानक बदलण्यात आली. आधी देवाच्या आळंदीत होणारा प्रयोग ऐनवेळी चोराच्या आळंदीत ठेवला गेला. आता कुणी म्हणेल देवाची असो की चोराची; आळंदी तर आहे ना! गंमत म्हणजे प्रयोग स्थळ बदलण्याचे कारण सबपे भारी प्रयोगकर्मींवर कुणीतरी हल्ला करण्याचे षडयंत्र रचत होते. याहून गंमतीदार गोष्ट म्हणजे षडयंत्र रचणाऱ्या महिला होत्या व त्या प्रयोगकर्मींचे दातांनी चावा घेणार होत्या! हे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच चावा घेण्यासारखे झाले. एव्हाना देशास कळून चुकलेय देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीस आहे. तेही एकतर्फी. म्हणजे ती व्यक्तीच बोलेल, बोलेल, बोलेल व बोलतच राहिल. इतरांनी ऐकत, ऐकत, ऐकत, ऐकतच रहावे.

जागा बदलली तरी हातखंडा प्रयोग नेहमीप्रमाणे सर्वार्थाने बेफाम झाला. गेल्या दहा अकरा वर्षात हा बेफाम प्रयोग आता बेफामपणाच्या सर्व मर्यादा ओलांडत बेभान, बेफिकिर, बेशिस्त अशी ब ची बाराखडी चढत्या भाजणीत वाढत गेलीय. माझीच संहिता, माझाच आवाज, माझेच प्रेक्षक, माझेच हशे, माझ्याच टाळ्या. एकपात्री प्रयोगाची ही वाढती नशा मग एक मच्छर खाडकन खाली उतरवतो!

हे असं सारं गोष्टीरूप प्रतिकात्मक वगैरे वगैरे लिहिण्याच कारण की देशातलं आजचं वातावरण. विरोधी पक्ष नेता सरकारबद्दल काही लिहून आलेलं संसदेत वाचू पहातो तर सत्ताधारी त्याला वाचूच देत नाहीत.

आजवर न बोलू देण्यासाठी असंसदीय शब्दांचा वापर किंवा व्यक्तिगत असभ्य टीका इत्यादी गोष्टी कारणीभूत ठरत. तरीही विरोधी पक्ष अगदी नाव घेऊन कधी थेट कधी उपरोधिक बोलत टिका करत.


आठवा नेहरू पंतप्रधान आणि विरोधक वाजपेयी. आठवा इंदिराजी पंतप्रधान विरोधक कम्युनिस्ट
, समाजवादी आणि जनसंघही. आठवा पंतप्रधान राजीव गांधी विरोधक चंद्रशेखर, पुढे व्ही. पी. सिंह व इतर. आठवा व्ही. पी. पंतप्रधान विरोधक भाजपायी. आठवा पंतप्रधान नरसिंहराव विरोधक भाजपायी. आठवा पंतप्रधान अटलबिहारी विरोधक लालू, मुलायम, सोनिया, शरद पवार, कम्युनिस्ट. आठवा पंतप्रधान मनमोहन विरोधक लालकृष्ण अडवाणी, जेटली, सुषमा स्वराज.

आठवा आरोप प्रत्यारोप, खंडन मंडन. भाषेचा वापर संसदीय आयुधे व माध्यमांची धार. माध्यम कायम विरोधी पक्षाचीच भूमिका बजावत आलेली. न्यायपालिका पंतप्रधानांना दंडित करत होती व निवडणूक आयुक्त शेषन सत्तेलाही घाबरत नव्हते. ना सत्ता त्यांना कह्यात ठेवत होती. आणीबाणीने देशाचा तुरूंग केला तो जनतेनेच तोडला. सत्ताच्च्युत केले अहंकाराला. पण नवे सत्ताधीश बेबंद होताच पुन्हा आणीबाणीचा गुन्हा विसरून जनता पुन्हा इंदिराजींकडे गेली. लोकशाहीचे हे विभ्रम याच मातीतले.

न्यायपालिका, निवडणूक आयोग, मुख्यत: माध्यमे सत्ताधीशांसाठी कायमच धास्तीची कारणे तरीही देशाने तीन युध्दे जिंकली. अणुचाचण्या केल्या, उपग्रह सोडले, हरित, दुग्ध क्रांती केली, अवकाशात भरारी घेतली, संगणक युग अवतरले, माध्यम तंत्रज्ञान क्रांती झाली. दोन पंतप्रधान शहिद झाले तरी अराजक न होता लोकशाहीच टिकली.

स्मृतिभंश झाल्यासारखे आजचे सत्ताधीश बेबंदपणे कसेही वागतात, बोलतात तेव्हा त्यांच्या मुखवट्याआडचे हिडिस हुकूमशहा दिसू लागतात. अशावेळी सारे चिडीचूप होत असताना अबोध बालकच म्हणू शकतो ना राजा नागवा आहे!

अबोध बालक व नागव्या राजाचे रूपक आता एक मच्छर आदमी को…. असं रूपक बनून येते.

ताजा कलम

पुण्यात आदित्य बिर्ला फाऊंडेशनने एक सर्वेक्षण केले त्यात ५ पैकी ४ पुणेकर मनोविकाराने ग्रस्त आहेत अशी आकडेवारी जारी केलीय. हे ठिकच. पण पुणेकरांमुळे उर्वरित महाराष्ट्र किती मनोविकाग्रस्त होतो याचेही सर्वेक्षण झाले तर महाऱाष्ट्राच्याच मानसिक आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे नाही काय?

संजय 

पवार