तर लिहिण्यास कारण की, अचानकच
आमच्यासमोर ‘समकक्ष’ नावाचा शब्द येऊन उभा ठाकला. नंतर कळले कॉंग्रेस प्रदेक्षाध्यक्षांनी
टिपू सुलतान छत्रपती शिवाजी महाराजांना ‘समकक्ष’ समजावे असे म्हटले. असे ते
म्हणण्यास कारण मालेगाव पालिकेत उपमहापौर दालनात टिपू सुलतानची प्रतिमा लावली. त्यावर
गदारोळ होताच प्रशासनाने ती काढून टाकली. त्यावरची प्रतिक्रिया देताना हा ‘समकक्ष’
शब्द आला. तो येताच मुख्यमंत्री संतापले त्यांनी पूर्ण कॉंग्रेसवरच छत्रपतीविरोधी
पर्यायाने देशद्रोही ठरवले. त्यांचे कार्यकर्ते तर १० लाखांचे बक्षिस
प्रदेशाध्यक्षांची जीभ छाटून आणून देणाऱ्यास जाहीर करून बसले. हे असे इनाम जाहीर करणे
भारतीय दंड संहितेच्या कुठल्या कलमाशी ‘समकक्ष’ बसते वा ठरते काय?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या
समकक्ष टिपू सुलतान होता की नाही हे कसे मोजायचे? हा प्रश्न पडायचे कारण की, महाराज मुघलांशी लढून स्वराज्याचे निर्माते. तर
टिपूने इंग्रजांशी लढून म्हैसूर प्रांती सुलतानी स्थापित केली. टिपू निझाम व
इंग्रजांना मदत करणाऱ्या पेशव्यांशी एकाच वेळी लढत होता. हे करताना तो पुण्यश्लोक
अहिल्याबाई होळकरांना आदरपूर्वक सन्मानित करत होता, बोटात
श्रीराम कोरलेली अंगठी परिधान करत होता. पुढे इंग्रजांनी टिपूसह पेशव्यांनाही
संपवत भारतावर १५० वर्षे राज्य केले. १८५७ च्या बंडानंतर इंग्रजाविरूध्द निर्णायक
स्वातंत्र्य लढा लढला गेला तो कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली. त्याच कॉंग्रेसला
देशद्रोही ठरवणारे फडणवीस ज्या पक्षात आहेत तो पक्ष, त्यांची
विचारधारा ही इंग्रजविरोधात न लढता उलट त्यांना पाठिंबा देणारी होती.
तर फडणवीस इंग्रज विरोधी कॉंग्रेस
व टिपू यांना तरी समकक्ष मानतील का? आणि रास्वसं ही जनसंघ, भाजपची मातृसंघटना हे भारतीय
स्वातंत्र्यलढाईविरोधी म्हणून ‘समकक्ष’ समजतील? हा लढा महात्मा
गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वावर चालणारा असल्याने त्यांनी वा त्यांच्या
अनुयायांनी कधी स्वातंत्र्यलढाविरोधकांची जीभ छाटा वगैरे फतवे काढले नाहीत. ही
विवेकबुध्दी विचार-विरोध विचाराने हे खंडन मंडन परंपरेच्या ‘समकक्ष समजतील का
सन्मा. मुख्यमंत्री?
आता थोडे ९० च्या दशकात जाऊ. असे
जाण्यास कारण की, तेव्हा सरकारी दुरदर्शन वाहिनीवर ‘द स्वोर्ड ॲाफ टिपू सुलतान’ ही
जवळपास ६० भागांची मालिका भारतभर प्रसिध्दी पावली होती. इंग्रजांविरूध्द लढलेला
लढवय्या म्हणून संपूर्ण भारताने ती मालिका पाहिली. याच मालिकेच्या सेटला भयंकर आग
लागली ज्यात निर्माता / अभिनेता संजय
खानही गंभीर होरपळला. तेव्हा इतर जखमी व मृत कलाकार, तंत्रज्ञ, कामगारांप्रति देश संवेदनशीलतेने व्यक्त
झाला. तेव्हा भाजप राजकारणात सक्रिय होता पण तेव्हा कुणीही देशद्रोही ठरला नाही ना
कुणाची जीभ छाटण्यासाठी इनाम लागले. कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपने
टिपू सुलतानाप्रति कधी व कसा आदर व्यक्त केला हे सप्रमाण दाखवून आजचे मालेगाव
उपमहापौर व भाजप कसे समकक्ष आहेत, हे दाखवून दिलेच आहे. हा इतिहास भाजप नाकारू
शकेल?
भाजप निर्विवाद छत्रपती शिवाजी
महाराजांप्रति अतिव आदर सादरकर्ता पक्ष आहे. मात्र याच भाजपचे केंद्रात आदरणीय
अटलजींच्या नेतृत्वाखाली जे सरकार होते त्या काळात मराठी नाटक, मालिका, चित्रपट
विश्वातील एक दमदार व्यक्तिमत्व अभिनेता दिग्दर्शक निर्माते विनय आपटे यांनी छत्रपती
शिवाजी महारांजावर टिपू पेक्षा भव्यदिव्य मालिकेची निर्मिती केली. ती त्या काळात
प्राईम टाईमला सुरू झाली. मात्र काही भागानंतर सरकारने ती मालिका प्राईम टाईम वरून
उशिराच्या वेळेवर प्रदर्शित केली. परिणाम स्वरूप मालिका लवकरच बंद करावी लागली. यात
विनय आपटेंना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले. संघाच्याच मुशीत वाढलेल्या
विनय आपटेना अटलजी, प्रमोद महाजन, सुषमा
स्वराज हे सरकारात असताना आपली निर्मिती गुंडाळावी लागली. आपटे तत्कालीन सरकारच्या
विचारांच्या समकक्ष असून छत्रपतिंवरील मालिकेचे अधुरे स्वप्न घेऊन उर्वरित आयुष्य
जगावे लागले. हे सारे आठवताना प्रश्न पडतो समकक्ष म्हंजे कायं रं भौ?
ताजा कलम:
अलिकडेच सरसंघचालक भागवत
यांनी मुंबईत संघ शताब्दिनिमित्त जे संबोधन केले त्यात ते म्हणाले प्रत्येक
हिंदूने किमान तीन अपत्ये जन्मास घालावी.
विरोधाभास असा की संघाचे
बहुतांश प्रचारक हे ब्रह्मचारी असतात.ते हा आदेश पालन करण्यासाठी विवाहबध्द होऊन
सरसंघचालकांचा आदेश प्रत्यक्षात आणतील?
संजय
पवार
(लेखाविषयी आपले मत Comment बॉक्समध्ये नक्की नोंदवा.)




0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.