फेब्रुवारीची हलकीशी थंडी. पहाटेच्या कोवळ्या उन्हात अंगणात उभं राहिलं की एक वेगळंच विश्व हळूच डोळ्यांसमोर उलगडतं.
हा उपक्रम म्हणजे केवळ पक्षी
मोजण्याचा कार्यक्रम नाही; तो
निसर्गाशी पुन्हा एकदा नातं जुळवण्याचा उत्सव आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, निवृत्त
काका काकू, गृहिणी असे सगळेच हातात
वही,
दुर्बीण किंवा मोबाईल घेऊन घराजवळच्या बागेत, तलावाकाठी, शेतामध्ये
उभे राहिले. किमान पंधरा मिनिटे थांबून त्यांनी आकाशातील आणि झाडांवरील प्रत्येक
हालचालीकडे लक्ष दिलं. त्या क्षणी प्रत्येक जण जणू छोटासा शास्त्रज्ञ झाला होता.
आपल्या अंगणात सहज दिसणारे
पांढऱ्या घशाचा खंड्या, पिवळ्या
चोचीचा बाभूळ्या, तलावाजवळचा
पाणबगळा,
ठिपकेदार घुबड — हे सारे जणू आपलेच शेजारी. आपण रोजच्या
धावपळीत ज्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, तेच पक्षी या चार दिवसांत आपले केंद्रबिंदू बनले. प्रत्येक
चिवचिवाटामागे एक कथा आहे, प्रत्येक पक्ष्याच्या झेपेत एक
स्वातंत्र्याची चाहूल आहे, हे लक्षात
आलं.
सावंतवाडी शहरातील नरेंद्र डोंगरावर सतत विविध पक्ष्यांचा वावर असतो. या 'ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट'मध्ये तिथे ५२ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. ‘कॉर्नेल लॅब ऑफ ऑर्निथोलॉजी’ आणि ‘नॅशनल ऑडुबोन सोसायटी’
यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्तरावर हा उपक्रम राबवण्यात येतो. या अंतर्गत ‘वाइल्ड कोकण सावंतवाडी’
संस्थेच्या वतीने नरेंद्र डोंगरावर पक्षी गणना करण्यात आली. या गणनेत हळद्या, कोतवाल, निळ्या
डोक्याचा कस्तूर, हरियाल, श्यामा, हॉर्नबिल
(धनेश) आणि ऑरेंज मिनीवेट यांसारख्या पक्षी महाशयांनी
दर्शन दिले.
या उपक्रमात वाइल्ड कोकणचे
अध्यक्ष प्रा. धीरेंद्र होळीकर यांच्यासह डॉ. गणेश मर्गज, अभिमन्यू लोंढे, ज्ञानेश नाईक, अश्वेक गवस, कोमल कांबळी आणि डेसमॉंड लोबो हे पक्षीमित्र सहभागी झाले
होते. नरेंद्र डोंगरावरील पक्ष्यांचा किलबिलाट पक्षीप्रेमींसाठी नेहमीच आकर्षणाचे
केंद्र ठरत असून, या गणनेमुळे
येथील जैवविविधतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
या उपक्रमामागे एक मोठं
वैज्ञानिक महत्त्व दडलं आहे. नागरिकांनी केलेल्या नोंदींमुळे पक्ष्यांच्या
संख्येतील बदल, स्थलांतराचे मार्ग, हवामानातील बदलांचा परिणाम यांचा अभ्यास करता येतो. परंतु
या सगळ्या आकडेवारीपलीकडे एक भावनिक गोष्ट आहे ती म्हणजे निसर्गाशी
जुळलेलं आपलं नातं. मोबाईलच्या पडद्याऐवजी आकाशाकडे पाहण्याची सवय, आवाजाच्या गोंधळाऐवजी किलबिल ऐकण्याचा आनंद, आणि झाडांच्या सावलीत उभं राहून शांततेचा अनुभव घेण्याची
सवड.
२०२६ मधील हा पक्षीमहोत्सव आपल्याला सांगून गेला की, निसर्ग आपल्या आसपासच आहे, फक्त आपण थांबून पाहण्याची गरज आहे. अंगण लहान असो वा मोठं, शहर असो वा खेडं, कौलारू घर असो की गगनचुंबी इमारती, पंखांचं हे विश्व सगळ्यांसाठी खुलं आहे आणि कदाचित, या पंखांच्या संगतीत आपणही थोडंसं अधिक मोकळं, अधिक संवेदनशील होऊ शकतो.
(लेखाविषयी आपले मत Comment बॉक्समध्ये नक्की नोंदवा.)




0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.