‘खिशाला जेव्हा भोक पडतं ना तेव्हा नाण्यांच्या आधी नाती घरंगळून जातात’, असं कोणी म्हटलं आहे माहित नाही. पण ज्यांनी कोणी म्हटलं आहे, त्यांनी माणसासमोर त्याचा अमानवी चेहरा दाखवण्यासाठी आरसा धरला आहे. यासाठीच नात्यांना महत्त्व देणारे लोक पैसा कमवण्यापेक्षा माणुसकीचे धागे एकमेकात गुंफून प्रेम, माया, कारुण्याची विलोभनीय शाल विणण्यात आपले कौशल्य पणाला लावतात. उज्ज्वला कांबळे या अशाच प्रेमाच्या विविधरंगी धाग्यांनी नात्यांची सुंदर शाल बनवून आपल्या कुटुंबियांवर पांघरणाऱ्या विणकर आहेत. वयाच्या सोळाव्या वर्षी लग्न करून सासरी आलेल्या चांदणी धिवार या मुलीची उज्ज्वला कांबळे झाली आणि आपल्या सोज्ज्वळ, मनमिळावू, मेहनती स्वभावाने मायेची पाखर कशी घातली त्याची ही कथा.

पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील हरगुडे गावातील लक्ष्मण गेनू धिवार आणि कोंडाबाई यांच्या घरात एका चांदणीचा जन्म १९५९ साली झाला. लक्ष्मण धिवार हे तमाशात काम करायचे. फिरतीच्या कामामुळे त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बरीच माहिती होती. समाजातील वाईट रूढी परंपरांवर बाबासाहेब व्यक्त करत असलेले विचार लक्ष्मण धिवार आपल्या गाण्यातून जनतेपर्यंत पोहोचवायचे. ‘माझी १० भाषणं जो परिणाम साधतात तो शाहिरांच्या एका गाण्याने साधला जातो,’ असं ज्या कलावंतांच्या बाबतीत बाबासाहेब म्हणायचे त्यात लक्ष्मण धिवार सुद्धा होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. धर्मांतराच्या आधी देवाला खूप मानणारे धिवार कुटुंबीय नंतर मात्र बाबासाहेबांचे कट्टर अनुयायी बनून बुद्धाच्या मार्गावर अग्रेसर झाले. चांदणीचं आयुष्य सुद्धा यामुळे प्रकाशमान झालं.

तमाशात डफावर थाप मारून परिवर्तनाचा बोलबाला करणारे धिवार यांचे हात कुटुंबाच्या उपजीविकेसाठी खडी मशीनवर सुद्धा चालले. शिक्षणाचं वाघिणीचं दूध आपल्या सर्व मुलांनी प्राशन केलंच पाहिजे यावरही त्यांचा कटाक्ष होता. भीमराव, ठकसेन, चांदणी, कुसूम आणि सुनील या पाच मुलांचं पालनपोषण आणि शिक्षण करण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने शेतमजुरी, गुरं चरायला नेणं अशी लहानसहान कामंही केली. त्यांची कोंडाबाई ह्या शिलाई आणि विणकामात तरबेज होत्या. त्या आपल्या गावातील बायकांना हाताने टाके घालून ब्लाउज शिवून द्यायच्या. कोणतीही डिझाईन नुसती बघून तसं तंतोतंत विणकाम त्या करायच्या. आईचे हे गुण चांदणीने अचूक हेरले. ती स्वत: आईच्या जोडीने या वस्तू बनवायची. सोबत गावात तिचं शिक्षणही सुरू होतं.

दरम्यान मोठा भाऊ भीमराव आणि ठकसेन मुंबईत येऊन पवई परिसरात राहू लागले. त्यांनी अनेकांना आपल्या सोबत मुंबईत आणलं होतं. भीमरावांना पवईतील आयआयटीत नोकरी मिळाली. ते सकाळी महाविद्यालयीन शिक्षण घेऊ लागले आणि रात्री आयआयटी नोकरीला जायचे. ठकसेन हे रात्रीच्या शाळेत शिकू लागले; पुढे ते दहावीच्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने पास झाले. हे दोघे मुंबईला आल्यावर त्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी चांदणीला मुंबईत आणलं गेलं. १० – १२ वर्षाची चांदणी आपल्या भावंडांसाठी आपल्या लहानग्या हातांनी स्टोव्हवर जेवण बनवायची. याच दरम्यान जवळच्या शाळेत तिचं शिक्षणही सुरू होतं.

आठवी पास झाल्यानंतर मोठे बंधू भीमराव यांचे मित्र आणि आयआयटीतच नोकरी करणाऱ्या पोपटराव बाबुराव कांबळे यांचं स्थळ अवघ्या सोळा वर्षांच्या चांदणीला सांगून आलं. वडील या लग्नाला तयार होते पण मोठे बंधू भीमराव यांना आपल्या बहिणीला शिकवायचं होतं. केवळ सोळाव्या वर्षी लग्न करून तिची प्रगती खुंटू द्यायची नव्हती. मुली एकदा का संसाराला लागल्या की त्यांचं शिक्षण होणं अगदी कठीण असतं; शिवाय पोपटरावांचे पाच भाऊ होते. एवढ्या मोठ्या कुटुंबात चांदणीची रया जाईल, तिला शिक्षणाची संधीच मिळणार नाही हे भीमरावांना माहित होतं. पण यावर पोपटराव कांबळे यांच्या आईने धिवार कुटुंबाला शब्द दिला की, मी मुलीला लग्नानंतर शिकवीन. भीमराव तरीही तयार नव्हते. शेवटी हो नाही करता हा मंगल परिणय झाला. कांबळेच्या कुटुंबात चांदणीला ‘उज्ज्वला’ हे नवं नाव मिळालं आणि एका उज्ज्वल आयुष्याला सुरुवात झाली.

उज्ज्वला यांच्या सासूबाई हिराबाई या स्वच्छतेच्या भोक्त्या आणि शिस्तप्रिय होत्या. त्याच प्रमाणे त्या बोलघेवड्या होत्या. त्यांच्या मोठ्या कुटुंबाला त्या आपल्या याच स्वभावाच्या जोरावर तर एकत्रित बांधून ठेवू शकल्या होत्या. हिराबाई दिवसभर घरोघरी धुण्याभांड्यांची कामं करायच्या आणि रात्री फावल्या वेळात गोधड्या शिवायच्या. उज्ज्वला जणू त्यांच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये तयार होत होती.

एक मिनिट सुद्धा शांत बसायचं नाही हे ‘इकीगाई’ तंत्र हिराबाईंना खूप आधीपासून माहित होतं. त्यांच्या बोलघेवड्या स्वभावामुळे त्यांनी त्यांच्या पतीला आयआयटीतील नोकरी मिळवून दिली. त्याचं झालं असं की, त्या आयआयटीच्या एका प्राध्यापकाच्या घरी धुण्या भांड्यांचं काम करायच्या. या प्राध्यापकाच्या पत्नीशी गप्पा मारताना त्या आपल्या आर्थिक परिस्थितीविषयी बोलायच्या. एकदा या प्राध्यापकाच्या पत्नीने आयआयटीत माळी काम करण्यासाठी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी आपल्या नवऱ्याला ही नोकरी देण्याविषयी विनंती केली आणि त्यांच्या शब्दावर पती बाबुराव कांबळे आयआयटी पवईत माळी कामावर रुजू झाले होते.

हिराबाईंनी कधी आपला ‘सासुपणा’ लहानग्या उज्ज्वलावर थोपला नाही. कुटुंबियांच्या देखभालीत त्यांनी उज्ज्वला यांच्या भावाला दिलेला शब्द पूर्ण करू शकल्या नसल्या तरी त्यांनी उज्ज्वलावर कुटुंबियांचा भार टाकला नाही. दोघीजणी मिळून घरातील सर्व कामं करायच्या. यातच १९७६ ला उज्ज्वला यांना राहुल हा पाहिला मुलगा, १९७८ साली सुशील हा दुसरा मुलगा आणि १९८० साली कल्पना ही मुलगी झाली. अर्थातच, उज्ज्वला यांची सारी उर्जा आपल्या वाढत्या कुटुंबावर खर्ची होत होती. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी लग्न होऊन तीन मुलानंतर अगदी २२ व्या वर्षी त्यांची संततिनियमन शस्त्रक्रिया झाली.

दरम्यान सासूबाईंच्या सोबत उज्ज्वला आयआयटीतील वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होत होत्या. आयआयटीत पूर्वी बाबासाहेबांची जयंती साजरी व्हायची मात्र काही वाद होऊन जयंती उत्सव बंद करण्यात आला. काही वर्षं हा उत्सव बंद होता. नंतर आयआयटीतील महिला एकत्र आल्या आणि त्यांनी दर गुरुवारी घरोघरी जाऊन वंदना घ्यायला सुरुवात केली. यातूनच आयआयटीत पुन्हा जयंती सुरु झाली. यासाठी सर्वांकडून वर्गणी मागण्याचं महत्त्वाचं काम उज्ज्वला यांच्या सासूबाईंनी केलं. वर्गणी न देणाऱ्यांना कानटोचणी देण्यातही त्या कमी नव्हत्या. आपल्या सासूकडूनच उज्ज्वला यांनी चळवळीचं बाळकडू प्राशन केलं.

१९९२ च्या दरम्यान सुशील बारावीला, राहुल दहावीला आणि कल्पना नववीला असताना त्यांच्या जबाबदारीतून थोडी मोकळीक मिळाल्यावर उज्ज्वलाताई शिवण क्लासला जाऊ लागल्या. हे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याचं लग्नाच्या आधी अर्धवट राहिलेलं शिक्षण त्यांना खुणावत होतं. यावेळी त्यांचा भाऊ ठकसेन मुंबईला येऊन शिक्षण पूर्ण करून पवई परिसरात शिकवण्या घेऊ लागला होता. उज्ज्वलाताईंनी दहावीच्या परीक्षेचा फॉर्म भरला आणि त्या ठकसेनकडे शिकवणीसाठी जाऊ लागल्या. मात्र हे स्वप्न यावेळी सुद्धा अपूर्णच राहणार होतं.

दहावीच्या परीक्षा मार्चमध्ये होणार होत्या पण फेब्रुवारी महिन्यातच आयआयटीतील मेससाठी स्वयंपाकीच्या जागेची भरती निघाली. ही नोकरी आपण करावी असं उज्ज्वलाताईंच्या मनात खूप येत होतं. पण एकीकडे दहावीची परीक्षा पण खुणावत होती. एक प्रयत्न म्हणून त्यांनी या भरतीसाठी मुलाखत दिली आणि त्यात त्या उत्तीर्ण झाल्या. दहावीची परीक्षा देण्याआधी १५ फेब्रुवारीपासून आयआयटीत नोकरीला रुजू झाल्या. मुलींच्या हॉस्टेल मधील मेसमध्ये त्यांनी १५ वर्षं स्वयंपाकीचं काम केलं.

पुन्हा एकदा त्यांच्या अपूर्ण शिक्षणाने त्यांना साद घातली ती आयआयटीतील प्रमोशनमुळे. या प्रमोशनसाठी दहावी पास असणं आवश्यक होतं. त्यावेळी आयआयटीमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे वर्ग सुरू झाले होते. अर्थातच उज्ज्वला यावेळी थांबल्या नाहीत. त्यांनी मुक्त विद्यापीठाच्या दहावीच्या वर्गात प्रवेश घेतला. आता खऱ्या अर्थाने शिक्षणाचं स्वप्न नजरेच्या टप्प्यात आलं होतं. याच दरम्यान मुलगा राहुल याचं लग्न झालं. आलेल्या सुनबाई स्नेहलने सुद्धा आपल्या सासूच्या अभ्यासात मदत केली. त्यांना नोट्स लिहून देणं, काही समजलं नसेल तर ते समजावणं, अभ्यास पूर्ण करणं या सगळ्यात स्नेहल त्यांना मदत करायची. सुनेने आपल्या सासूला दहावीच्या परीक्षेसाठी मदत करण्याचं हे बहुधा जगातलं पाहिलं आणि अनोखं उदाहरण असेल. सुशीलची पत्नी प्रज्ञा ही सुद्धा आपल्या सासूच्या सर्व कामात हिरीरीने भाग घेत आहे. २०१२ ला उज्ज्वलाताई दहावी झाल्या आणि २००८ साली हे जग सोडून गेलेल्या सासूबाईचा शब्द अखेर पूर्ण झाला!

शिक्षणाचं महत्त्व उज्ज्वलाताई आणि त्यांच्या कुटुंबियांना आधीपासून माहित होतंच. त्यांची मुलगी कल्पना रविकिरण शिंदे या आपले पती आणि श्रावक, संघा या आपल्या दोन मुलांसह अमेरिकेच्या अरीझोना प्रांतात राहत आहे आणि तिथल्याच प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मुलीच्या सोबतीने उज्ज्वलाताई आणि पोपटराव अमेरिकाही फिरून आले आहेत.  



उज्ज्वलाताई आपले कुटुंबीय, विशेष म्हणजे प्राशिल आणि इति या नातवंडांमध्ये गुंतलेल्या असल्या तरी विणकामाची त्यांची जुनी हौस त्यांना स्वस्थ बसू देत नाही. एकही मिनिट रिकामं न बसण्याच्या आपल्या सासूची शिस्त त्यांच्या अंगीही बाणली गेली आहे. त्यांनी आपल्या विणकामाच्या कौशल्यातून अनेक तोरणं, पिशव्या, रुमाल बनवले आहेत. सुरुवातीला त्या कोहिनूर धाग्याच्या, नायलॉनच्या चपट्या वायरच्या बास्केट सारख्या वस्तू बनवायच्या. आपल्या आईप्रमाणेच कोणताही टाका बघून त्यांना त्या वस्तूची बांधणी कळते आणि त्या आपल्या कलाकुसरीतून एक सुंदर वस्तू साकारतात. हे सर्व केवळ हौस म्हणून त्या करतात. मुळातला स्वभाव व्यावसायिक नसल्यामुळे त्या वस्तूंच्या विक्रीचा त्या विचार करत नाही. आजही त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या गोधड्या तयार आहेत. या सर्व हौसेतून साकार झाल्या आहेत. यामागे आपला वेळ सत्कारणी लावणे एवढाच त्यांचा शुद्ध हेतू असतो.

आपल्या माहेरी आणि सासरी मोठमोठ्या कुटुंबांच्या संस्कारात राहून आपल्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू पाडणाऱ्या उज्ज्वलाताई आंबेडकरी चळवळीत सुद्धा आपले पती पोपटराव कांबळे जे आंबेडकरी साहित्य जगतात के. पुरुषोत्तम नावाने लोकप्रिय आहेत, त्यांच्या सोबतीने सक्रीय सहभाग नोंदवतात. आपल्यावरील अन्यायाला आयआयटीच्या प्रमुखासमोर वाचा फोडणाऱ्या या चांदणीने संयम आणि शीतलतेने आपल्या मागून येणाऱ्या अनेक मार्गस्थांना प्रकाश दाखवून त्यांची जीवनवाट उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या परिघातील लोकांना मिळालेली ही मायेची शाल अशीच उबदार राहो ही सदिच्छा!

== विनिशा धामणकर