बहुचर्चित कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन ६ जून २०२६ रोजी सकाळी सुरू झाले आणि दुपारी साघारण ४ वाजता संपले. आता एक आठवडा विश्रांती असेल. तोवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला तर कॉक्रोच रस्त्यावरून पुन्हा समाजमाध्यमात माघारी फिरतील.
आजवर मोदी सरकार साम, दाम, दंड, भेद अशा सर्व पद्धती वापरून
कुठल्याही प्रकारचा विरोध मोडून काढते. त्यामुळेच या कॉक्रोजियांच्या
पालकांत चिंतेचे वातावरण होते. आया मुलांना अंदमानात तर नाही पाठवणार या भयशंकेने रडत
होत्या. पण मोदी सरकारने तर “आईए आपका इंतजार था…”असं जणू काही गाणं
म्हणत अभिजितचे स्वागत केले. अनेक देशात पर्यटनासाठी जसा व्हिसा ऑन अरायव्हल देतात
तसे विमानतळावरच जंतर मंतर बहाल केल्याचे पत्र दिले. नंतर बॅरिकेटिंग
करून उपस्थिती मर्यादित राहिल पण विशिष्ट ॲंगलने गर्दी भासेल अशी भरपूर पोलीस बंदोबस्तात
व्यवस्था केली. पोलीस र इतके शांत व आरामात होते की वाटावे आत लग्नाचे रिसेप्शन
वगैरे चालले असावे.
आंदोलनााठी ५
वाजेपर्यंत परवानगी होती. पण आंदोलन धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा या एकमेव मागणीसाठी असल्याने
व तो होत नाही तोवर आंदोलन सलग चालू ठेवायचे वगैरे ठरले नव्हते. कडक उन्हात या
एकमेव मागणीसाठी बोलून बोलून घसा कोरडा पडला. अधिकचे वक्ते तयार
नव्हते. प्रवक्तेही धर्मेंद्र प्रधानांच्या पलिकडे
जात नव्हते. शेवटी अभिजितलाच अस्वस्थ वाटू लागल्याने किंवा होमसिक
झाल्याने तो तिथून थेट घराकडे निघाला. गर्दीही ओसरत गेली व एखाद्या मालिकेच्या प्रसारणात कमर्शिअल
ब्रेक यावा, तसं मिलते है ब्रेक के बाद म्हणत कॉक्रोच एका आठवड्यासाठी
ब्रेकवर गेलेत!
हे असे आंदोलन भारताने
प्रथमच पाहिले. जेन-झी उपाधी ज्यांना लागते त्यांचं सगळंच तेवढ्यापुरतं
असतं. मुळात लघुलिपी आणि इमोजीवगैरेवर चालणारी ही पिढी शाश्वत, निरंतर, प्रक्रिया इत्यादी
शब्दांपासून त्यांच्या अर्थासकट कोसो दूर असावी. त्यामुळे ते आले, त्यांनी मागणी
केली, पुन्हा येतो
म्हणून ते गेलेही.
याच पिढीची आधली पिढी. शहर मुंबई. रेल्वे
स्थानकाबाहेरचे रिक्षावाले जवळचे भाडे घेत नाहीत यावरून संतापली. तेव्हा मोबाईल
नुकतेच आले होते. एसएमएसचा जमाना होता. लगेच त्यावरून
आंदोलन. बायकॉट ॲाटो. दोन दिवस बराच गाजावाजा. चॅनलिय बातम्या, वर्तमानपत्रात
जागा. गाजावाजा झाला. नंतर संपलं सगळं. आता ओला उबरने रिक्षावाले सरळ
झालेत. कॉक्रोचवाल्यांच्या
आधीच्या पिढीने अशा अल्पमुदतीच्या आंदोलनाचा पाया रचला होता.
![]() |
| AI Generated Picture |
या पार्श्वभूमीवर सिद्धांत नामक
२० वर्षीय युवकाने सीबीएसई बोर्डाच्या साईटवर जात परिक्षा पेपर रिचेकिंग राबवणाऱ्या
यंत्रणेतील दोष शोधून काढत, सदोष यंत्रणेचा ठेकाच कशा चुकीच्या पद्धतीने चुकीच्या
संस्थेला दिलाय हे सप्रमाण दाखवून दिले. त्याची अचूकता इतकी होती की संसदीय
समितीने त्याला बोलावून सर्व गोष्टी जाणून घेतल्या व सरकारला शिफारशी केल्यात. काहींच निलंबन
वगैरेही झालं. ना आंदोलन, ना कसलं संघटन, ना गर्दी ना
समाजमाध्यमी गर्दी! कॉक्रोचांनी असे
दहा सिद्धांत सोबत घेतले असते तर त्यांचा मारा अचूक व भेदक झाला असता. आसपासच्याच
पिढीतले युवक कसा वेगवेगळा विचार करतात हे यानिमित्ताने दिसले.
अभिजित की सिद्धांत कुणाच्या
काठीने सरकार शिक्षण मंत्रीपदाचा साप मारते हे बघणे हा एक वेगळाच धडा असेल
सर्वसामान्यांना.
ताजा कलम:
मी दिल्लीला राज्यसभेत
जातो. एनडीए सहयोगी म्हणून राज्यमंत्रीपद मिळालं तर घेईनही. कॅबिनेटचं हवं असा
हट्ट करणार नाही, पण इथे महाराष्ट्रात माझ्या जागेवर
पुतण्याला मंत्री करा! अशी मागणी तटकरे कुटुंबाचा हवाला देत भुजबळांनी केला. आता तटकरे खुद्द
अजित दादांच्या घरचा दाखला देत पक्षाकडून अधिकचं काही मागतात का ते पहायचं. एकत्रित कुटुंब
व्यवस्था समाजात लोप पावताना राजकारणात मात्र खोलवर रूजलीय!
संजय
पवार




0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.