हिंदीचे लोकप्रिय कवी धूमिल यांची ‘रोटी और संसद’ या कवितेची आज प्रकर्षाने आठवण येत आहे. कविता अशी आहे.
एक आदमी रोटी बेलता है
एक आदमी रोटी खाता है
एक तिसरा आदमी भी है
जो ना रोटी
बेलता है ना रोटी खाता है
वो सिर्फ रोटी से खेलता
है
यह तिसरा आदमी कौन है
मेरे देश की संसद मौन है...
कवी धूमिल यांनी ही कविता
साधारणपणे ऐंशीच्या दशकात लिहिली होती. तेव्हा स्वतंत्र
भारत आपल्या पंचविशीत होता. आर्थिक चणचण,
प्रचंड जातिवाद, ज्ञानकेंद्रांचा अभाव
आणि अन्नधान्याचा तुटवडा यामुळे अन्न, वस्त्र, निवारा या सर्वच मुलभूत गरजांच्या बाबतीत अनागोंदी माजलेली होती. स्वातंत्र्याने स्थैर्य येईल हा सामन्यांचा विश्वास
लय पावत चालला होता. शेतकरी, कष्टकरी राबत
अन्न आणि वस्तू उत्पादन करीत होते. मध्यमवर्गीय ते
खरेदी करून दोघांनाही जगवत होते.
पण नफेखोर,
पुंजीवादी अडते या उत्पादक आणि
उपभोक्त्यांच्या मध्ये अन्नधान्यांचे, वस्तूंचे
भाव वाढवून मोडता घालत होते. हेच ते धूमिलचे
तिसरे आदमी होते.
तत्कालीन सरकार अनेक योजना आणत होते पण सरकारचे भोंगळ कारभारी त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवत नव्हते. आणि सरकार या लोकांच्या जीवाशी, जीवनांशी खेळणाऱ्या लोकांवर कोणतीच कारवाई करीत नव्हते. हा भोंगळपणा वाढत चालला होता. गरीब अधिक गरीब आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत जाण्याची भांडवलशाही व्यवस्था या लोकशाहीत सुरू होती. स्वातंत्र्यापासून लागलेली ही कीड वर्षोनुवर्षे वाढत गेली. सरकारे आली आणि गेली तरी समूळ बदल कोणीही करू शकले नाहीत. म्हणून आजही धूमिलची ही कविता जशीच्या तशी लागू होते. फरक फक्त एवढाच आहे की हे सर्व तिसरे आदमी आता थेट संसदेत बसून राष्ट्रवाद आणि देशभक्तीच्या आडून भ्रष्टाचाराचा आगडोंब उभा करत आहेत.
राजकीय अराजकता पूर्वी कधी नव्हती इतकी फोफावत आहे. दुःख याच गोष्टीचं आहे की, राज्यकर्त्यांच्या या अराजकतेचं खापर मात्र शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या तरुणांवर फोडलं जात आहे. पुरोगामी महाराष्ट्र किती प्रतिगामी बनत चालला आहे याची अनेक उदाहरणं गेल्या काही वर्षात समोर आली आहेत. पण नाकर्त्या राज्यकर्त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या तरुणांवर अराजकता पसरविणारे म्हणून लेबल लावणारे मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे असावेत हे महाराष्ट्राच्या स्खलन होत असलेल्या जाणिवेचं प्रतीक आहे. खरंतर कॉकरोच जनता पार्टी अराजकता पसरवत नसून ते राज्यकर्त्यांच्या अराजकतेवर सडेतोड उत्तर आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कॉकरोच जनता पार्टीविषयी ममत्व असण्याचं काहीच कारण नाही. तशी अपेक्षा आपण त्यांच्याकडून करणं म्हणजे पराकोटीचा भाबडेपणा होईल. पण कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात झुरळांचे मुखवटे, फुलं, शाल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन उतरलेल्या तरुणांनी अराजकता पसरवली असं जे मुख्यमंत्री म्हणाले ते मुख्यमंत्र्यांना सिद्ध करता येईल का? आपल्या मागण्या घेऊन आंदोलन करण्यासाठी सरकारच्या आजवरच्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास करून मैदानात उतरलेल्या तरुणांनी अराजकता कशी पसरवली हे मुख्यमंत्र्यांना सांगता येईल का?
पेपरलीक प्रकरणात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यात आणि त्यासाठी आंदोलन करण्यात गैर काय आहे? याच शिक्षणमंत्र्यांनी ‘जागतिक योग दिन’ असलेला 21 जून हा दिवस ‘नीट’च्या फेरपरीक्षेसाठी निवडला आहे. यात त्यांची बौद्धिक दिवाळखोरी दिसत नाही का? याच महाशयांनी सर्व प्रश्नपत्रिका सर्व परीक्षा केंद्रांवर पोहोचवण्यासाठी लष्कराच्या वायुदलाची मदत घेणार म्हणून घोषित केलं आहे. यांना मागच्या प्रकरणावरून समजलं नाही का या प्रश्नपत्रिका जिथे तयार होतात तिथेच त्या फुटतात आणि ते फोडण्यात यांचे भाईबंद आणि भगिनी अग्रेसर असतात. आज ते सर्व तुरुंगात असले तरी त्यांची यंत्रणा अजूनही कार्यरत असेलच. त्यांच्यावर इलाज करायचा सोडून ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’ छाप उपाय करणाऱ्या मंत्र्याला पायउतार व्हायला लावणं हे किती महत्त्वाचं आहे हे मुख्यमंत्र्यांपासून अंधभक्तांना कोणालाच कळू नये? लोकांना मूर्ख बनवता बनवता आपणही त्याच वळणावर गेले की काय?
बदनामी हे आणखी एक शस्त्र या मूर्खांच्या हातात आलं आहे. सर्व आंदोलकांच्या सोबतच बसलेले आंदोलनाचे नेते सौरव दास यांचे कॉफी पितानाचे फोटो टाकून ‘आंदोलक उन्हात आणि नेते सावलीत’ अशी टॅगलाईन चालवून हे अंधभक्त आपलंच हसं करून घेत आहेत. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांना चक्कर आल्याचे फोटोज व्हिडीओज टाकून ते किती नाजूक आहेत, त्यांना दिल्लीचे ऊन सहन झाले नाही वगैरे बाता मारून आंदोलनाची हवाच काढण्याचा हास्यास्पद प्रकार करत आहेत. शिवाय या आंदोलनात सहभागी झालेल्या समलिंगी विद्यार्थ्यांचे खासगी फोटो टाकून अव्यापारेषु व्यापार करत आहेत. हे सर्व बघण्या आणि दाखवण्याऐवजी या मूर्खांना त्यांच्या मुलाबाळांच्या आयुष्याशी होणारा खेळ खरंच दिसत नाही का? एखादं आंदोलन अशा प्रकारे बदनाम केलं जातं, यात मुख्यमंत्र्यांना अराजकता दिसत नाही का?
कॉकरोच जनता पार्टी ही प्री-मॅच्युअर बेबी आहे. नक्कीच आहे. ती कोणत्या पक्षाची बी टीम असेल, नसेल; ती निवडणूक लढवेल, न लढवेल; पण सध्या ती अस्तित्वात आहे. तिला बाळसं धरायला आणि अंगापिंडाने वाढायला फार वेळ लागणार नाही. राज्यकर्त्यांच्या आरोप-प्रत्यारोपाने जर या झुरळांचा डायनोसॉर झाला तर इथे बदनामीचे मनोरे रचणाऱ्या बांडगुळांना थारा उरणार नाही. त्याआधीच राज्यकर्त्यांनी आपली अराजकता आटोपती घ्यावी, हे त्यांच्याच फायद्याचा आहे.




0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.