ही केवळ दोन महान व्यक्तींची गोष्ट नाही, तर आंबेडकर चळवळीतील नेतृत्व, माणुसकी, मैत्री आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणादायी कहाणी आहे!


जो बसे हैं वे उजड़ते प्रकृति के जड़ नियम से,
पर किसी उजड़े हुए को फिर बसाना कब मना है?
है अँधेरी रात पर दिया जलाना कब मना है?
— हरिवंशराय बच्चन

हिंदीतील महान कवी हरिवंशराय बच्चन यांच्या या पंक्ती म्हणजे ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ याचेच प्रत्यंतर देणाऱ्या अत्यंत प्रेरणादायी ओळी आहेत. हरिवंशराय बच्चन यांचे हे विचार त्यांच्या पुत्राने म्हणजे हिंदी सिनेजगतातील सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी आपल्या आयुष्यात तंतोतंत उतरवले आणि त्याला कारण ठरले आंबेडकरी चळवळीचे एक खंदे नेते, मार्गदर्शक आणि भाष्यकार असणारे ज. वि. पवार. अमिताभ बच्चन आणि ज. वि. पवार या दोहोंमध्ये त्यांची कधीही भेट न होता जुळून आलेले ऋणानुबंध म्हणजे एक दुर्लक्षित कथाच म्हटली तर वावगे ठरणार नाही. याविषयी ज. वि. पवार यांना बोलतं केलं विलासभाऊ रूपवते यांनी. रूपवते यांनी ज. वि. पवार यांची दिनांक १२ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील दादर येथील आंबेडकर भवन या ठिकाणी मुलाखत घेतली. त्यावेळी ज. वि. पवार यांच्या नि:स्पृह, नि:स्वार्थी स्वभावामुळे पुढे आंबेडकरी चळवळीतील एका दीपस्तंभाला कशी मदत झाली याची हकीकत सांगितली. त्याचा हा सविस्तर वृत्तांत विलासभाऊ रूपवते यांच्याच शब्दात.

 



आंबेडकर चळवळ म्हणजे केवळ अन्यायाविरुद्ध संघर्ष करणे, मोर्चे काढणे, आंदोलने करणे किंवा भाषणे देणे एवढेच नाही. तर समाजातील माणसाला संकटातून बाहेर काढण्यासाठी आपल्या बुद्धीचा, अनुभवाचा, पदाचा आणि संपर्काचा योग्य वापर करणे म्हणजे आंबेडकर चळवळ! याचे एक महत्त्वपूर्ण उदाहरण म्हणजे आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते, साहित्यिक आणि कवी ज. वि. पवार साहेब!

ज. वि. पवार हे दलित पँथरचे संस्थापक नेते. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत अन्यायाविरुद्ध लढणारी एक आक्रमक चळवळ उभी केली. या चळवळीने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासावर मोठा ठसा उमटवला. याच चळवळीतून पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्यासारखा निर्भीड, विद्रोही आणि क्रांतिकारी कवी घडला.

१. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या पडत्या काळात ज. वि. पवार साहेबांची मदत!

अमिताभ बच्चन यांचा 'आनंद' हा चित्रपट पाहिल्यापासून ज. वि. पवार साहेब अमिताभ बच्चन यांचे चाहते आणि हितचिंतक झाले होते. पुढे अमिताभ बच्चन यांनी ABCL (Amitabh Bachchan Corporation Limited) ही कंपनी सुरू केली. मात्र काही काळानंतर कंपनी आर्थिक संकटात सापडली. कंपनीच्या आर्थिक व्यवहारांबाबत अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या काळात ज. वि. पवार हे बँक ऑफ इंडिया, जुहू शाखेत महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते. अमिताभ बच्चन यांच्या कंपनीचे बँक खाते याच शाखेत होते.

कंपनीच्या आर्थिक व्यवहारांबाबत आणि कलाकारांना दिल्या जाणाऱ्या धनादेशांबाबत काही गंभीर अडचणी असल्याची माहिती ज. वि पवार यांना मिळाली. कंपनीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना खूप वाईट वाटले. त्यांनी अमिताभ बच्चन यांचे सहकारी पाठक यांच्याशी चर्चा केली. त्यांनी स्पष्ट सांगितले की, मी अमिताभ बच्चन यांना मदत करेन; मात्र या मदतीमध्ये माझे नाव कुठेही पुढे आलेले दिसता कामा नये.

ज. वि. पवार यांनी बँकेच्या नियमांच्या चौकटीत राहून कंपनीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मार्ग शोधला. बँकेचे हित सुरक्षित राहिले पाहिजे आणि कंपनीलाही पुन्हा उभे राहण्याची संधी मिळाली पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी मदतीचा मार्ग आखला. त्यांनी पाठक यांना विश्वास दिला की, योग्य बँकिंग व्यवस्थेच्या माध्यमातून कंपनीचे व्यवहार सुरळीत करण्यासाठी आपण प्रयत्न करू.

ज.वि पवार यांच्या या पुढाकारामुळे अमिताभ बच्चन यांच्या कंपनीला संकटातून सावरण्यासाठी मदत मिळाली.

२. मदत करणाऱ्या व्यक्तीचे नाव समजल्यावर अमिताभ बच्चन यांची भेटण्याची इच्छा!

काही काळानंतर अमिताभ बच्चन यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली. त्यावेळी त्यांनी आपल्या सहकारी पाठक यांना विचारले, 'बँक ऑफ इंडिया मध्ये माझ्या कंपनीला मदत करणारे ते कोण साहेब आहेत? त्यांचे नाव काय आहे? मला त्यांना भेटायचे आहे.' पाठक यांनी ज. वि. पवार यांचे नाव सांगितले.

अमिताभ बच्चन यांनी पवार यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यासाठी स्वतःहून वेळ दिला. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन हे जेव्हा बँक ऑफ इंडिया, जुहू शाखेत पवार यांना भेटण्यासाठी आले, त्या दिवशी पवार साहेब सुट्टीवर होते. ज्या माणसाने कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता मदत केली, त्याच माणसाला भेटण्यासाठी स्वतः सुपरस्टार अमिताभ बच्चन आले होते!

 


३. ज्यांच्याशी मतभेद होते, त्या नामदेव ढसाळांसाठी पवार साहेबांची धडपड!

काळ पुढे सरकत होता. दलित पँथरच्या काळातील सहकारी आणि पवार साहेबांचे शिष्य असलेले पद्मश्री नामदेव ढसाळ आजारी पडले. त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या उपचारांसाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज होती. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, उपचारांचा खर्च सुमारे ३० लाख रुपये होता.

विशेष बाब म्हणजे त्या काळात ज. वि. पवार आणि नामदेव ढसाळ यांच्यात दलित पँथरमधील मतभेदांमुळे बोलणेही बंद होते. पण पवार यांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवले. त्यांनी विचार केला की, आज माझा सहकारी संकटात आहे. त्याला मदतीची गरज आहे. अशा वेळी राजकीय मतभेद आणि जुने वाद बाजूला ठेवले पाहिजेत. त्यांनी नामदेव ढसाळ यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.

 

४. एका भावनिक बातमीने उभे केले मदतीचे मोठे व्यासपीठ!

ज. वि. पवार यांनी आंबेडकर चळवळीतील पत्रकार दिवाकर शेजवळ यांच्याशी संपर्क साधला. त्या काळात दिवाकर शेजवळ हे 'लोकनायक' वृत्तपत्रात कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत होते. पवार साहेबांनी नामदेव ढसाळ यांच्या आजारपणाची आणि त्यांना आर्थिक मदतीची किती आवश्यकता आहे, याची भावनिक मांडणी केली. दिवाकर शेजवळ यांनी ही बातमी 'लोकनायक'मध्ये प्रसिद्ध केली.

त्यानंतर प्रत्येक मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रानेही नामदेव ढसाळ यांच्या आजारपणाची बातमी पहिल्या पानावर प्रसिद्ध केली आणि त्यांना मदतीचे आवाहन केले. ज. वि. पवारांनी आपल्या मित्रासाठी समाजाला आवाहन केले होते. ज्याच्याशी आपले मतभेद आहेत, त्याच्या संकटात त्याला मदतीचा हात देणे, हीच खरी माणुसकी आहे!

 

५. अमिताभ बच्चन यांनी नामदेव ढसाळ यांना केली पाच लाखांची मदत. बॉम्बे हॉस्पिटलच्या अकाउंटमध्ये जमा केले पैसे!

इंग्रजी वृत्तपत्रातील ही बातमी अमिताभ बच्चन यांचे सहकारी पाठक यांच्या वाचनात आली. त्यांनी अमिताभ बच्चन यांना ही बातमी दाखवली आणि त्यांना सांगितले की, ज्या ज. वि. पवार साहेबांनी आपल्या कंपनीच्या अडचणीच्या काळात बँकेच्या माध्यमातून मदत केली होती, तेच पवार साहेब आज आपल्या मित्र नामदेव ढसाळ यांच्या मदतीसाठी प्रयत्न करत आहेत.

हे ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी नामदेव ढसाळ यांच्या उपचारांसाठी पाच लाख रुपयांची मदत बॉम्बे हॉस्पिटलच्या अकाउंट वर जमा केली. त्यांचे पाहून सलमान खान यांनी १ लाख रुपयांची मदत केली या नंतर इतर आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते यांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. अशा प्रकारे नामदेव ढसाळ यांच्या उपचारांसाठी सुमारे ३० लाख रुपये जमा झाल्याचे सांगितले जाते.

 

६. या घटनेतून आंबेडकर चळवळीने काय शिकले पाहिजे?

या संपूर्ण घटनेतून तीन महत्त्वाचे संदेश मिळतात.

पहिला संदेश — चळवळीतील नेतृत्वाची ताकद!

ज. वि. पवार साहेबांनी आपले पद, अनुभव, बुद्धिमत्ता आणि बँकिंग व्यवस्थेचे ज्ञान वापरून एका मोठ्या कलाकाराला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत केली. यावरून चळवळीतील नेत्यांकडे केवळ आंदोलन करण्याची नव्हे, तर व्यवस्था समजून घेऊन समाजासाठी मार्ग काढण्याची क्षमता असली पाहिजे, हे दिसते.

दुसरा संदेश — मतभेद असले तरी माणुसकी संपता कामा नये!

नामदेव ढसाळ आणि ज. वि. पवार यांच्यात मतभेद होते. तरीही नामदेव ढसाळ संकटात असताना पवार साहेब त्यांच्या मदतीला धावून गेले. ही बाब प्रत्येक चळवळीतील कार्यकर्त्याने समजून घेतली पाहिजे.

चळवळीतील मतभेद हे विचारांचे असावेत; माणुसकीचे नसावेत.

तिसरा संदेश — केलेल्या उपकाराची परतफेड प्रसिद्धीने नव्हे, तर माणुसकीने होते!

ज. वि. पवार यांनी अमिताभ बच्चन यांना मदत करताना प्रसिद्धीची अपेक्षा ठेवली नव्हती. पण पुढे त्याच अमिताभ बच्चन यांनी पवार साहेबांच्या मित्राच्या उपचारांसाठी मदतीचा हात पुढे केला.

ही केवळ आर्थिक मदत नव्हती, तर एका माणसाने दुसऱ्या माणसाच्या संकटात दाखवलेल्या संवेदनशीलतेचा प्रत्यय होता.

शेवटचा विचार...

ज. वि. पवार यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि अनुभवाच्या जोरावर अमिताभ बच्चन यांना त्यांच्या कठीण काळात मदतीचा मार्ग दाखवला. पुढे अमिताभ बच्चन यांनी त्याच ज. वि. पवार साहेबांच्या मित्रासाठी, पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या उपचारांसाठी पाच लाख रुपयांची मदत केली.

एकाने दुसऱ्याला संकटात आधार दिला आणि दुसऱ्याने त्याच माणसाच्या मित्राला संकटातून बाहेर काढण्यासाठी हात पुढे केला!

म्हणूनच माझ्या मते, आंबेडकरी चळवळ ही केवळ रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी चळवळ नाही. ती बुद्धी, विचार, मैत्री, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीच्या जोरावर मोठमोठ्या संकटांवर मात करू शकणारी चळवळ आहे.

आज आंबेडकर चळवळीतील प्रत्येक नेत्याने ज. वि. पवार यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. आपल्याकडे सत्ता नसली तरी बुद्धिमत्ता असू शकते. मोठे पद नसले तरी संपर्क असू शकतो. पैसा नसला तरी समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छाशक्ती असू शकते. आंबेडकर चळवळीचा नेता तोच, जो केवळ समाजाला संघर्ष करायला शिकवत नाही, तर समाजातील माणसाला संकटातून बाहेर काढण्यासाठी स्वतःही उभा राहतो!

ज. वि. पवार साहेब आणि अमिताभ बच्चन या दोघांच्या माणुसकीला सलाम!

 विलासभाऊ रुपवते यांनी ज.वि पवार साहेब यांना एक महत्वाचा प्रश्न विचारला की, आता अमिताभ बच्चन यांना तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे का? यावर ज .वि पवार यांनी सांगितले की, माझे वय आता ८३ झाले आहे आणि अमिताभ बच्चन साहेब यांचे वय ८० च्या पुढे आहे त्यांनी मला भेटण्यासाठी वेळ दिला तर मी नक्की त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भेटेन.

अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत मी तुमची इच्छा नक्की पोहोचावेन.

 

जय भीम! जय संविधान!

विलासभाऊ रूपवते

दुर्बल सोशित पिढीत वंचित घटकांचे नेते

9664757926