मुंबई (प्रतिनिधी): गोर गरीब सामान्य जनतेसाठी निदान दोन चार तास तरी लोकल ट्रेन सुरू करा या मागणीसाठी काल २७ जुलै २०२१ रोजी जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या वतीने आज मुंबईत विना तिकीट लोकल प्रवास आंदोलन करण्यात आले. जनता दलाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव रवि भिलाणे, मुंबई महासचिव ज्योती बडेकर,मुंबई सचिव संदेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलना दरम्यान पक्ष प्रतिनिधी आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबईच्या विविध भागात विना तिकीट लोकल प्रवास केला.
“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची अपरिहार्यता लक्षात घेऊन गेल्या दोन वर्षापासून सर्व जगातील लोकांचं आयुष्य एकाच जागी स्थिर झालं आहे. पण ही स्थिरता मानसिक आणि आर्थिक अस्थिरता आणणारी आहे. जेंव्हा आवश्यकता होती तेंव्हा लोक घरी सुद्धा राहिले पण कोरोना वर हळू विजय मिळवल्यावर काम धंदा पुन्हा सुरु झाला आणि पुन्हा एकदा लोकांना बसने प्रवासाची मुभा मिळाली असली तरी हे पुरेसं नाहीये. बसचा प्रवास हा फार वेळखाऊ आणि मोठ्या जनसंख्येसाठी त्रासदायक आहे. सर्व सामान्यांना शासकीय वाहनांशिवाय पर्याय नसतो अशावेळी गोर गरीब कामगार हा बसची वाट पहात तासनतास बसच्या रांगेत ताटकळत उभा असतो. अशा सर्व सामान्य जनतेसाठी निदान दोन चार तास तरी लोकल ट्रेन सुरू झाली तर त्यांना थोडा दिलासा मिळेल, त्यांना होणारा त्रास कमी होईल. सरकारने लोकल सेवा पुन्हा सर्व सामन्यांसाठी सुरु करण्यासाठी आम्ही आज लोकलने विना तिकीट प्रवास आंदोलन करत आहोत,” असं जनता दलाच्या मुंबई महासचिव ज्योती बडेकर यांनी इतिवृत्तशी बोलताना सांगितलं.
आंदोलनानंतर पक्षाच्या वतीने चर्चगेट येथील पश्चिम रेल्वे मुख्यालयात रेल्वे महाप्रबंधक यांना भेटून निवेदन सादर करण्यात आलं. महाप्रबंधक यांचे सचिव गगन यांनी जनतेची मागणी सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिल्याची माहिती जनता दलाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव रवि भिलाणे यांनी इतिवृत्तला दिली. सरकारने गोरगरीब सामान्य जनतेसाठी लवकरात लोकल ट्रेन सुरू केली नाही तर प्रत्येक रेल्वे स्टेशनवर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा रवि भिलाणे यांनी दिला आहे.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.