हिदी सिनेमातील प्रसिध्द अभिनेते धर्मेंद्र यांची नक्कल करताना बहुतांश नकलाकार त्यांच्या शैलीत एक संवाद कायम म्हणत आलेत तो म्हणजे “कुत्ते कमीने मै तेरा खून पी जाऊंगा…” धर्मेंद्र आणि त्यांचा लोकप्रिय संवाद आठविण्याचे कारण दिल्लीत नुकतीच पार पडलेली आंतरराष्ट्रीय एआय परिषद. भारताआधी युके, सेऊल व फ्रान्स इथे या परिषदा भरल्या होत्या.
मोदी सरकारने नेहमीच्याच उत्सवी स्वरूपात, वातावरणात ती पार पाडली. दर दोन वर्षांनी भरणाऱ्या परिषदेचं यजमानपद हे जी – ट्वेंटी प्रमाणेच आणखी एक यजमानपद. पण मोदी सरकार अशा नित्य गोष्टींना बहुमान वगैरे समजत जोरजोरात ढोल पिटत असते. एक साधं उदाहरण. आजवर ज्या तीन देशांनी यजमानपद भूषवलं त्या तिन्ही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी वा परिषदेच्या जागी परिषदेचा जो लोगो, बोधचिन्ह होतं त्यावर ए आय समीट व ठिकाण एवढेच लिहिलेले होते. भारतात मात्र सर्वत्र मोदींची छबी झळकली. ज्याबद्दल सहभागी सदस्य देश व प्रतिनिधी यांना या अशा प्रसिध्दीची गंमत वाटली. मोदी व डंका हे समानार्थी शब्द आहेत याची भारतीयांना सवय झालीय. जागतिक मंचावर मात्र याकडे जरा ‘अतिच आहे’ अशा कटाक्षाने पाहिले जाते. असो.
ही परिषद भारतीयांसाठी
उत्सुकतेची होती कारण ए आय हा सध्याचा बहुचर्चित विषय. तंत्रज्ञान, त्याची अद्भूत शक्ती, त्याच्या आविष्काराने
बदलणारी व्यावसायिक गणिते. रोजगारावर होणारे परिणाम अशा विविध विषयांच्या अनुषंगाने या
क्षेत्रात काम करणारे, या क्षेत्राविषयी औत्सुक्य असलेले, विशेषत: विद्यार्थीवर्ग व
रोजगार संधीच्या शोधातील नवउद्यमी. अशा सर्वांनी जत्रा अथवा लिट वा म्युझिक फेस्टला गर्दी
करावी तशी इथे गर्दी केली. कारण देशोदेशातील या क्षेत्रातील अनेक दिग्गज इथे सहभागी
होणार होते व जगभरातील ए आय मधील नवनवीन उत्पादने, प्रयोग पहायला मिळणार
होती. वरील
सर्व अनुषंगाने काही एक प्रमाणात ही परिषद यशस्वी झाली, असे म्हणता येईल. मात्र या जमेच्या बाजू
झाकोळून जातील अशा ज्या दोन, तीन गोष्टी घडल्या त्याने या परिषदेची चर्चा नको त्या अंगाने जगभर
गेली.
त्यात पहिल्याच दिवशी
पंतप्रधानांच्या उपस्थितीने सुरक्षेच्या अतिरेकाने ‘मंडपम्’ ज्या
पध्दतीने रिकामा करण्यात आला तो भारतीयांसह इतर देशीय प्रतिनिधींना तापदायक ठरला. याशिवाय ट्रॅफिक जाम व
प्रदूषणाने पाहुणे हैराण झाले. बिल गेटस भारतात असूनही दिल्लीत अनुपस्थित राहिले त्यामुळे एप्स्टीनच्या
वादळाचा तडाखा परिषदेला बसलाच.
हे कमी की काय म्हणून या
परिषदेत मोदी सरकारच्या खास मेहेरनजरेने सरकारी मदत, नॅकची रॅंक, युजीसीची अनुदाने यांची
लयलूट करणाऱ्या नोएडा स्थित गलगोटिया नामक खासगी विद्यापीठास एक भव्य
दालन दिले होते. या विद्यापीठात ए आयचा विशेष विभाग आहे. या विभागाने दोन अशी
उपकरणे प्रदर्शित केली जी या विद्यापीठाची संशोधनात्मक निर्मिती म्हणून सांगितली
गेली. त्यातला
सर्वात चर्चिला गेला व बदनाम झाला तो एक रोबोटिक श्वान! ‘ओरियन’ नामक हा श्वान गलगोटियाचा आविष्कार म्हणून विद्यापीठाने
साभिमान मिरवला. सरकारी वाहिनीने त्याची बातमी केलीच पण या खात्याच्या
केंद्रिय मंत्र्यांनीही विद्यापीठाची वाहवा करणारे गौरवोद्गार समाज माध्यमावर
स्वनामे व्हायरल केले. आणि काही क्षणातच चीनने हे आमचे व्यावसायिक उत्पादन असून बाजारात अडिच लाख डॉलरमध्ये
उपलब्ध आहे असं सप्रमाण समाज माध्यमाद्वारेच जगाला सांगितलं आणि भारतीय
ए आयचा टांगा पलटी होऊन घोडे फरार झाले! न भूतो न भविष्यती अशी नाचक्की यजमानांची
झाली. सरकारसह
मंत्रीही तोंडघशी पडले. यानंतर गलगोटियाचा गाशा गुंडाळला गेला लगेचच पण बुंदसे गई
वो हौदसे थोडी आती?
गलगोटियाचा डॉगी क्षणार्धात
देशी कुत्ता झाला यजमानांसाठी. पण तो कृत्रिम प्रज्ञेचा असल्याने कुत्ता कमीना जरी ठरला तरी त्याचं खून पिना
शक्य नसल्याने हात चोळणे, चेहरा लपवणे व गलगोटियाच्या अतिउत्साही प्राध्यापिकेचा बळी
घेऊन हे प्रकरण जाजमाखाली ढकलले गेले.
शेवटचा वार कॉंग्रेसच्या
कार्यकर्त्यांनी ‘मोदी कॉम्प्रमाईज्ड’ अशा घोषणा देत तसे टी- शर्ट घालून व काढून परिषदेच्या
मंचावरच धडक दिली. सरकारीआंतरराष्ट्रीय कार्यक्रमात थेट पंतप्रधानांचाच निषेध हा गेल्या बारा
वर्षातला पहिलाच असावा. यामुळे
मोदींचा राग पराकोटीला गेला व त्यांनीही कॉंग्रेसवर सरकारी कार्यक्रमातच पक्षीय पातळीवरची नागवी टिका केली. भक्तांसाठी जशास तसे
उत्तर!
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उत्सवाचा समारोप शेवट विवेकशून्य बुद्धिहीनतेने झाला!
ताजा कलम:
पाकिस्तानचा पूर्व सत्ताधीश व
पूर्व क्रिकेटपटू इम्रान खान भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली तुरूंगात आहे. त्याची प्रकृती चिंताजनक झालीय
अशा बातम्या जगभर प्रसृत झाल्या. त्या वाचून गावसकर व कपिलदेव यांना आपल्या खेळाडू मित्राविषयी
कणव दाटून आली व त्यांनी इम्राननिषयी चिंता व्यक्त केली.
गावसकर व कपिल यांची सहृदयता उमर खालिदसह
इतर विनाआरोप तुरूंगात डांबलेल्यांच्याही वाट्याला येईल का?
संजय
पवार
(लेखाविषयी आपले मत Comment बॉक्समध्ये नक्की नोंदवा.)




0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.