लेखिका - सुरेखा पैठणे


नियंत्रण नसलेली राजेशाही सरंजामशाही दास्याचे शिल्पकार तर असतातच, परंतु धर्मसत्ता तिची अनियंत्रितता हीही त्याला कारणीभूत असते

भारतातील धार्मिक गुलामगिरी सनातन आहे. तिला अधूनमधून हादरे बसले; परंतु पुन्हा ती आपल्या सर्व ताकदीनिशी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून राहिली. अमेरिकेतील किंवा आफ्रिकेतील गुलामगिरीपुढे भारतीय गुलामगिरी  क्षुल्लक आहे असे सांगताना भारतात धर्म आणि जातवास्तव पातळीवर मूळ धरून असणाऱ्या गुलामगिरीला कमी लेखलं गेलं. भारतीय अस्पृश्यांचा मानसिक छळ निग्रोंपेक्षाही तीव्र स्वरूपाचा आहे; कारण निग्रोंच्या छळाला धार्मिक आधार नाही तो अस्पृश्यांच्या छळाला आहे. धर्मशास्त्राच्या नावावर भारतात राजरोसपणे धार्मिक गुलामगिरी लादणे शक्य झाले. अस्पृश्य हा त्याचा बळी ठरला. अस्पृश्यांची वेठबिगारी, गावकीची कामे ही ह्या गुलामगिरीचीच रूपे होत. या गुलामगिरीला अंत नव्हता अगदी मृत्यूनेही सुटका नव्हती कारण वारसा म्हणून त्यांच्या मुलांनाही हीच कामे करावी लागत. पशूंपेक्षाही हीन मानला जाणारा अस्पृश्य वर्ग ह्या गुलामगिरीच्या चिखलात फसला होता. त्याचे मनुष्यत्व, त्याचे नागरिकत्व नाकारले गेले होते. त्याचे इच्छास्वातंत्र्य हिरावून घेतले होते. त्याचे आत्मोन्नतीचे मार्ग बंद करण्यात आले होते. चुकून एखादा हक्काची भाषा बोलू लागला तर त्याला बंडखोर ठरवून त्याच्यावर, त्याच्या कुटुंबीयांवर अत्याचार करायचा, त्याची मुस्कटदाबी करायची. त्याची स्त्री आपल्या मालकीची आहे म्हणून तिच्यावर हक्क स्थापित करण्यासाठी तिचे अस्तित्वच खुडून टाकायचं आणि हे सारं शतकानुशतके निमूटपणे ह्या थोर भारतवर्षातील एक अख्खा मानवी समूह सहन करत राहिला. पेशवाईच्या काळात तर अस्पृश्यता आपल्या कळसशिखरावर विराजमान झाली होती. पदरी फौजफाटा आणि गुलामांचा ताफा बाळगून. पेशव्यांच्या काळात सोवळंओवळ, स्पृश्यअस्पृश्य यातील भेदरेखा आणखीच गडद होत गेली.

ह्या अमानुष गुलामगिरीची जाणीव व्हायला एकोणिसाव्या शतकाची पहाट व्हावी लागली अन् क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले नावाचा सूर्य उगवला. ह्या सूर्यप्रकाशात अस्पृश्यांना आपण जितीजागती माणसे आहोत ही जाणीव झाली. महात्मा फुलेंच्या, ‘गुलामगिरी’, ब्राह्मणांचें कसब’, या ग्रंथात त्यांनी भारतातील गुलामगिरीची पाळंमुळं धुंडाळली अन वर्तमान अस्पृश्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिलीच पण सकल स्त्रीवर्गाच्या उद्धारासाठी स्त्रीशिक्षणाच्या वाटा मोकळ्या केल्या.आणि गावकुसाबाहेरच्या महारा-मांगाच्या स्त्रीलाही या वाटेने हात धरून चालवले. त्यासाठी स्वतःच्या पत्नीलाही सोबत घेतले. सावित्रीबाई फुलेंना थोर सामाजिक युगनायिकेचा खिताब देऊन आपण त्यांनी जगण्यातून मांडलेल्या स्त्रीवादाला अनुल्लेखाने मारतच आलोय की. जिच्या जन्म घेण्याने भारतातील स्त्री स्त्रीवादाच्या व्याख्येत बसू लागली. माणूस म्हणून जगणं शिकू लागली. ही जगाच्या इतिहासात नोंद घेतली जावी एवढ्या मोठ्या क्रांतीची ही सुरुवात होती.. ह्याच क्रांतीचे फूल म्हणजे मुक्ता साळवे होती. मुक्ता साळवे हीच भारतीय समतामूलक स्त्रीवादाचा सर्वंकश असा आवाज होती. तिच्या निबंधात तिने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आजही इथल्या सकल स्त्रीवादाचा पान्हा ओढणाऱ्या कोणत्याही अभ्यासकाला, कार्यकर्त्यालाही देता आली नाही. ..१८५५मध्ये मुक्ताचा निबंध मांग महारांचे दुःख", ज्ञानोदयमध्ये प्रकाशित होतो जेव्हा सिमोन बोव्हचा जन्मही झालेला नव्हता आणि आंतरराष्ट्रीय स्त्रीवादाला वाचाही फुटलेली नव्हती. तिच्या इवल्याशा निबंधात ती अस्पृश्य म्हणून तिच्या समाजाच्या वाट्याला आलेल्या दुःखाने व्यथित होते कारण ती त्या समाजाचाच एक अविभाज्य भाग आहे. तसेच ज्या धर्मसत्तेमुळे तिच्या संपूर्ण समाजावर ही अस्पृश्यता लादली त्या धर्मसत्तेलाही ती जाब विचारते. आणि अस्पृश्य स्त्री आहे म्हणून तिला बाळंतपणाच्या साध्या वैद्यकीय सुविधा, उबदार आडोसाही मिळत नाही म्हणून ती समाजव्यवस्थेला प्रश्न विचारते. म्हणूनच मला एकूणच स्त्रीवादाच्या अंगाने विचार करत असताना मुक्ता साळवे हाच भारतीय दलित स्त्रीवादाचा समतामूलक हुंकार असल्याचे दिसून येते.

मग येतात ताराबाई शिंदे. ताराबाई आपल्या ,'स्त्री-पुरुष तुलना' ह्या ग्रंथात ब्राह्मणी पितृसत्ताक परंपरेवर कठोर भाषेत ताशेरे ओढतात. परंपरागत स्रीधर्म सांभाळत असताना वाट चुकलेल्या पती परमेश्वरालाही जाब विचारले गेले. धर्मग्रंथातील उदाहरणे घेऊन स्त्रीच्या पुनर्विवाहाची मागणी त्यांनी केली. हा समतेच्या प्रवाहाकडे घेऊन जाणारा स्त्रीवाद मांडणाऱ्या ताराबाईंचा विसर इथल्या स्त्रीवाद सांगणाऱ्या स्त्रीला का पडत असावा? धर्मसत्तेमुळे निर्माण झालेल्या गुलामगिरीविरोधात बोलण्यासाठी आजही धाडस लागते. एवढं करूनही गावकुसाबाहेरची स्त्री कोणत्याही प्रवाहात नव्हती आणि कारण गावकुसाचा बाट अजूनही होत होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “अस्पृश्यता ही हिंदूधर्माच्या तत्त्वज्ञानातच समाविष्ट आहे म्हणून बाह्य आचारात जरी नाईलाज म्हणून लोकांनी अस्पृश्यता पाळली नाही तरी ती त्यांच्या मनातून निखळून पडली आहे असे समजू नये”.

भारतीय अस्पृश्यांची गुलामगिरी दूर करण्यासाठी भारतातील लोकांनी स्वयंप्रेरणेने काहीही पुढाकार घेतला नव्हता. अपवादात्मक अपवाद वगळता जो तो आपापल्या जातीच्या रिंगणात बंदिस्त होता. कोणीच आपली पायरी सोडून गावगाडा बदलायला तयार नव्हते. पुन्हा इथे धर्मसत्ता बलवान ठरते. अशात हे काम केले भारतीय राज्यघटनेने. बाबासाहेबांनी दिलेय अभूतपूर्व लढ्याचा परिपाक म्हणजेच ही घटना होय. आणि बुद्धधम्माचा स्वीकार म्हणजे ही धर्मसत्तेने लादलेली गुलामगिरी त्यागण्याचाच एक भाग होता. बाबासाहेबांचा लढा, बाबासाहेबांचे विचार घेऊन जशा दलित चळवळी उभ्या राहिल्या अगदी तीच प्रेरणा घेऊन दलित स्त्रीवादाची चळवळही उभी राहिली. दलित स्त्री तशी उंबरठ्याच्या आत कधीच कोंडल्या गेली नव्हती. तिच्यावर सवर्ण स्त्रीप्रमाणे कोणत्याही कर्म-रूढी-परंपरा पाळण्याचा वचकही नव्हता. शंकरराव खरात यांच्या महाराष्ट्रातील महारांचा इतिहासया शोधग्रंथात त्यांनी महार स्त्रीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या,सोडचिठ्ठी, दुसरे लग्न, गाठीचे लग्नआदी प्रघातांचा उल्लेख केला आहे. यात दुसरे लग्न या प्रकारात पाटाचे लग्न, गांधर्व आणि मोहतुर लावणे यामध्ये विधवा स्त्री, नवऱ्याने सोडलेली किंवा पटलेला नवरा सोडून आलेली स्त्री दुसरे लग्न करू शकत असे असे मांडले आहे. म्हणजेच ज्या काळात सवर्ण स्त्री जरठबाला विवाह, बालविधवा, केशवपन, सतीप्रथा यात होरपळत होती तिथे ह्या दृष्टीने गावकुसाबाहेरची स्त्री मोकळी होती. पण अस्पृश्यतेची भीषणता आणि घरातील अठराविश्वे दारिद्र्य यांनी ती पार गांजली गेली होती. ह्या अस्पृश्यतेच्या वणव्यात तिचे घरदार तिचा समाज भाजून निघत होता. यामागे असणारी धर्मसत्ता कसे काम करते हे गुलामीचे वाहक असणाऱ्या गुलामांना कसे कळणार? डॉ. बाबासाहेबांच्या मानवमुक्तीच्या लढ्याने मात्र ह्या शतकांच्या अजगरी विळख्याला हात घातला. आणि हा विळखा सैल करण्याचे युगकार्य आरंभिले. पहिल्यांदाच दलित समाज आपल्या माणूसपणाच्या लढाईसाठी मैदानात उतरला आणि याच लढ्यापासून दलित स्त्रीची खऱ्या अर्थाने अस्तित्वाच्या घुसळणीची लढाई सुरू झाली. पण ह्याची बीजे धर्मांतरापूर्वी बाबासाहेबांनी जे लढे दिले होते, हिंदू धर्माला धडका देण्यासाठी जी जी आंदोलने केली होती, जेवढे मोर्चे काढले होते त्या साऱ्यात दलित स्त्रीचा सहभाग महत्त्वाचा होता. मग तो काळाराम मंदिर सत्याग्रह असेल, महाड चवदार तळे सत्याग्रह असेल वा बाबासाहेबांनी केलेले जाहीर भाषण असेल. तिथे तिथे आपल्या फाटक्या लुगड्याला गाठी मारून ही स्त्री जात राहिली आणि बाबासाहेबांचा विचार घेऊन गावकुसात परतत राहिली. याच काळातील भाषणात बाबासाहेबांनी ह्या स्त्रियांना उद्देशून केलेल्या सूचनांचे पालन तर तिने कसोशीने केले. आपल्या राहणीमानात बदल केले, गुलामीची प्रतीके असणाऱ्या दागिन्यांच्या त्याग केला. बाबासाहेबांचा एकेक विचार तिच्यासाठी जीवनविचार ठरला. घरचे आठरविश्वे दारिद्र्य जोडीला गावकीची कामे, गावाचा धाक हे सारं असूनही ती आपल्या समाजातील पुरुषांच्या बरोबरीने ह्या प्रवर्तक लढ्यात उतरली कारण बाबासाहेबांनी दाखवलेल्या ह्या मुक्तिपथावर चालून तिला तिच्या समाजाला माणूस म्हणून जगण्याची वाट गवसणार होती. आजही कोणतेही आंदोलने उचलून पाहा, यात दलित स्त्रीचा वाटा बरोबरीने असतो. नामांतर लढा असेल, खैरलांजी आंदोलन असेल प्रत्येक अन्यायाविरुद्ध तिने तिचा आवाज बुलंद केलेला आहे. त्यामुळेच आंबेडकरी दलित स्त्रीला वेगळ्या वाटा शोधाव्या लागल्या नाही.

भारतातील स्त्रीवाद हा केवळ सुखवस्तू घरातील स्त्रीचाच स्त्रीवाद राहिला आहे कारण केवळ घरातील कामांची वाटणी आणि कपडेलत्ते घालण्यासाठी चाललेला हा अट्टहास आहे. स्त्रीवादाचा जयघोष करीत  असताना ती इथल्या धर्मसत्तेने स्त्रीवर, स्त्री स्वातंत्र्यं अर्हतिम्हणत लादलेल्या गुलामगिरीवर भाष्य करीत नाही. ती तिच्या आणि गावकुसाबाहेरील स्त्रीच्या असलेल्या सामाजिक अंतरावर बोलत नाही. त्यामुळेच इथल्या सवर्ण स्त्रीचा स्त्रीवाद ना गावकुसात आला ना झोपडपट्टीत. ह्या सामाजिक भेदाचा, बेगडी स्त्रीवादाचा समाचार लेखिका संध्या नरे पवार यांनी त्यांच्या,तिची भाकरी कोणी चोरलीह्या  शोधग्रंथात घेतला आहे. तसेच,आम्हीही इतिहास घडवलाह्या मीनाक्षी मून आणि उर्मिला पवार संपादित ग्रंथात दलित स्त्रीची चळवळ संग्रहित आहे. दलित स्त्रीची आत्मकथने बाहेर येऊन गावकुसाबाहेरच्या स्त्रीचे म्हणणे मांडू लागली होती. पेठेतील गुलजार स्त्रीवाद हा आमचा स्त्रीवाद नाहीच...

स्त्री ही दलितांमधील दलित, शोषितांमधील शोषित, वर्णाश्रमधर्म मान्य केला तर स्त्रीचा वर्ण पाचवा, असा युक्तिवाद मांडणाऱ्या स्त्रिया समस्त भारतीय स्त्रियांसाठी एकच स्त्रीवाद मांडतात पण गेट-टूगेदर, कुळाचार यांच्या नावाखाली स्वतःचे सवर्ण अस्तित्व अबाधित राखतात. सवर्ण सुप्रीमसी पुरुषांच्याही पेक्षा ही सवर्ण स्त्री तिच्या खानपानातून, तिच्या वागण्याबोलण्यातून, तिच्या घराच्या ठेवणीतून सांभाळत आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, स्त्रिया जातिव्यवस्थेचे द्वार आहे, ब्राह्मण स्त्रीच्या पोटी जन्मलेल्या मुलाला ब्राह्मण म्हटले जाते तर महार किंवा इतर अस्पृश्य दलित जातीच्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलेले मूल तिच्या जातीचा शिक्का घेऊनच जन्माला येते.मग ह्या जातीच्या कप्पेबंदीवर सवर्ण स्त्री कुठेच बोलत नाही. केवळ सहानुभूतीने दलित स्त्रीच्या प्रश्नांकडे पाहिले जाते. मग ते प्रश्न कुटुंबातील हिंसाचार असो वा तिची लैंगिक आयडेंटिटी अथवा तिची लैंगिक भूक असो.. आणि यावर चर्चा कोण झोडणार तर माझ्या सवर्ण भगिनी.. ओक्के नो प्रॉब्लेम; पण   माझी नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या गावच्या गढ्या, माड्या, वाड्या  यांच्या चौकटीच्या आत जो घरंदाज स्त्रीवाद मूळ रुजवून आहे, त्याला बाहेर उचकटून फेकावा आणि मग मुंबई-पुण्यासारख्या मेट्रोपोलिटिन सिटीत स्त्रीवादाचा भंडारा उधळावा.. आणि हो गावगाड्याची रचना नीट एकदा पाहावी, आणि आपल्या बापाला विचारावं की बापा आपली घरं अशी टुमदार आणि उंचावर का असतात?.. महारवाडा, मांगवाडा अशी गावाच्या शेवटी का असतात?  आणि आपल्या डोक्यावरचा पदर ढळू देणाऱ्या दुधातुपाचा तवंग अंगाखांद्यावर मिरवणाऱ्या आईलाही विचारावं की आई तुझ्या अंगणात डोलणारी तुळस महारवाड्यात का नाही रुजली गं?.. मग आम्हाला स्त्रीवाद सांगावा..



तर ह्या माझ्या स्त्रीवादी भगिनीला मी सांगू इच्छिते की आमच्या बाया कधीच माजघरात नव्हत्या. आमची चूल सपरात घराच्या सुरुवातीला असते. त्यामुळे होतं काय की अंगणात कोण आलं गेलं त्याची माहिती द्यायला आमचा दादला हाळी देत नसतो, उलटपक्षी तोच उठून पाव्हन्याला तांब्याभर पाणी देतो आणि हो त्यामुळे सगळ्या गावगप्पात आमच्या बाईची थेट भागीदारी असते. 'तुला काय समजतं, बायांनी असल्या प्रश्नांत नाक खुपसायचं नाही' असले पुरुषप्रधान प्रश्न आम्ही आयकलेच नाही.. आमची गावखेड्यातील बाई रोजानं कामाला जाती शेतात मजुरी करायला, तिच्या पायाचा नखच काय पण पोटरी दिसेल असं लुगडं वर खोवलेलं असतं, त्याशिवाय शेतात काम करता येत नाही . आता घरंदाज बायांची नखं दिसू देण्याची मेहनत आणि डोईवरचा पदर हा कसा असणार आमच्या माथ्यावर सांग बरं..  आम्हाला बाबासाहेब कुण्या फुळकवणीने झिरपला नाही तर तो थेट आमच्या गावकुसाबाहेरच्या वस्त्यात येऊन आदळला त्यामुळे मोर्चे, आंदोलने, धर्मव्यवस्था आणि जातीव्यवस्थेने केलेलं आमचं शोषण हे आम्हला एका  आंबेडकर विचाराने सांगितले.. हे झालं गावखेड्यातील; पण ही पाळंमुळं महत्त्वाची आहेत ना कारण तीच आपली नाळ आहे नाही का..

हाच दलित वर्ग पोटापाण्यासाठी शहरात आला आणि शहरात झोपडपट्टीत सामावून गेला.. मग आमच्या झोपडपट्टीची नावं प्रबुद्ध नगर, क्रांती नगर, आंबेडकर नगर अशीच असणार ना?  तिथे रिव्हर हूड, किंवा फ्लॉवर वॅली अशी नसणारच.. आमच्या वस्तीतील बाई तिचे कुटुंब चालावे म्हणून तुमच्या घरची धुणीभांडी करू लागली, (ओह् पोळ्या करणाऱ्या मावशी थोड्या सवर्ण असतात) कारण तिच्या नवऱ्याच्या कमाईतून तिच्या घरचा खर्च भागणार नसतो.. आता तिचा नवरा काय काम करतो तर तो, रस्त्यावरची घाण उचलतो, तुमचे ड्रेनेज साफ करतो, संडासाच्या टाक्या तुंबल्या तर तोच उतरतो त्या टाकीत.. मग ह्या घाणीत उतरताना तो एक देशी रिचवून येतो आणि मग उतरतो.. घरी गेल्यावर इथल्या समाजव्यवस्थेचा राग काढायला त्याची हक्काची बायको असते मग त्याच्यापर्यंत झिरपत आलेली पितृसत्ताक व्यवस्था तो घरात जाऊन पालथी करतो.. बरं मारहाण झाल्यावरही दुसऱ्या दिवशी आपल्या नवऱ्याला विडीकाडी आणि दारूसाठी पैसे देणारी बाईही इथेच असते. तर तू म्हणशील की तिला जाणीव नाहीय. तसे नाही तिला माहीत आहे तिची लढाई इथली धर्मव्यवस्था आणि जातिव्यवस्थेच्या विरोधात आहे आणि तिचा अख्खा समाज ही लढाई लढतोय.

उर्मिला पवार आपल्या 'आयदान'मध्ये म्हणतात, दलित स्त्रीची लढाई ही दुस्तर स्वरूपाची आहे. तिला एकाच वेळेस इथल्या व्यवस्थेलाही तोडायचंय आणि घरादारालाही सांभाळायचंय..'  जसा काळ्या स्त्रीला तिची लढाई लढण्यासाठी काळा स्त्रीवाद पुढे आणावा लागला अगदी तसाच  दलित स्त्रीला तिचा लढा लढण्यासाठी दलित स्त्रीवाद पुढे मांडावा लागला... कारण नुसता भगिनीभाव मनात ठेवून ही समतेची वाट चालता येत नाही.. कारण स्त्रीवादाच्या बैठका संपल्यावर तुझी वाट सुखवस्तू घरात जाते तर माझी वाट वाडी- वस्तीकडे जाते... जिथे तुळस नसते, पारिजात नसतो, दुधातुपाचा रतीब नसतो, पैठण्या नसतात.. असतो तो भाकरीचा प्रश्न आणि हा प्रश्न इतका मोठा असतो की त्या प्रश्नापुढे वाईन, सिगारेट, ऑर्गजम, ओपन सेक्स, पुरोगामी वर्तुळ ह्या चर्चा वांझ ठरतात.. आमची बाई कधीच सात पडद्याच्या आड दडली नाही. तिला पटलेला नवरा टाकण्याचं स्वातंत्र्यही होतं आणि आवडलेला नवरा करण्याची ही मुभा होती..

दलित चळवळीच्या कार्यकर्त्या आणि पत्रकार सिंथिया स्टीफन्स दलित स्त्रीवादाची मांडणी करताना म्हणतात की,” The evolution of feminism in India is marred by casteism and classism. The core values and experiences of Dalit-Bahujan women are very different from mainstream feminists. To add to it, mainstream feminists have not even acknowledged them. As a result there is a need for a different language for Dalit-Bahujan women to voice their experiences and shape their struggles.

दलित स्त्रीवादी कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्ती रजनी तिलक  स्त्रियांमधील भेद त्यांच्या कवितेतून नेमक्या शब्दांतून स्पष्ट करतात.

तुम्हारे कानों को सुनाने के लिए बजा रही हूं ढोल सुनो,

कुछ तो सुनो

मैं कह रही हूं सालों से

मैं जहां रहती हूं वहां शौचालय नहीं,

पीने का पानी नहीं

बुझे हुए माहौल में

चुराई छिपाई बिजली के नंगे तार हैं

तुम्हारा बहनापा किस काम का

जिसमें मेरा दुःख शामिल नहीं

तुम्हारी स्त्री मुक्ति की लड़ाई किस काम की

जिसमें मेरी लड़ाई शामिल नहीं।

तुम्हारे मेरे बीच जमीन आसमान का फर्क है

तुम लड़ती हो अपनी पहचान के लिए

लड़ती हूं मैं स्वाभिमान के लिए।

हा सामाजिक भेद आपल्याला समजून घेऊन मुख्य प्रवाहातील स्त्रीवादाची नव्याने मांडणी करावी लागेल आणि ह्या मांडणीसाठी सवर्ण स्त्रीला तिच्या जातीने तिला बहाल केलेल्या गुबगुबीत सुरक्षित अशा सांस्कृतिक कोशातून बाहेर यावे लागेल. तेव्हा कुठे ही लढाई समष्टीची लढाई होऊ शकेल.

 

तेव्हा सप्रेम जयभीमच …!

 

संदर्भ : ) महाराष्ट्रातील महारांचा इतिहास : शंकरराव खरात

 

          ) पेशवेकालीन गुलामगिरी अस्पृश्यता : डॉ. पी. . गवळी

-- सुरेखा पैठणे

(हा लेख जून २०२० मध्ये मुक्त शब्द या अंकात छापुन आला आहे.)