आज बातमी वाचली की मराठा आरक्षणासाठी मराठ्यांच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण करण्यासाठी घरोघरी जे लोक जात आहेत ते फार विचित्र प्रश्न त्यांना विचारत आहेत.

अशा प्रश्नांमधून तो मराठा माणूस मागास आहे हे कसं कळेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हे प्रश्न काही विशिष्ट हेतूने आणि मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही म्हणून विचारले जात आहेत असा एक आक्षेप घेतला जात आहे. ते प्रश्न वाचल्यावर आपल्याही मनात यातून मागासलेपण कसं सिद्ध होणार असे प्रश्न उपस्थित होतात. ते प्रश्न आर्थिक मागासलेपण मोजायला योग्य नाहीत हे खरं असलं तरी तेच प्रश्न कोणत्याही समाजातील व्यक्तीचं वैचारिक, मानसिक आणि मोठ्या परिप्रेक्ष्यात सामाजिक मागासलेपण मोजायला नक्कीच कामी येऊ शकतात. इथे मी ‘कोणत्याही’ समाजातील व्यक्ती विषयी बोलत आहे हे नमूद करावं. कारण वैचारिक, मानसिक मागासलेपण हे धनाढ्यांच्या, उच्चभ्रूंच्या आणि (तथाकथित) उच्च जातीयांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात वारंवार दिसत आलं आहे हे आपल्याला माहित आहे. काय आहेत ते प्रश्न आणि ते आर्थिक नाही तर मानसिक (सामाजिक) मागासलेपण कसे ठरवू शकतात, ते बघूया.

१) लग्न करताना हुंडा घेता का?

हुंडा पद्धत आपल्याकडे कायद्याने गुन्हा ठरवूनही अजूनही काही समाजात हुंडा घेतला जातो. तो प्रत्यक्ष घेतला जात नसला तरी तुमच्या मुलीला जे काही द्यायचं ते द्या असं म्हणून घेतला जातो. हे ओपन सिक्रेट आहे हे सर्वांनाच माहित आहे. आणि हेच वैचारिक मागासलेपण आहे.

आरक्षण घेणारा ज्या सर्वात मोठ्या वर्गावर खार खाल्ली जाते तो बर्ग म्हणजे बौद्ध धर्म्मीय लोक. या समाजात माझ्या माहितीप्रमाणे कोकणात तरी हुंडा घेतला जात नाही. देशावर काही ठिकाणी घेतला जातो असं मित्र मैत्रिणींच्या ग्रुपमधून समोर येतं. पण आता तरुण मुलंमुलींनी ते बंद करत आणलं आहे. तर धनाढ्यांची लग्नं पहिली तर मुलीला आईवडिलांकडून मिळणाऱ्या वस्तूंची मोजदाद आईवडिलांची इच्छा या सदरात मोडतात की हुंडा या सदरात असे प्रश्न आपण कधी विचारत नाही. पण अशा धनाढ्यांच्या लग्नांमुळे मध्यम वर्गीय आईवडील लाजेकाजेस्तव हा हुंडा नसलेला हंडा देतातच. शेवटी पाणी वरून खाली मुरतं ही सामाजिक उतरंडही आपण लक्षात घेतली पाहिजे.

२) तुमच्या समाजात विवाहित स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला पाहिजे असे बंधन आहे का?

मराठा समाजातील ही पद्धत अनेक साहित्यातून दिसलेली आहे. ‘तिचा पदर डोक्यावरू ढळत नव्हता’ अशा प्रकारची वाक्ये आपल्याला साहित्यातून दिसतात. आज शहरात राहणाऱ्या अनेक स्त्रिया पदर घेत नाहीत. नाहीतर मुंबई सारख्या महानगरात त्या सुद्धा मुस्लीम स्त्रियांसारख्या वेगळ्या दिसल्या असत्या. त्यांच्या गावी गेल्यानंतर किंवा सासरच्या वडिलधाऱ्या माणसासमोर डोक्यावर पदर घेणं बंधनकारक असेल तर मला कल्पना नाही. पण हा प्रश्न उत्तर भारतीय आणि मारवाडी लोकांना नक्की विचारायला पाहिजे. उत्तर भारतीय बायका केसात भांगभर कुंकू लावून साडीचा पदर डोक्यावरून घेतलेल्या आणि पृथ्वी एवढं पोट उघडं टाकलेल्या बायका दिसतात. तशाच मारवाडी बायका. त्यांना साडीचा पदरही काढता येत नाही. जास्तीत जास्त दीड फुटाचे पदर काढून त्या डोक्यावर घेतात आणि त्यामुळे तो पदर सारखा पडत असतो. नाहीतर त्या मुंबईत तरी पदर घेत नाहीत. बौध्द धम्मात अशी पद्धत नाही. उलट दुसऱ्यांच्या कार्यक्रमात गेलो आणि त्यांच्याकडे तशी पद्धत असेल तर बौद्ध स्त्रिया पदर घेतात. उदाहरणार्थ, शिखांच्या गुरुद्वारात डोकं झाकण्याची पद्धत आहे, ही पद्धत स्त्री पुरुष दोघांसाठी आहे. त्यामुळे तिथे जाणारा ख्रिश्चन माणूस सुद्धा डोक्यावर रुमाल ठेवून जातो. शीखांमध्ये अशी पद्धत असली तरी ते आर्थिक मागास नाहीत हे आपल्याला माहित आहे. कारण एकही शीख भिकारी आपल्याला दिसणार नाही हे अगदी लोकप्रिय वाक्य आपल्यालाही माहित असेल. मुस्लीम स्त्रिया तर सदानकदा बुरख्यात नाहीतर कपाळ आवळून दुपट्टे बांधतात आणि पुरुष नेहमी टोपी घालून असतात. मुस्लिमांमध्ये आर्थिक मागासांचं प्रमाण जास्त असलं तरी त्याला डोकं झाकून घेणं एवढं एकच कारण नाही.  हे सर्वांना माहित आहे. माझ्या मते डोक्यावर पदर घेण्याला आपण वैचारिक, मानसिक मागासलेपण म्हणता येणार नाही.

3१३) विधवांना कुंकू लावण्याची मुभा आहे का? विधवांना हळदी कुंकूला आमंत्रित करता का?

हा एक कळीचा मुद्दा आहे आणि तो व्यक्तीस्वातंत्र्याचा सुद्धा आहे. अनेक समाजांमध्ये विधवांना कुंकू लावण्याची मुभा नाही. हळदी कुंकवाला आमंत्रित केलं जात नाही. कुंकू लावण्याची वेळ आलीच तर तिच्या तळहातावर लावलं जातं. एक तर नवऱ्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्या पत्नीच्या कपाळभर कुंकू फासून, गळ्यात मंगळसूत्र घालून, हातात काचेच्या बांगड्या घालून तिला सजवलं जातं. मग नवऱ्याच्या प्रेताजवळ नेऊन त्याच्या कफनाच्या कपड्याने तिचं कुंकू पुसून टाकण्याची, तिच्या गळ्यातून खसकन मंगळसूत्र काढून घेण्याची आणि काचेच्या बांगड्या त्यांच्या ताटी वर आपटून फोडून टाकण्याची अघोरी प्रथा आजही अनेक ठिकाणी सुरू आहे. हे करण्यात स्त्रियाच पुढे असतात. हे निश्चितच वैचारिक, मानसिक आणि सामाजिक मागासलेपण आहे. पण आता पुरुषांनीच पुढाकार घेऊन त्यांच्या बापजाद्यांनी स्त्रियांवर लादलेली ही प्रथा बंद करत आणली आहे. एक एक गाव आम्ही अशा प्रकारे स्त्रियांची विटंबना करणार नाही असा प्रण घेत आहेत. केवळ मृत्यू समयी नाही तर नंतरही त्या स्त्रीला कुंकू लावून मंगळसूत्र घालून समाजात वावरण्याची खुली सूट आहे. काही ठिकाणी मात्र अजून प्रवाहावरून दगड हललेला नाही. बौद्ध धम्मात मुळातच या प्रथा नाहीत. पण पूर्वीचे हिंदूंचे संस्कार अजूनही अनेकांनी सोडलेले नाहीत. बौध्दजन  पंचायत समितीच्या बायकाच अनेक ठिकाणी आपलं कर्तव्य समजून हा अघोरी प्रकार करायला पुढे येतात. पण आता त्यांनाही यातील वेदना कळू लागली आहे. बऱ्याच अंशी बंद झालं आहे. बौद्धांमध्ये हळदी कुंकू तसंही होत नाही. पण समारंभांमध्ये कुंकू लावताना तिलाही लावलं जातं. पण याची सर्व समाजांमध्ये गणना केली तर वैचारिक मागासलेपण किती आहे हे नक्की कळेल. 

४) विधुर पुरुषांचे पुनर्विवाह करता का?

हा प्रश्न गैरलागू आहे. कारण आपल्या एकूण समाजात विधवा स्त्रीचा पुनर्विवाह होण्यास बंदी होती. विधुर पुरुषांना कधीच बंदी नव्हती. स्त्रियांना सुद्धा आता बंदी नाहीये. काही समाजात असेल तर विधवांना पुनर्विवाहाल परवानगी आहे का या प्रश्नाने वैचारिक मागासलेपण समजू शकेल.

५)  नवसासाठी कोंबडा बकऱ्याचा बळी देण्याची पद्धत आहे का?

हा प्रश्न फक्त कोंबडा बकऱ्याचा बळी एवढाच मर्यादित न ठेवता एकूणच नवस आणि नवस फेडण्याच्या पद्धतीवर विचारला जायला पाहिजे. मी नुकतीच एका डोंगरावर वसलेल्या देवाच्या दर्शनाला गेले होते. त्या गुंफेत असलेल्या देवाचं दर्शनासाठी ५०० पायऱ्या चढून जावं लागतं. मला चांगलीच धाप लागली होती कारण बस वगैरेचा प्रवास करून आम्ही बरोबर १२ वाजता सूर्य चांगलाच तळपू लागला तेव्हा तिथे पोहोचलो होतो आणि पायऱ्या चढायला सुरुवात केली होती. तिथे पायऱ्या चढताना मी असे नवस फेडणारे लोक पहिले. एका बाईने नवस केला होता आणि तो फेडण्यासाठी ती त्या प्रत्येक पायरीवर एक एक कापराची वडी ठेवून ती पेटवत होती. यात तिला तिचा नवरा आणि मुलगा मदत करत होते. पण ती बाई त्या तळपत्या उन्हात अनवाणी या पायऱ्या चढून हा नवस फेडत होती. एक मिनिट बसत नव्हती. माझ्या या अनुभवापेक्षा भयंकर अनुभव कदाचित तुम्ही घेतले असतील. काही लोक क्षमता नसताना शिरडी, बालाजी या ठिकाणी फुल नाही फुलाची पाकळी अर्पण करत कर्जवाजारी पण होत असतात. कशासाठी हा आटापिटा? साईबाबा आणि बालाजीने तुम्हाला ही लाच तुमच्या कडे मागितली होती का? सामान्य सरकारी किंवा गैर सरकारी अधिकाऱ्याच्या मनात जी लाचखोरी घुसली आहे तिचं मूळ हे देवाला आपलं काम करायला लाबून मग त्याला सोने चांदी अर्पण करण्याच्या मनोवृत्तीत आहे. देवानेच या भक्तांना लाच कशी घ्यावी याचे धडे दिले आहेत. जर हा भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर आधी ही मुळातली लाचखोरी थांबली पाहिजे. म्हणूनच हे नवस करणे आणि ते फेडणे हे अघोरी आणि तितके धन आणि शरीर उर्जेचा गैरवापर करणारी प्रथा नेमकी कुठे कुठे, कोणकोणत्या समाजात सुरू आहे याचं एक सर्वेक्षण करून ते कायद्याने बंद केलं पाहिजे. हे वैचारिक मागासलेपण नाही तर दिवाळखोरी थांबली पाहिजे.

तर असे प्रश्न मराठा आरक्षण सर्वेक्षणात विचारले गेले आहेत. ते आणि तसे अनेक प्रश्न सर्व समाजातील वैचारिक मागासलेपण जाणून घेण्यासाठी विचारणारे एक सर्वेक्षण झाले पाहिजे. अर्थात मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी योग्य ते प्रश्न विचारले जावेत अशी मागणी आम्ही या निमित्ताने करत आहोत. पण जे प्रश्न विचारले गेलेत ते प्रश्न एकदा सर्व समग्र भारतीयांचे सर्वेक्षण करून विचारले जावेत याचा विचार व्हावा अशी मागणीही मी करीत आहे. आपल्याला या विषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा.