Courtesy : https://aaplibaramatinews.com 


माणसाच्या चुकीची शिक्षा प्राण्यांना भोगावी लागतेय. 

काही दिवसांपूर्वी कल्याण मध्ये केमिकलमुळे एका बकरीचा होरपळून अंत झाला. अशीच एक बातमी आता बारामतीतून येत आहे. इथे पानसरेवाडी परिसरातील तांबेवस्तीत एका शेतकऱ्याच्या तब्बल ११ बकऱ्यांना पाण्यातून विषबाधा झाली आणि त्यांनी मान टाकली. आता प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला आहे. या बकऱ्याच या शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाच्या साधन असल्याने त्याला जास्तीतजास्त मदत करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

किसन विठोबा तांबे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. दिनांक ५ फेब्रुवारी रोजी दुपारी त्यांच्या कळपातील बकरे व शेळ्यांना पाण्यातून विषबाधा झाली. त्यामध्ये ११ बकऱ्या आणि ३ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर तलाठी यादव, कोतवाल राहुल बोडरे, सरपंच आबासाहेब पानसरे, माजी सरपंच राजेंद्र पानसरे, माजी सरपंच बाबासाहेब पानसरे, राजकुमार लव्हे, अजित कदम, रघुनाथ चांदगुडे, भाऊसो गदादे, पिंटू पानसरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

प्रशासनाकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. तसेच पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनही या घटनेची तपासणी केली जाणार आहे. या घटनेमुळे किसन तांबे या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने या शेतकऱ्याला तात्काळ मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. तरी पाण्यातून ही विषबाधा कशी झाली, या पाण्यात नेमके काय होते हे अजून स्पष्ट झाले नाही. पाण्याचे नमुने तपासल्यावर याची माहिती मिळू शकेल.


Source - https://aaplibaramatinews.com/baramati/big-news-water-poisoning-in-panserawadi-in-baramati-taluka-eleven-sheep-and-three-goats-died/?amp=1