यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला दरवर्षीप्रमाणे पद्म सन्मान जाहिर झाले. साधारण ९०च्या दशकानंतर यातील मरणोत्तर पुरस्कारांचे प्रमाण वाढताना दिसतेय, अगदी भारतरत्न सन्मानही याला अपवाद नाही. आज लिहिण्याचे कारण पद्म पुरस्कार नाही तर मरणोत्तर सन्मान हे आहे.

२८ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्राच्या दोन उपमुख्यमंत्र्यापैकी एक अजितदादा पवार यांचा बारामती येथे विमान अपघातात अकस्मात मॄत्यू झाला. अपघात कधी, कसा वगैरे गोष्टींचे तपशील येऊन गेले, खुद्द शरद पवारांनी त्याच दिवशी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यापूर्वीच हा अपघात आहे, यावर शंका घेऊ नका, असे सांगितले. तरीही आज घडीला सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही त्यावर विविध नेते शंका व्यक्त करताहेतच. याही गोष्टी संबंधात आज लिहिण्याचं कारण नाही.

तर लिहिण्याचं कारण की, अजितदादांच्या निधनानंतर सर्व माध्यमं, माध्यमकर्मी, वर्तमानपत्रं, संपादक हे ज्या पध्दतीने अजितदादांचे गुणगा करण्यात ज्या हिरिरीने लागले ते वाचून, पाहून आश्चर्य वाटले.

आपल्या समाजात व्यक्ती मृत पावली की, तिचे फार गुणगान करता आले नाही तरी त्याचे दोष मात्र शक्यतो दाखवूच नये. अगदी त्याच्यासोबतचे वैरही संपवावे असे काही अलिखित नियम आहेत. याला धरून अजितदादांचे गुणगान आपण समजू शकतो. मात्र काही गोष्टींचे आश्चर्य वाटतेय.

आश्चर्य याचे की, नव्वदच्या दशकात संसदीय राजकारणात प्रवेश केलेल्या अजितदादांना माध्यमांनी सुरूवातीला शरद पवारांचा वारस म्हणूनच पाहिले. कॉंग्रेसी परंपरेत वाढलेल्या शरद पवारांच्या घराणेशाहीची सुरूवात म्हणूनच अजित पवारांकडे पाहिलं गेलं. पुढे सुप्रिया सुळे, रोहित पवार यातून ती युगेन्द्र पवारांपर्यंत वाढत गेली.



यातील अजित पवारांनी बारामतीतून आपलं राजकारण सुरू केलं, पुढे पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांसह त्यांनी पुणे जिल्ह्यापर्यंत ते बांधत नेलं, त्यावरची पकड घट्ट करत नेलं. नंतर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात अजितदादांनी आपल्या प्रभावाचा विस्तार करत नेला.

हा सर्व प्रभाव अजितदादांनी शरद पवारांच्या सावलीतच सुरूवातीला कॉंग्रेस मधून व नंतर राष्ट्रवादीमधून मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातूनच वाढविला. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर तो पक्ष कॉंग्रेसच्या साथीनेच वाढत गेला व एक काळ असा होता की, राष्ट्रवादी हा पश्चिम महाराष्ट्रावादी व मराठ्यांचा पक्ष म्हणून ओळखला जायला लागला. याच काळात सुप्रिया सुळेंचा राजकारणात प्रवेश झाला तरी शरद पवार पक्षात सक्रिय असतानाच पक्षात दादायुगाचा प्रारंभ झाला. हे दादायुग पुढे दादागिरी म्हणून नकारात्मक पद्धतीने माध्यमात रंगविले जाऊ लागले.

अजित पवारांच्या हयातीत कुठल्याच टप्प्यावर त्यांच्यातले गुण न दिसलेल्या माध्यमांनी आता त्यांच्या मॄत्यू पश्चात शोधून शोधून त्यांच्या गुणांवर इतके लिहिते झाले की, त्यांच्या वृद्ध मातेच्या मांडीवर निजलेला राजहंसही दिसू लागला.

आठवून पहा, अजितदादांच्या मॄत्यूपर्यंत याच माध्यमांचे वर्तन काय होते? सत्तांध, मदां, सत्तेसाठी नाती तोडून विचारविरोधी धारेसोबत गेलेला, तुरूंगवासाला घाबरलेला वगैरे वगैरे वर्णनांनीच अजितदादांची प्रतिमा कायम रंगवली गेली. या आधी कधी त्यांच्या वक्तशीरपणाची, कठोर निर्णय घेणारा, कुशल प्रशासक किंवा उत्तम अर्थमंत्री म्हणून कधी त्यांची तारिफ ऐकली, वाचली होती? बारामती, पुणे, पिंपरी चिंचवडसह इतर ठिकाणी केलेल्या विकास कामांचा साधा उल्लेख आठवतो? त्यांच्यामागे कायम घोटाळे, भ्रष्टाचार, टगेगिरी व फाटक्या तोंडाचा गावरान गडी अशीच प्रतिमा रंगविणाऱ्या माध्यमांनी २८ तारखेनंतर त्यांची सारी वैगुण्ये गुणांसारखी मिरवायला सुरूवात केली. तोंडाळ भाषणे आता तडका, हजरजबाबी, ग्रामीण बाज वगैरे विशेषणांनी सजली. दादा होणार असेल काम तर हो म्हणत, नसेल तर तसं फटकन तोंडावर सांगत, हे तर कान किटेपर्यंत व डोळे दुखेपर्यंत ऐकावं, पहावं लागलं. त्यांचा वक्तशीरपणा, कोरोनातलं काम आत्ता ते गेल्यावर यांना दिसून आलं. दादा जिथे कुठे असतील तिथून त्यांच्या बाजात म्हणाले असतील, मेल्या म्हशीला दूध फार!

थोडक्यात अजितदादा पवारांचा हा मरणोत्तर सन्मान पाहून वाटतं की आपलं कर्तृत्व माध्यमांना दिसावं यासाठी दादांना प्राणाची किंमत मोजावी लागली काय?

 

ताजा कलम :

सुनेत्रा पवारांनी घेतलेल्या शपथेवरून त्यांना जाहिर बोल विशेष लेख लिहून लावणारे प्रखर हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांनी तरी तेरा दिवस थांबायला हवे होते अशी ओळ लिहायला सोयीस्कर विसरतात!

संजय

पवार