रियाध : वृत्तसंस्था

पश्चिम आशियातील सद्यस्थिती पाहता इराण आणि आखाती अरब देशांमधील संबंधांचे नव्याने मूल्यमापन करण्याची आणि त्यामध्ये गंभीर फेरविचार करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन सौदी अरेबियातील इराणचे राजदूत अलीरेझा इनायती यांनी एका मुलाखतीत केले आहे. अमेरिका आणि इस्रायलमुळे या प्रदेशावर युद्ध लादले गेले असून, बाहेरील शक्तींचा प्रभाव कमी केल्यास हा प्रदेश अधिक समृद्ध होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सौदी अरेबियाच्या पूर्व किनारपट्टीवरील रास तनुरा शुद्धीकरण कारखाना आणि शायबाह तेल क्षेत्रावर झालेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये इराणचा कोणताही सहभाग नसल्याचा दावा इनायती यांनी केला आहे. या हल्ल्यांसाठी इराण जबाबदार नाही. जर आम्ही हे हल्ले केले असते, तर आम्ही तशी अधिकृत घोषणा केली असती, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. इराण केवळ अमेरिका आणि इस्रायलच्या हितसंबंधांना लक्ष्य करत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

गेल्या पाच दशकांपासून या भागात असलेला तणाव हा बाहेरील देशांवरील अतिअवलंबत्वामुळे निर्माण झाला असल्याचे राजदूतांनी सांगितले. त्यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

एकत्मता : आखाती सहकार्य परिषदेचे सहा सदस्य देश, इराक आणि इराण यांनी आपापसात अधिक दृढ संबंध प्रस्थापित करावेत.

शेजारधर्म : शेजारी राष्ट्र म्हणून आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे बदलत्या काळात एकमेकांना सहकार्य करणे आवश्यक आहे.

सुरक्षेची हमी : सौदी अरेबियाने आपली जमीन, समुद्र किंवा आकाश इराणवर हल्ला करण्यासाठी वापरू दिले जाणार नाही, ही जी भूमिका घेतली आहे, त्याबाबत तेहरान सातत्याने रियाधच्या संपर्कात आहे.

युद्धाचा विळखा आणि परिणाम

२८ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या संघर्षानंतर आखाती अरब देशांवर दोन हजारहून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले आहेत. यामध्ये अमेरिकेचे राजनैतिक व लष्करी तळ आणि आखाती देशांच्या तेल पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्यांचा मोठा फटका संयुक्त अरब अमिरातीला बसला असून सर्व आखाती देशांनी या कृत्यांचा तीव्र निषेध केला आहे.

 

शांततेसाठी अटी

या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलने त्यांचे हल्ले थांबवणे अनिवार्य असल्याचे इराणने म्हटले आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुरक्षेची हमी मिळणे गरजेचे आहे, तरच हे क्षेत्र प्रगतीकडे वाटचाल करू शकेल, असे इनायती यांनी स्पष्ट केले.