भारतीय पौराणिक साहित्यात युध्दाच्या बाबतीत अनेक संदर्भ असले तरीही, भारतात बुद्ध काळापासून चालत आलेल्या इतिहासात, हिंसा आणि युद्ध या बाबतीत एक प्रबोधनात्मक दृष्टीकोन वाढीस लागला होता. मानवतावादी मुल्ये वाढीस लागली होती. बुध्दानंतर स्थापन झालेल्या धर्म, परंपरा यामध्ये, मानवता आणि अहिंसा यांचा दृष्टीक्षेप दिसून येतो. सम्राट अशोक सारख्या सम्राटाने शस्त्र खाली ठेवले होते, बुद्ध तत्त्वज्ञानाचा तो परिणाम झाला होता. म्हणून जगाने बुद्धांकडे शांततेचा अग्रदूत म्हणून पाहिले होते.

आजच्या घडीला आपण आणि आपला देश सुरक्षित आहे, आपल्या भूतपूर्व राजकीय धुरंधरानी सक्षम वहिवाट निर्माण करून ठेवली आहे. त्यासाठी तथागत गौतम बुद्धांच्या मानवतावादी मुल्यांचा उपयोग केला होता. अहिंसेचे तत्त्वज्ञान अंगिकारले होते. कितीतरी शतकानंतर सुद्धा गौतम बुद्धांच्या सारखे व्यक्तिमत्त्व या सृष्टीवर जन्माला आले नाही. म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी, गौतम बुद्धांच्या जीवनातील तत्त्वज्ञान भारतीय मानवतेला बहाल केले आहे.



अलिप्ततावाद आपल्या देशाच्या धोरणाचे मुख्य सूत्र होय. भारताचे परराष्ट्र धोरण हे आजही याच सूत्रावर सुरू आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरचा काळ लक्षात घेऊन तत्कालीन राजकीय धुरंधरानी एशियन व आफ्रिकन राष्ट्रांच्या बांडुंग परिषदेतील (इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांताच्या राजधानीत झालेली) पंचशील तत्त्वानुसार तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी अलिप्ततावादाची धोरणे दर्शविली. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची विभागणी अमेरिका व रशिया या दोन महासत्तांमध्ये झाली. या दोन महासत्तांमुळे जागतिक शांततेला धोका निर्माण होऊन शीतयुध्दाला सुरुवात झालेली होती. तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपती नासीर व मार्शल टिटो यांनी अलिप्ततावादी चळवळ मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी नवस्वातंत्र झालेली आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील राष्ट्रांचा पाठिंबा मिळावलेला होता. यामुळेच शीतयुध्दाची तीव्रता कमी करण्यास मदत झाली.



अलिप्ततवादाचा अर्थ : पं. जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की, अलिप्ततावद म्हणजे कोणत्याही जागतिक महासत्तेपासून अलिप्तता होय. याचा सकारात्मक अर्थ म्हणजे युद्ध टाळण्यासाठी सैनिक महासत्तेपासून अलिप्तता होय. कोणत्याही परिस्थितीत युद्ध परिस्थितीपासून जगाला वाचवणे ही आपली भावना असेल.

पं. जवाहरलाल नेहरुंची अलिप्ततावादी मांडणी : अलिप्ततावादाचे धोरण भारतीय परंपरेवर आधारलेले असून तथागत गौतम बुद्धांच्या व महावीरांच्या शांतता व अहिंसेच्या धोरणावर आधारलेले होते. पं. जवाहरलाल नेहरुंच्या मते, आशियादेशांच्या स्वातंत्र्यासाठी भारत बांधील आहे. ते म्हणतात, आपण शांतता व स्वातंत्र्याच्या बाजूने भक्कमपणे उभे आहोत हे चांगले आहे आणि आपण ते चांगल्या हेतूने करत आहोत हे इतरांना समजावे. आपण आशियादेशांच्या स्वातंत्र्याच्या बाजूने आहोत व साम्राज्यवादाच्या विरोधात आहोत, या म्हणण्याला अर्थ आहे. पं. जवाहरला नेहरुंच्या मते, कोणत्याही देशांची ताकद त्याच्या सैनिक शक्तीत नसून ती आर्थिक शक्तीत आहे आणि आर्थिक ताकदीसाठी औद्योगिकीकरण गरजेचे आहे. कोणत्याही सैनिकी महाशक्तीला पाठिंबा देन देश शक्तिमान बनत नाही, तर देशाच्या समृद्धतेवरून त्यांची ताकद ठरते, असे त्यांचे मत होते.

पं. नेहरुंच्या मते, तिसऱ्या जगातील देश सैनिक व आर्थिकदृष्टया सक्षम नाहीत. म्हणून अलिप्ततावाद स्वीकारुन आपले स्वातंत्र्य, सार्वभौमत्व टिकवण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. त्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधासाठी त्यांनी पाच तत्त्वे सांगितलेली. इतरांच्या प्रादेशिक एकता सार्वभौमत्वाचा आदर, अनाक्रमण, समानता व परस्पर फायदे, शांततामय सहजीवन, हस्तक्षेप करण्याचे धोरण. १९५६ च्या आशिया-आफ्रिका राष्ट्रांच्या परिषदेतही तत्वे स्वीकारण्यात आली.

पं.जवाहरलाल नेहरुंच्या मते, वैश्विक स्वातंत्र्य हे कोणत्याही एका वर्गाच्या प्राबल्यावर आधारलेले असू शकत नाही तर सामान्य माणसाच्या स्वातंत्र्यावर व त्यांच्या विकासाच्या संधीवर आधारलेले असते. यासाठी नवस्वतंत्र झालेल्या आशिया व आफ्रिका खंडातील देशांनी त्यांना मैत्रीचा हात पुढे केलेला होता. पंतप्रधान पंडित नेहरू यांनी अलिप्ततावादाचा स्वीकार करताना स्वतंत्र सार्वभौमत्वाचा पुरस्कार केला. या धोरणाने जगात शांतता येवून आंतरराष्ट्रीय संघर्षाची धार कमी होईल. याबद्दल ते ठाम होते. भारताच्या संदर्भात अलिप्ततेचे धोरण स्वीकारण्यास अनेक घटक कारणीभूत होते. त्यापैकी महत्वाचे घटक म्हणजे भौगोलिक व राजकीयदृष्टया विचार करता नेहरूंना भारताच्या भौगोलिक परिस्थिती व स्रोतांची पूर्ण जाणीव होती. भौगोलिकदृष्टया समृद्ध भारताने इतरांपुढे झुकण्याचे कारण नाही, असे नेहरूंना वाटत होते. आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी भारताचे स्वतंत्र परकीय धोरण असावे. कोणत्याही एका महासत्तेला पाठिंबा देऊन कोणताही देश आर्थिक मदत मिळवू शकत नाही. अलिप्तता धोरणाने आपण दोन्ही महासत्तांकडून आर्थिक मदत मिळवू शकतो. ही मदत कोणत्याही पूर्व अटीशिवाय व राजकीय दबावातून आलेली नसावी. भारताच्या औद्योगिक तांत्रिक मदत पश्चिमी देशाकडून मिळवू शकतो. यावर पं. नेहरुंचा विश्वास होता.

अलिप्ततावादी जगाची निर्मिती 

दुसऱ्या महायुद्धानंतर तिसऱ्या जगाची निर्मिती झाली. आशिया-आफ्रिका राष्ट्रातील राष्ट्रीयत्वाच्या भावनेमुळे इंग्लड, फ्रान्स व इतर वसाहतवाद्यांना आपल्या वसाहती गमवाव्या लागल्या. १९४५ नंतर भारत, श्रीलंका, ब्रम्हदेश तसेच इतर ३५ आफिकन राष्ट्रे व अनेक दक्षिण अमेरिकन देश स्वतंत्र झाले व तिसऱ्या जगाची निर्मिती झाली. या तिसऱ्या जगातील देश आर्थिक पिळवणुकीमुळे मागास होते. त्यांच्यात अनेक सामाजिक व राजकीय समस्या होत्या. गतिमान आर्थिक विकास व राजकीय समस्या होत्या. गतिमान विकासासाठी त्यांना शांततेची गरज होती. त्यांनी महासत्ता गटात सामील होणे टाळून शांतता व अहिंसेचा मार्ग स्वीकारला. तिसऱ्या जगातील देशांनी शीतयुद्धात सामील न होता अलिप्ततावादी धोरणाचा स्वीकार केला.

युरोप व अमेरिकेने मानवी प्रगतीचे नवे टप्पे गाठले आहेत व त्याप्रमाणे तिसऱ्या जगातील देशांचा विकास होणे अपेक्षित आहे. याकरीता अलिप्ततावादाची निर्मिती करण्यात आलेली होती. जगात शीतयुद्धानंतर कदाचित अणुतंत्रज्ञान प्रगतीमुळे अणुयुद्ध होईल. यामुळे जागतिक शांतता व सहकार्य वाढवण्याचे व टिकवण्याचे महत्वपूर्ण भूमिका तिसऱ्या जगातील देश पार पाडू शकतील याकरीता पं. नेहरूंना अलिप्ततावाद अपेक्षित होता. पं. नेहरू म्हणतात, 'आज अलिप्त राष्ट्रे त्यांचे राजकीय, आर्थिक व सामाजिक प्रश्न शांततामय मार्गाने सोडवू इच्छितात. प्रगतीसाठी शांतता आवश्यक आहे. अलिप्त राष्ट्र आपले स्वतंत्र्य व सार्वभौमत्व अबाधित ठेवून आर्थिक व्यवस्था निर्माण करु शकतात.?'पंडित जवाहरलाल नेहरूंची अलिप्ततावादी संकल्पनाः पं. जवाहरलाल नेहरू हे भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे प्रमुख शिल्पकार मानले जातात. भारताबरोबर अनेक आशियायी व आफ्रीकन देश स्वतंत्र झालेली होती. त्या देशांच्या स्वातंत्र्याचे व सार्वभौमत्वाचे रक्षण भारताच्या अलिप्ततावादाचे धोरणाने झाले पाहिजे असे नेहरुंचे होते. नवस्वतंत्र देशांनी आपल्या देशावर आक्रमण व्हावे अशी अपेक्षा होती. त्यामुळे भारताला आपला सर्वांगिण विकास करता येईल. शिवाय भारतीय स्वातंत्र्याला व लोकशाहीला अंतर्गत धोक्यापासून संरक्षण मिळेल. पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू असे म्हणतात की, कोणत्याही देशातील अंतर्गत धोरण आणि परराष्ट्रीय धोरण या दोहोंचा आद्य हेतू देशाचे आणि देशांतर्गत जनतेचे हिसाधण्याचे असतो. त्यादृष्टीने संरक्षणविषयक धोरण, भौगोलिक, लोकमत आणि आपल्या परंपरा सगळेच विचारात घ्यावे लागते. एकदा लोकसभेत नेहरू म्हणाले की, भारताला स्वतःचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि हे प्रश्न सोडवतानाच स्वातंत्र्य जपायचे आहे. जगात चालू असणाऱ्या संघर्षात आम्हांला गुंतावयाचे नाही.

भारतीय राजकारणी व्यक्तित्वाला जागतिक शांतता अपेक्षित होती. याकरिता अंतर्गत शांततेसोबत बाह्य शांतता सुद्धा अपेक्षित होती. यासाठी सीमेवरील सीमाबाह्य देशांत शांतता राखण्यासाठी अनेक देशांना अलिप्ततावादी धोरणात समाविष्ट करणे नेहरुंना अपेक्षित होते. भारताला यामुळे शांतता व सहकार्य लाभून देशांचा सर्वांगिण विकास करणे शक्य होईल व अधिक काळ देशांचा सामाजिक, आर्थिक, औद्योगिक व सर्वांगिण विकास करणे अधिक सोईचे होईल.

अलिप्ततावाद ही नकारात्मक भूमिका नव्हे तो भारताच्या व जगाच्या प्रगती, समृद्धीचा विचार करणारा विधायक दृष्टीकोन आ हे. जगातल्या इतर सर्व राष्ट्रांच्या शांतता आणि समृद्धीसोबतच भारताच्या प्रगतीची वाटचाल होणार आहे. हा आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन भारतीयांनी अंगिकारला पाहिजे, असे पंतप्रधानांना वाटे.

आशिया व आफ्रिकेतील राष्ट्राचे दीड-दोनशे वर्षे प्रचंड प्रमाणात शोषण केलेले होते. साम्राज्य सत्तेपासून पुष्कळच मानहानी आणि वित्तहानी आशिया-आफ्रिकेतील राष्ट्रांनी सहन केलेली होती. या राष्ट्रांतून परस्परांबाबत धर्म संस्कृतीच्या जुन्या परंपरांसह गुलामगिरीच्या विरुद्ध लढण्याच्या नव्या परंपरा होत्या. समान हितसंबंधांची त्यांना जाणीव होती. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या जाणीवेचा साम्राज्यवाद विरोधी मनोवृत्तीचा सारखेपणा या राष्ट्रांमध्ये होता व आहे असे तत्कालीन पंतप्रधान यांना वाटे. म्हणून या देशांनी अधिकाधिक जवळ येऊन अलिप्ततावादाची चळवळ घट्ट केली पाहिजे. भारतीयांनी ब्रिटिशांकडून मिळालेली गुलामगिरीची वाईट वागणूक पं. नेहरू कधीच विसरलेले नव्हते. स्वातंत्र्यानंतर अमेरिका व रशिया या गटातील संघर्षात भाग न घेता भारत, आशिया व आफ्रिकेन देशांपुढे अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी आपली शक्ती खर्ची करावी, असे नेहरूंना अपेक्षित होते. भारतात लोकशाही आहे. स्वतःचे संविधान आहे. सार्वभौमत्व टिकवण्यासाठी, जगातील दोन्ही गटातील संघर्षात भाग न घेता आपल्या देशांचे प्रश्न सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न आपण करावे, असे तत्कालीन राजकीय धुरंधराना अपेक्षित होते.

भारताची भूमिका, अलिप्तता धोरणात शीतयुध्दाची तीव्रता कमी करणे, तिसऱ्या जगातील देशांना तिसरा पर्याय देण्यासाठी नेहरूंनी अलिप्तता धोरण स्वीकारले. दोन महासत्तांनी चालू केलेल्या लष्करी करारात सामील न होणे, त्यांच्या मते, अलिप्तता धोरणाने देशाचे सार्वभौमत्व व स्वातंत्र्य यांचे रक्षण करुन आर्थिक विकास साधता येईल. त्यांनी सकारात्मक अलिप्ततावादाने साम्राज्यवाद, वसाहतवाद व वंशभेदाचा सातत्याने विरोध केला. त्यांनी आशिया व आफ्रिकन राष्ट्रांचा एकीचा पाठपुरावा केला. दोन्ही महासत्तांशी समान अंतर ठेवतानाच अमेरिका गटाची लोकशाही प्रभावी व रशिया गटाच्या समाजवाद त्यांना आवडला. पं. नेहरूंचे अलिप्तता धोरण स्वावलंबनाचे व आर्थिक विकासावर आधारित होते. अलिप्ततावादी संघटना चळवळ ही प्रामुख्याने शीतयुध्दाच्या पार्श्वभूमीवर अस्तित्वात आली.

शीतयुद्ध, वंशवाद व वसाहतवादाला विरोध या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ही चळवळ होती. पण त्या समस्या जवळपास संपलेल्या आहेत. त्यामुळे ही चळवळ आजच्या काळात कालबाह्य ठरलेली आहे, असा युक्तीवाद केला जातो. पण अलिप्ततावादी संघटनेचा दोन दृष्टिकोनातून विचार करावा लागेल, एक म्हणजे अलिप्ततावाद एक चळवळ व अलिप्ततावाद एक विचार. भारताच्या बाबतीत आजही अलिप्ततावाद परराष्ट्र धोरणाचा गाभा आहे. त्यामुळेच भारत इतर राष्ट्रांतील प्रश्न, शांततेच्या, चर्चेच्या मार्गाने सोडवणे संयुक्त राष्ट्र संघटनेला समर्थन देणे. ही तत्त्वे आजही भारत अनुसरतो आहे. परराष्ट्र धोरणातील स्वायत्तता हा अलिप्ततावादी विचारसरणीतील महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतासह इतर देशांसाठीही महत्त्वाचा आहे. त्यामुळे विचार म्हणून किंवा चळवळ म्हणून उद्दिष्टांमध्ये फारकत केल्यास अलिप्ततावादाची राजकीय स्वरुपाची उद्दिष्टे पूर्ण झाली आहेत. पण आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टे आजही साध्य झालेली नाहीत. तिसऱ्या जगातील देशांना आजही गरिबी, उपासमार, लोकसंख्या, निम्नजीवनस्तर, बेकारी, निरक्षरता अशा प्रकारच्या समस्या भेडसावत आहेत. आज अमेरिका एक ध्रुवी विश्वरचना म्हणून उदयास येत आहे. त्याला प्रतिबंध करणे, अमेरिकेचा वाढता हस्तक्षेप थांबविण्यासाठी आज अलिप्ततावादी चळवळीची गरज भासू लागली आहे. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्र संघटनेचे लोकशाहीकरण करणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागणार आहेत आणि ते केवळ अलिप्ततावादी राष्ट्रांची संघटनाच करू शकते. त्यामुळे या चळवळीला महत्त्व अधिक आहे. ती कालबाह्य झाली आहे, असे म्हणता येणार नाही.

 तथागत गौतम बुद्ध म्हणतात...

वेगळे करायला शिका.

जीवनातून नाही, तर जे तुम्हाला थकवते त्यातून.

अलिप्तता म्हणजे शीतलता नाही तर ती स्पष्टता आहे.

ते म्हणजे समजून घेणे की तुम्ही चिकटून न राहता खोलवर काळजी घेऊ शकता, स्वतःला न गमावता पूर्णपणे प्रेम करू शकता आणि द्वेष न करता निघून जाऊ शकता.

जे तुमच्यासाठी आहे ते टिकवण्यासाठी तुम्हाला रक्तरंजित क्रांती करण्याची आवश्यकता नाही.

--- अरुण वाघ