कॅगने ओढले ताशेरे
भारताच्या नियंत्रक आणि
महालेखा परीक्षकांनी अर्थात कॅगने बिहारमधील आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन
आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) या दोन महत्त्वपूर्ण
योजनांच्या अंमलबजावणीतील गंभीर दोष उघड केले आहेत. बिहारचे अर्थमंत्री विजयेंद्र
प्रसाद यादव यांनी हा ताजा लेखापरीक्षण अहवाल विधानसभा आणि विधानपरिषदेत सादर
केला. या अहवालामुळे सरकारी यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण
झाले असून, लाभार्थींच्या निवडीत
पारदर्शकता नसल्याचे समोर आले आहे.
कॅगच्या अहवालानुसार, आयुष्यमान भारत योजनेचे उद्दिष्ट एकूण १२ दशलक्ष गरीब आणि
असहाय कुटुंबांना आरोग्य विमा संरक्षण देणे होते. मात्र, मार्च २०२४ पर्यंत राज्यात केवळ २५ दशलक्ष लाभार्थ्यांचीच
नोंदणी पूर्ण होऊ शकली आहे, म्हणजेच
केवळ ७१ टक्के लोकांपर्यंतच ही योजना पोहोचली आहे. यामुळे राज्यातील
५९५ गावांना या
आरोग्य योजनेचा कोणताही लाभ मिळालेला नाही. अनेक खासगी रुग्णालयांची नोंदणी वेळेत
न झाल्यामुळे आरोग्य सेवा मिळण्यास विलंब झाला असून विमा दाव्यांची प्रक्रियाही
मंदावली आहे.
लेखापरीक्षणात असेही आढळले की, अनेक अर्जदारांकडे अधिकृत ओळखपत्र नसतानाही त्यांना
उपचारांसाठी पैसे देण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, पुरेशी पायाभूत सोय नसलेल्या काही रुग्णालयांनाही या
योजनेअंतर्गत उपचार करण्याची मान्यता मिळाली आहे. ज्या रुग्णालयांमध्ये आवश्यक
उपकरणे,
डॉक्टर आणि इतर सुविधांचा अभाव होता, अशा रुग्णालयांनीही योजनेअंतर्गत सेवा दिल्याचे नोंदीवरून
स्पष्ट झाले आहे, ज्यामुळे
रुग्णांच्या आरोग्याशी तडजोड झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
आवास योजनेच्या बाबतीतही कॅगने अनेक धक्कादायक खुलासे
केले आहेत. ज्यांच्याकडे आधीच पक्के घर आहे किंवा जे नियमानुसार अपात्र आहेत, अशा व्यक्तींनाही घरांचा लाभ देण्यात आला आहे. अनेक
घरांमध्ये शौचालयांची सोय नाही, तर
जमीन नसलेल्या खऱ्या गरजूंना योजनेचा पुरेसा लाभ मिळालेला नाही. या योजनेत मोठ्या
प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार, घरांचे
चुकीचे फोटो संगणकीय प्रणालीवर चढवणे आणि भौगोलिक स्थान निश्चितीच्या प्रक्रियेत
गंभीर चुका झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.