'हैना! जिथे असतील तेथून, इकडे पहा. वादळ पांगत चालंल आहे. ऊन पसरत चाललं आहे. अंधारातून निघून लोक प्रकाशात येण्यासाठी निघालेले आहेत. आपण एका नव्या भावविश्वात पाऊल ठेवत आहोत. जे अधिक आनंद देणारे आहे. जिथे लोक आपलं शत्रुत्व विसरुन, स्वार्थी आणि दहशतीच्या जगापासून वेगळे होतील. पहा हैना! मानवतेच्या अंतरंगाला नवे पंख मिळाले आहेत आणि शेवटी त्यांनी भरारी घेण्यास सुरूवात केलेली आहे. ते इंद्रधनुष्यात आपलं अस्तित्व दाखवित आहेत. आकांक्षेच्या उजेडात...! भविष्याच्या दिशेने..! महान भवितव्याच्या दिशेने जे तुझं, माझं आणि सर्वांचं आहे.

चार्ली यांचे हे शब्द कदाचित आपल्या पहिल्या बोल-चित्रपटातील दी ग्रेट डिक्टेटर नायिका हैना हिच्यासाठी बोलले गेले असतील, परंतू समस्त विश्व या शब्दांकडे कान टवकारून पहात होतं. कारण भूतकाळ साक्षी आहे. हा चित्रपट बनवतांना आणि रिलिज होताना जग एक अत्यंत अवघड ठिकाणी येऊन थांबलेलं होतं. महायुद्धानंतरची महामारी झेलून थकलं होतं. युरोप खंड आर्थिक महामंदीतून गमन करीत होता आणि आणखी एक महायुद्ध पुन्हा येण्याचे संकेत देत होतं. सगळीकडे हुकूमशाहांची तानाशाही चालली होती. सर्वत्र एकच सन्नाटा पसरलेला होता. जो कब्रस्तनात पहायला मिळतो, हा प्रचंड असा मानवी मानसिक गुलामगिरीचा कालखंड होता, प्रचंड दडपणाखाली होते, त्यांना दिशा सापडत नव्हत्या. अशा भयंकर प्रसंगी चार्लीने दी ग्रेट डिक्टेटर हा चित्रपट बनवून हिटलर सारख्याच्या सार्वभौम सत्तेला आव्हान दिलं होतं. चित्रपटाच्या माध्यमातून लोकांच्या मनामनात आकांक्षा पेरुन ठेवल्या आणि भविष्याकडे पहाण्याची दृष्टी दिली. जगात नाझीवादाची खळबळ माजवणाऱ्या हिटलरसोबत दोन हात करण्यासाठी चार्लीने हास्य आणि व्यंग यांच माध्यम वापरलं. अशी सत्ता जी माणसामाणसात अमानवी बिज पेरते, परंतू त्यांना विरोध करण्याची कला लोकांनी शिकवली. चित्रपटातील दृश्य, प्रतिबिंब, संवाद, आणि पटकथेतून माणसाच्या अंतरंगात पोहचवली. माणसा-माणसात चाललेल्या सांस्कृतिक लढाईत मानवी हिताचे रक्षण करण्याचे प्रयत्न केले.

चार्ली चैप्लिन यांचा जन्म १६ एप्रिल १८८९ साली लंडन मधल्या वालवर्थ येथे झाला. त्यांचे आई-वडील म्हणजे आई हैना चैप्लिन आणि वडील चालर्स स्पेंसर चैप्लिन हे मोठ- मोठ्या हॉलमध्ये जाऊन गायन करीत आणि अभिनय करीत असत. चार्ली तीन वर्षाचा होईपर्यंत चांगल चाललं होतं.; परंतू चार्लीच्या वडिलांच्या दारूमुळे आई-वडील वेगळे झाले आणि चार्लीच्या आयुष्याची परवड सुरू झाली. त्यांच्या वेगळे होण्याची अनेक कारणे चर्चिली जातात. चार्लीसाठी दोनच व्यक्ती महत्त्वाच्या होत्या एक त्याची आई आणि दुसरा त्याचा भाऊ-सिडनी.

श्रीमंतीकडून गरीबीकडे या कुटुंबांचा प्रवास सुरू झाला. चार्ली पाच वर्षांचा असतांना व्यासपीठावर गायन करीत असतांना त्याच्या आईचा स्वर अचानक फाटू लागला आणि गाण्याव्यतिरिक्त ती वेगळेच बडबडू लागली. कारण तिच्या स्वरांनी कंठाची साथ सोडली होती. श्रोत्यांमध्ये प्रचंड गोंधळ होऊ लागला. त्यामुळे स्टेज मॅनेजरने त्या स्टेजवर छोट्या चार्लीला सोडून दिलं. पहिल्यांदा चार्ली प्रेक्षकांना समोरे गेला आणि पहिल्या अदाकारीतून लोकांची मनं जिंकली. त्याने हुबेहूब आईच्या गाण्याची नक्कल केली होती. त्यांच्यावर लोकांनी पैसे उधळले. त्याने आईचा कंठ फाटल्याची नक्कल सुद्धा केली होती. तेव्हा पासूनच त्याचे बालमन हास्याने वेढलेलं होतं. पुढे त्याने आपल्या चित्रपटांमधून लोकांना दुःख दारिद्र्य, भुख, बेरोजगारी, एकटेपणा, विवशता, इत्यादी जीवनातील क्रूरतेवर प्रकाश टाकलेला आहे. त्यालाच त्याने हास्य रूपातही करून दाखवले. गरीबी आणि आर्थिक स्त्रोत नसल्याने त्याला अनाथाश्रमात जाणं भाग पडलं. असाह्य लोकांसाठी चालवल्या जाणाऱ्या शाळेत घातलं गेलं. आईशिवाय जगणं त्याला विचित्र वाटत होतं, दी कीड आणि मॉडर्न टाईम्स’ या चित्रपटात तो अनाथाश्रमात आपल्या बाबतीत घडलेल्या घटनांचा घोषवारा दाखविण्यास विसरला नाही. त्याशिवाय सावत्र आईच्या छळालाही त्याला समोर जावं लागलं होतं. त्याच्या आईला मनोरूग्णालयात भरती करावं लागलं होतं. काही काळानंतर चार्लीला आईसोबत राहण्याची संधी मिळाली.

आपल्या स्वकथनात हे सांगायला तो कधीही विसरत नाही. त्याच्या जीवनात आईचं पदार्पण पुन्हा आनंद देऊन गेलं. त्याच्या जीवनाची गाडी रूळावर आली, तो नियमित शाळेत जाऊ लागला, परंतू शाळेत मन लागत नव्हतं. कदाचित तो म्हणतो की, कोणीतरी त्याच्यात हस्तक्षेप केला असता तर तो विद्वान बनू शकला असता. पण तसं घडलं नाही. त्याचे भावविश्व पुन्हा रंगमंचाकडे आकर्षित होत होतं. शाळेतल्या कलामंचावर कलेचं प्रदर्शन करायची संधी मिळाली नाही, तर तो नाराज व्हायचा.

काही काळानंतर वडिलांच्या सांगण्यावरुन जैक्सनच्या रंगकर्मी टोळीत त्याला सामील करण्यात आलं होतं. जैक्सनच्या सानिध्यात नृत्य कला शिकला. परंतू त्याला हास्य कलाकार व्हायचं होतं. चार्लीला अभिनय कला आईकडून वंशभेट म्हणून मिळाली होती. सहकाऱ्यांकडून अभिनयाच्या प्रारंभिक कला त्याने शिकून घेतल्या होत्या. जैक्सन खऱ्या अर्थाने रत्नपारखी होता. चार्लीला म्हताऱ्याची - भूमिका करतांना पाहिले आणि त्याच्यातला कलागुण ओळखला होता. पुढे त्याला प्रोत्साहन देण्याचं ठरवलं. नाटकाच्या मालकाला तब्येतीचं कारण सांगून आईकडे रहायला गेला. चार्ली बारा वर्षांचा असल्यापासून पैसे कमावण्याच्या प्रयत्नात होता. तो फुलं विकून पैसे कमवित असे. आईचं मन वळवलं की शाळा सोडून काही तरी कामधंदा करावा. पुढे अनेक ठिकाणी काम करून त्याने यशस्वी होण्याचा प्रयत्न केला होता. तिथेही फसला आणि पुन्हा शाळेचा प्रयत्न करू लागला. त्यात त्याला कधीच यश मिळालं नाही. जहाज कंपनीत नोकरी मिळाली होती, परिवार थोडा स्थिरावला होता. परंतू बरेच दिवस आईपासून दूर गेल्याने आईच्या मनःस्थितीवर पुन्हा आघात झाला. ती पुन्हा मनोरूग्णालयात गेली. त्यामुळे चार्ली अगदी एकटा झाला होता. त्यामुळे तो फिरु लागला. त्यानंतर चार्लीचं जीवन अंतर्बाह्य बदललं. त्याने हैमिल्टनच्या नाटकासाठी जीव तोडून मेहनत घेतली होती, त्याला वाचता येत नव्हतं त्यामुळे तो त्याच्या भूमिकेतील संवाद रेटून नेत होता. 'जिम' नावाच्या नाटकाला समिक्षकांनी मान्यता दिली नव्हती, परंतु लंडनमधील 'ट्रापिकल टाईम्स'ने चार्लीच्या कलाकारीचे कौतुक केलं होतं. 'शेरलॉक होम्स' नाटकात मांजरीच्या भूमिकेने अनेक महिने खळबळ माजवली होती. त्यानंतर मॅनेजरच्या शिफारशीनुसार सिडनीलाही या कंपनीत काम मिळालं होतं. चार्लीने तोपर्यंत फ्राहमैन कंपनीत काम सुरू केली होती.

१९१४ साली मैक सेनेटच्या किस्टोन स्टुडिओच्या बॅनरखाली प्रदर्शित झालेला चित्रपट 'मेकींग ए-लिव्हींग' मधून चार्लीने चित्रपट पर्वाची सुरूवात केली होती. पुढे दहा महिने पस्तीस दिवसांत या बॅनरखाली चार्लीचे पस्तीचित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यातूनच जगाला चार्लीच्या अभिनयाच्या बाबतीत स्थापित करण्याची संधी मिळाली होती.

चार्लीने जास्तीत जास्त मूक चित्रपटात ट्रैप नावाचं पात्रं केलं होतं. जो दुसरा-तिसरा कोणी नसून चार्लीचा एकूण भूतकाळ होता. ज्यामध्ये त्याची बेफिकीरी, आवारागर्दी, लोकांना सतत हसायला लावत होती. आजही ती क्रेज कायम आहे. त्यातून जागतिक घटनांचा आढावा घेतला होता. सामान्य माणसाचं दुःख आपल्यासोबत वाटून घेतलं होतं. आपल्या अंतर्मनाच्या कोपऱ्यात त्याने कायम जपून ठेवलं होतं. तो मोठ्या जगासाठी विदूषक असेल! परंतु गरीब जनतेचा तो महानायक बनला होता. आपल्या 'ट्रैप' चरित्रनायकाच्या माध्यमातून श्रीमंतीची आणि तथाकथित आधुनिक जगाची चेष्टा करीत होता. सौदर्यभूती धनदौलत, लोकप्रियता, ताकत यातून मिळत नसते तर ती मिळते प्रेम, करूणा आणि मानवता यातून प्रदर्शित होत असते. एकापेक्षा एक गुदगुल्या करणारे चित्रपट निर्माण होतं गेले. इतरांच्या निदर्शनाखाली काम केल्यापेक्षा स्वतः निर्देशित केलेले चित्रपट बनवले. त्याने हे तंत्र लवकरच विकसित केलं होतं.

आपल्या चित्रपटांमधून बहुजनांच्या प्रश्नांना वाचा फोडली. चार्लीने स्वत:ला राजकारणापासून दूर ठेवलं होत. तरीही त्याचा चित्रपट विषय आणि प्रस्तुतीकरणातून त्याच्या जनवादी रणनीतीचा गाजावाजा सुरूच ठेवला होता. चित्रपटांवर काही परिणाम होऊ नये म्हणून सांगत फिरायचा की, मी फक्त एक व्यक्ती आहे, आणि एक खिल्ली उडवणारा माणूस. ही गोष्ट मला कोणत्याही राजकीय नेत्यापेक्षा उंचीवर नेऊन ठेवत असते.

चार्लीला मिळालेले महत्वपूर्ण पुरस्कार म्हणजे अकादमी अवॉर्ड, १९२९ साली अकादमी मानद पुरस्कार 'द सर्कस' साठी १९७२ 'लाईफ टाईम अचिवमेंट' पुरस्कार, १९५२ सर्वोत्तम ओरिजिनल म्युजिक स्कोर लाईफ लाईटसाठी, सर्वोत्तम अभिनेता यासाठी युयॉर्क फिल्म क्रिटिक सर्कल अर्वार्ड, १९४० द ग्रेट डिक्टेटरसाठी, १९७२ करिअर गोल्डन लायन लाईफ टाईम अचिवमेंट पुरस्कार,१९६५ मध्ये ब्रिटीश सम्राज्ञी महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांनी चार्ली यांना नाईट कमांडर ऑफ ब्रिटीश एम्पायरच्या पुरस्काराने गौरविले होते.

चार्ली चैप्लिन..! फिल्मी हास्य आणि प्रहसनच्या जगात या कलंदराने हास्याची अशी संकल्पना निर्माण केली की, जिच्यातून विनोदातून संवेदनशीलता, विचार, व्यंग आणि क्रूर व्यवस्थेची खिल्ली उडवूनही सामील करून घेतलं होतं. चार्लीच्या काही चित्रपटांबाबत विचार केला तर आज कालच्या तमाशासारखे नाही ते हसवण्याच्या नावावर अश्लीलता आणि द्वयार्थी शब्दांनी थट्टा करतांना लोकांनी मनःस्थिती दूषित करीत असतात.

अमेरिकेवर चार्लीचे विशेष प्रेम होते. त्यासाठी तो मायाभूमीपासूनही दूर गेला होता. परंतु अमेरिकेच्या दुःस्वासाने त्याचं अंतर्मन दुखावलं गेलं होतं. चार्ली जेव्हा आपल्या बायको ओनील, चार मुलांसोबत स्विर्झलंडमध्ये गेला तेव्हा त्याची बायको आई होणार होती. तिथेच त्याने एक घर शोधलं आणि स्थिर झाला. उर्वरित आयुष्य इथं घालवलं. याच जागेवर त्याला भारताचे प्रथम प्रधानमंत्री पंडीत जवाहरलाल नेहरू भेटले होते. त्यांच्या सोबत इंदिरा गांधीही होत्या. चार्ली आपल्या जीवनाच्या उत्तरार्धात मीडियापासून दूर होता.१९७७ ची डिसेंबर २५ तारीख म्हणजे त्या दिवशी लोक ख्रिसमस साजरा करत होते. आपल्या या निवृत्ती काळात या हास्य महानायकाने गुपचूप जगाचा निरोप घेतला.

विनम्र अभिवादन

अरुण वाघ