तब्बल पंधरा तास एखादा व्यक्ती बेशुद्धावस्थेत लोकल ट्रेनच्या डब्ब्यात पडून आहे आणि तरीही रेल्वे प्रशासन किंवा पोलिसांना याची खबरही नव्हती असे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे.
मुंबई, दि. २२ एप्रिल (प्रतिनिधी) :
या प्रकरणी
रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या रेल्वे पोलीस
आणि प्रशासकीय यंत्रणेची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, तसेच यापुढे अशा
घटना घडू नयेत म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी अशी लेखी मागणी ‘लोकांचे दोस्त’ संघटनेच्या वतीने
मध्य रेल्वेच्या महा व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे. ‘लोकांचे दोस्त’चे अध्यक्ष रवि
भिलाणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मध्य रेल्वे महा व्यवस्थापकांचे उपसचिव
उमंग दुबे यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच रेल्वेच्या सार्वजनिक तक्रार
विभागात तक्रार नोंदवली. या शिष्टमंडळात रवि भिलाणे यांच्यासह ज्योती बडेकर, संजीता मालणकर, प्रकाश महिपती
कांबळे आदींचा
समावेश होता.
ज्येष्ठ पत्रकार संजय नागनाथ शिंदे (६०) हे बुधवार, दि. १५
एप्रिल २०२६ रोजी मध्य रेल्वेच्या ट्रेनमध्ये दुपारी चार वाजल्यापासून
दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत जवळपास पंधरा तास बेशुद्ध अवस्थेत होते. शिंदे
हे बुधवारी नेहमीप्रमाणे धारावी परिसरात वार्तांकन करत होते. ते दुपारी
चार वाजण्याच्या सुमारास मध्य रेल्वेच्या सायन (शीव) रेल्वे स्थानकावर ट्रेन
पकडण्यासाठी पोहोचले. मात्र, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचा त्यांच्याशी संपर्क होऊ
शकला नाही. संजय शिंदे यांच्या मोबाईलची रिंग वाजत होती. पण कोणीही फोन घेत
नव्हते. त्यांची काळजी वाटल्याने त्यांच्या धारावी परिसरातील मित्रांनी संध्याकाळी
उशिरा धारावी पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दिली. त्यानंतर रात्री उशिरा
त्यांच्या पत्नी सुषमा संजय शिंदे आणि मुलगा राहुल संजय शिंदे यांनी ते रहात
असलेल्या डोंबिवली येथील स्थानिक पोलीस
ठाण्यात तक्रार देऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
दुसऱ्या दिवशी म्हणजे
गुरुवार, दि. १६ एप्रिल रोजी सकाळी
सात वाजण्याच्या सुमारास रेल्वे पोलिसांनी राहुल संजय शिंदे यास मोबाईल वरून
कळविले की, संजय शिंदे हे कल्याण रेल्वे स्थानकात आहेत. त्यानुसार
कुटुंबियांनी तिकडे धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील
खासगी क्लिनिकमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केल्याचे आढळून
आले.
रेल्वे पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, संजय शिंदे हे सकाळी सहा - साडेसहाच्या दरम्यान टिटवाळा रेल्वे स्थानकात, मुंबईकडे जाण्यासाठी यार्डमधून आलेल्या लोकल ट्रेनमध्ये
आढळून आले होते. इतर प्रवाशांनी कळविल्यावरून पोलिसांनी त्यांना कल्याण रेल्वे
स्थानकात उतरवून घेतले होते. पोलिसांनी त्यांना कल्याण स्थानकातील खासगी क्लिनिकमध्ये
दाखल केल्यानंतर त्यांना दोन सलाईन लावली गेली. त्याचे चार हजार रुपये बिल घेऊन
त्यांना घरी घेऊन जाण्यास सांगण्यात आले. मात्र संजय शिंदे यांची प्रकृती अतिशय
गंभीर व चिंताजनक झाली होती. ते बेशुद्धच होते. म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी
त्यांना तिथूनच कल्याण पश्चिम येथील होली क्रॉस रुग्णालयात दाखल केले. तिथे आयसीयूमध्ये
दोन दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तेव्हा त्यांची प्रकृती सुधारली.
रुग्णालयाचे साठ हजार रुपये बिल भरून कुटुंबीयांनी त्यांना घरी आणले. अजूनही
त्यांच्यावर घरगुती उपचार सुरू आहेत. त्यांना गाडीतून उतरवताना पोलिसांनी मारहाण केल्याची आणि
उर्मटपणे वागवल्याची शिंदे कुटुंबीयांची तक्रार आहे.
यानिमित्ताने ‘लोकांचे दोस्त’तर्फे महाव्यवस्थापकांना
पुढील प्रश्न विचारण्यात येत आहेत.
१ ) एखादा व्यक्ती रेल्वेतून
प्रवास करत असताना बेशुद्ध होऊन पंधरा तास रेल्वेत फिरत राहून अखेर यार्डमध्ये
पोहोचला तरी रेल्वे प्रशासन आणि पोलिसांना
या बाबत काहीच कसे कळले नाही? लोकल ट्रेन यार्डमध्ये
जाण्या आधी तिची तपासणी का करण्यात आली नाही?
२ ) रेल्वेचा नियमित
पास किंवा तिकीटधारक प्रवासी रेल्वेमध्ये बेशुद्ध होऊन पडला असताना त्याची
जबाबदारी रेल्वे प्रशासनाची नाही का?
३ ) गंभीर अवस्थेतील
सदर प्रवाशाला योग्य त्या सर्व सोयी सुविधायुक्त रुग्णालयात का दाखल केले गेले
नाही?
हा रेल्वे पोलिसांचा बेफिकीर आणि उद्दामपणा नाही का? रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित पोलिसांवर काय कारवाई
करणार?
४ ) रुग्णाच्या अंगावर
काठीचे व्रण दिसून आले आहेत. पोलिसांनी सदर रुग्णाला गाडीतून उतरवताना काठीने
भोसकल्याचा आरोप आहे. तसेच पोलिसांनी सदर रुग्ण बेवडा असल्याचा जावईशोध लावून
त्याच्या प्रति कमालीचा उद्दामपणा आणि अरेरावी केल्याचे संजय शिंदे यांचा मोठा
मुलगा अमन शिंदे याने सांगितले. तो सर्वप्रथम कल्याण स्टेशनला पोहोचला होता.
५ ) संजय शिंदे यांनी
कोणतेही नशापान केलेले नव्हते. ते एक प्रतिष्ठित नागरिक आणि ज्येष्ठ पत्रकार
आहेत. लोकांचे दोस्त संघटनेमार्फत अनेक सामाजिक कार्यात सक्रिय असतात.अशा व्यक्तीस
पोलिसांनी केलेली मारहाण आणि उपचारांमध्ये केलेले अक्षम्य दुर्लक्ष यावर तातडीने
कारवाई होणे गरजेचे नाही का ?
६) जरी कोणी प्रवासी नशेत असताना त्याच्या सोबत अशा प्रकारे
वागण्याचा पोलीस किंवा प्रशासनाला काय अधिकार आहे?
७) यापुढे कोणत्याही प्रवाशांवर अशी वेळ येऊ नये म्हणून पोलीस विभाग
आणि रेल्वे प्रशासन काय खबरदारी घेणार आहे?
या प्रकरणी रेल्वे प्रशासनाने त्वरित चौकशी करून संबंधितांवर
योग्य ती कारवाई करावी तसेच सदर रुग्णास नुकसान भरपाई द्यावी आणि यापुढे अशा घटना
घडून प्रवाशांच्या जीवाशी दगा फटका होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी अशी
मागणी लोकांचे दोस्त या संघटनेने
निवेदनातून मध्य रेल्वे
प्रशासनाकडे केली आहे.


0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.