रस्त्यावरच्या चळवळी थांबल्या किंवा थांबवल्या असल्या तरी पेटलेली जनता कोणत्याही आंदोलनाची वाट पहात नाही. ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपला क्रोध दाखवतेच. मग तो भाजपाचा आपलेच राज्य असताना निघालेला जन आक्रोश मोर्चा असला तरी त्याची भीड ती बाळगत नाही. थेट मंत्र्यांच्या ताफ्यात शिरून त्याला त्याच्या उरबडवेगिरीचा आरसा दाखवते. संसदेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झालं म्हणून आपलंच सरकार असताना शेकडो लोकांचा मोर्चा काढण्याच्या मूर्खपणा सत्तेवर असणारे नेतेमंडळी करतात तेव्हा त्यांना ‘गेट आउट ऑफ हिअर’ म्हणत त्यांचीच लक्तरं वेशीवर टांगते.

राजकीय नेते मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, त्यांना सामान्य माणसाच्या आयुष्याशी काहीही देणंघेणं उरलेलं नाही. कोणीही यावं आणि चुटकी मारुनी जावं अशीच सामान्य माणसाची गत झालेली आहे. ज्या लोकांच्या डोळ्यांवर विकासाची झापडं आहेत, त्यांनाही या शासकीय मस्तवालपणाचा सामना करावा लागतोच आहे. त्या आपल्या मतदारांची सुद्धा जिथे या सरकारला पर्वा नसते तिथे त्यांच्यावर आक्रमकतेने तुटून पाडणाऱ्यांना तर ते काय भिक घालणार आहेत? सरकारी नाकर्तेपणा रोज ‘याची देही याची डोळा’ पाहणाऱ्या जनतेचा उद्रेक झाला नसता तरच नवल आणि हीच पुढच्या ‘चले जाव’ लढ्याची पेरणी आहे.  

माणसाच्या आयुष्याची किंमत जिथे शून्य झाली आहे, रस्त्यावरून चालता चालता माणसं खड्ड्यांमध्ये पडून जायबंदी होत आहेत. तासनतास लागणाऱ्या वाहतूक कोंडीत आपल्या महत्त्वाच्या कामाला, आपल्या वेळेला, आपल्या आरोग्याला, मन:शांतीला, आपल्या नात्यांना तिलांजली देत आहेत. रेल्वेचा मार्ग मध्य असो, हार्बर असो की पश्चिम असो, तिथे गाड्यांचा गोंधळ झाला की दिलगिरीची टेप लावली की आपली जबाबदारी संपली, असं मानणारे प्रशासन कोणत्या परक्या ग्रहावर आपल्या सर्व सोयी सुविधांच्या योजना राबवत असतात न कळे. कारण आमच्यावर तर ‘सुविधा नको पण योजना आवर’ म्हणण्याची वेळ या सर्व शासकीय प्रशासनांनी आणून ठेवली आहे.

आपल्या घरादाराचं आटपून रोज आपल्या कामाला जाणाऱ्या स्त्रियाच नाही तर एकंदरीतच सामान्य नागरिक कोणत्या अवस्थेत घराबाहेर पडतो आणि कोणत्या अवस्थेत घरी परततो याची या लाल फिती उघडणाऱ्या आणि पुन्हा बंद करून आपण मोठं काम केल्याचा अविर्भाव आणणाऱ्या मंत्र्यासंत्र्यांना आणि त्यांच्या जंत्र्याना माहिती तरी असतं का? या असल्या लोकांना आता ‘चले जाव’ म्हणण्यासाठी जनता आतुर झाली आहे. पण गळ्याशी आलेले शब्द ओठांवर येत नाही अशी तिची अवस्था झाली आहे. कारण मै नहीं तो कौन बे’ असं म्हणणाऱ्या प्रत्येक पक्षाला ‘यह नहीं तो कौन बे? हा प्रतिप्रश्न सध्या तिच्या गळ्यात अडकला आहे.

भाजप सत्तेत आली तेव्हा त्यांना मिळालेलं मतदान हे प्रो-बीजेपी नाही तर अँटी-कॉंग्रेस होतं, आता त्याच्या उलट झालेलंच परवडेल असं सध्याचं चित्र आहे. जिथे धार्मिक उन्माद उच्च कोटीला पोहोचला आहे, पंतप्रधानही जिथे एका समाजाला लक्ष्य करतात, नेते मंडळी वरून आदेश आला की, लोकांना संभ्रमित करून मगरीचे अश्रू ढाळत मोर्चे काढतात, घरात अन्न शिजत नसताना कसली कसली विधेयकं आणतात, इंधन कसं मिळेल यावर चर्चा करण्याऐवजी ‘सब चंगा सी’ म्हणत रांगा लावणाऱ्यांना वेड्यात काढतात, चाळीस चाळीस हजार लोकांच्या नोकऱ्या एका फटक्यात जातात त्याकडे सपशेल दुर्लक्ष करतात, लोकांच्या आयुष्याचा अक्षरश: चिखल झाला आहे - अशा अवस्थेत भाकरी करपण्याआधी परतलेलीच बरी.