मोदींचा सात कलमी कार्यक्रम काय सांगतो?
कॉंग्रेस नेतृत्वाखालील केंद्र व विविध राज्यातील सरकारे पराभूत करून भाजपा व मित्रपक्षांची सरकारे केंद्र व नुकत्याच संपलेल्या पाच राज्यातील निवडणुकांनंतर आणि २०१४ नंतर आता जवळपास अर्ध्याहून अधिक भारतात सत्तास्थानी आलेली आहेत.
या दहा बारा वर्षात
पंतप्रधान मोदी स्वातंत्र्यानंतरच्या ७५+ वर्षात कॉंग्रेस व
विशेषत: पंडित नेहरूंच्या सर्व धोरणांवर व त्यांच्या विफलतेवर सातत्याने कडवी टीका
आजतगायत करत आलेत. आणीबाणीच्या निमित्ताने इंदिरा गांधीवरही कायम टीका आज
पन्नास वर्षानंतरही होते. थोडक्यात भारताची ७५+ वर्षात अधोगतीच
झाली व ती केवळ व केवळ नेहरूंमुळेच हे सतत ठसवले गेले.
काल पंतप्रधानांनी
देशासमोर आलेल्या आणि भविष्यात अधिक गडद होणाऱ्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी
देशवासीयांकडून देशभक्तीची अपेक्षा केलीय. गेल्या बारा वर्षात त्यांनी हरेक
प्रश्न, समस्या, ही देशभक्तीशीच
जोडलीय. मग ते पाकिस्तानी हल्ले असोत, नोटबंदीचा तुघलकी
निर्णय असो, करोनाचे जागतिक संकट असो, किंवा महिला
आरक्षण विधेयक असो व त्याला जोडून मतदारसंघ पुनर्रचना असो वा जनगणना. प्रत्येक गोष्ट
देशभक्तीशी जोडून टाकायची व आपले प्रशासनिक व राजकीय ध्येय धोरणाने आलेले अपयश
त्यामागे दडपून टाकायचे. मोदीपूर्व काळात १५ ॲागस्ट नी २६ जानेवारीलाच देशभक्ती
देशप्रेम ओसंडून वाहे. लोक त्या त्या वेळच्या पंतप्रधानांचे भाषण ऐकत, दूरदर्शन आल्यावर
परेड बघण्याचं अप्रुप व रंगीत टीव्ही आणि नंतर वृत्तवाहिन्या
आल्यावर तर तीच परेड, भाषण, याची देही याची
डोळा तिथे हजर असल्यासारखा अनुभव व दिवसभर मनोजकुमारसह इतर देशभक्तीपर गाण्यांचं दळण
सहजतेने दळलं जायचं. दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा रोजमर्रा की जिंदगी! याच कालखंडात
चित्रपट संपल्यावर हुर्यो करत फडकत्या तिरंग्याकडे दुर्लक्ष करत प्रेक्षक थिएटराबाहेर
पडून रस्त्याला लागत असे. पण कुणी त्यांना देशद्रोही ठरवले ना त्यांच्यावर गुन्हे
नोंदले ना त्यांना मारहाण झाली.
मोदीपर्वात मात्र
देशभक्तीचे आयामच बदलले. त्यात तुमचे हिंदू असणे अग्रक्रमावर आले. साहजिकच मुस्लिम, ख्रिश्चन यांना
सहज देशद्रोही ठरवता येऊ लागले. त्याचा अनुभव आपण उत्तरोत्तर हिंसक पद्धतीने घेतोय.
अशात प्रथमच मोदींनी
देशभक्ती आपल्या म्हणजेच सर्वसामान्यांच्या रहन सहन चाल चलनवर आणून ठेवलीय. आर्थिक संकटावर
आता सरकार काय करणार हे न सांगता जनतेने काय करावे, हे सांगताना
त्यांनी सात कलमी कार्यक्रमच दिलाय. त्यात अन्न शिजवायच्या तेलापासून परदेशी सहली ते
लग्नकार्यात सोनेखरेदी ते सार्वजनिक व त्यातही विद्युत वाहनाने प्रवास
करणे. हे करणे म्हणजेच देशभक्तीतून अर्थसंकटावर मात असा संदेशच
दिलाय.
आजवरची देशाची प्रगती, त्या त्या वेळचे
राजकीय पक्ष, पंतप्रधान, मंत्रिमंडळं यांना
मोडीत काढणारे मोदी (ज्यात वाजपेयींचाही काळ असतो) नकळत आपल्या
पूर्वसूरींच्या पावलावर पाऊल ठेवू लागलेत.
आपल्या आवाहनात मोदींनी
नाव घेतले नाही पण चीन युद्धानंतर आर्थिक संकटावर मात करायला पंडित नेहरूंनी जनतेकडे विशेषत:
महिलांकडे दागिने मागितले व त्यांनी विनातक्रार व अक्षरश: भावविवश देशभक्तीतून
दिलेही.
मोदींनी नेहरूंचे नाव वगळून (जे अपेक्षितच) सांगितले की, आता सोने देऊ नका
तर खरेदीच करू नका वर्षभर! म्हणजे नेहरू मॉडेल
वेगळ्या प्रकारे!
लालबहादूर शास्त्रींनी
६५ च्या पार युद्धानंतर एक वेळ उपवास करा सांगितले (हे त्यांनाच जे
दोनवेळ भरपेट जेवत होते.) आता मोदी अन्नदाता शेतकऱ्यालाच खते किती व कुठली वापरावी हे
सांगताना लोकांनी जेवणात तेलाचा वापर कमी करा सांगताहेत. म्हणजे हा वेगळा
शास्त्री मार्ग.
मोदींच्या सात कलमी
कार्यक्रमाने आणीबाणीत इंदिरा गांधीनी दिेलेला २० कलमी व संजय गांधींनी सुचवलेला ५
कलमी कार्यक्रम आठवला. तो ही अनुशासित
देशभक्तीसाठीच होता. मोदींनी इंदिरा संजयचेच कलमी
प्रारूप स्वीकारलेय!
याचा अर्थ भूतकाळात
ज्या ज्या उपाय योजना देशावरील संकट काळात (अपवाद आणीबाणीचा.पण हुकूमशाहीकडे
झुकलेल्या इंदिराजीना देशावरील संकटच वाटले सनदशीर राजकीय विरोध!) त्या त्या
वेळच्या सरकार, सत्ताधीशांनी केल्या, तशाच आता मोदी
करताहेत. मात्र मोदीपर्वात पूर्वसूरींबद्दल पक्षीय अभिनिवेष
विरहित ना आदर ना कॄतज्ञता!
आपल्या सात कलमी
कार्यक्रमाच्या अंमलबजावणीने काय काय परिणाम, दुष्परिणाम होतील
याबाबत मोदी नेहमीप्रमाणे बेपर्वा राहतील व त्यांचा पक्ष, नेते, राज्यकर्ते, भक्तगण हे या
देशभक्तीत उणे शोधणाऱ्यांना योग्य तो धडा शिकवतीलच.
त्यामुळे तयार रहा मोदीकृत नव्या
सप्तपदीने नवा देशभक्तीपर संसार सुरू करायला!
ताजा कलम:
नुकतीच ॲापरेशन
सिंदूरची वर्षपूर्ती झाली. पण सोमनाथ मंदिर पुनर्स्थापना दिन समारंभात ती काहीशी
झाकोळली. त्यातच आणखी एक बातमीही झाकोळली. या मोहिमेत एक
जवान शहिद झाला. मात्र त्याला ना शहिद दर्जा मिळाला ना सैनिकी सेवेचे
अर्थलाभ. त्याची आई कोर्टात गेली. कोर्टात सरकारने
सांगितले ‘जवान नियमित सेवेत नव्हता. तर अग्निवीर या
चार वर्षीय मर्यादित सेवेत होता. त्यांना ना शहिद दर्जा मिळत ना नियमित सैनिक वेतन वा इतर
लाभ. त्यामुळे ते सर्व मिळावं हा त्या मातेचा दावाच बाद होतो!’ यासोबत सरकारने
जाताजाता कोर्टाला हेही सांगितले की त्यांना साधारण अडिच कोटी रूपये मिळालेत!
![]() |
| अग्निवीर मुरली नाईक |
अग्निवीर नामक टेंपररी
सैनिकी जीवनाचे मरणोत्तर वास्तव!
कदाचित देशभक्तीचे हे
आठवे कलम ठरावे.
संजय
पवार



0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.