गेला पंधरवडा विलक्षण होता. देशात आणि राज्यात विस्मयकारी घटना घडल्या.
विस्मयकारी हा शब्द अपुरा पडेल अशा अनेक घटनांची आपल्याला सध्या सवय झालेली असल्याने संपूर्ण देशच बधिरावस्थेत आहे. त्यामुळे बधिरावस्थेतील रूग्ण जसा निस्तेज डोळ्यांनी पहात असतो तसे तुम्ही आम्ही बघत असतो.
देशपातळीवर पक्षफोडीचे
अभियान पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्यात आले. त्यात यावेळी मोठी कुऱ्हाड तृणमूल कॉंग्रेसवर चालविण्यात आली. आधी खासदार व नंतर आमदार फोडत तृणमूल कॉंग्रेसला मूळ शिवसेना व मूळ राष्ट्रवादी पक्षाप्रमाणे नाव पक्षचिन्ह हे निवडणूक
आयोगाकडून व्हाया सुप्रिम कोर्ट व विधानसभा अध्यक्षांद्वारे फुटीर गटांना मिळेल, हे आता उघड गुपित
किंवा ही उघड प्रणाली म्हणता येईल. एकेकाळच्या जिगरबाज ममतांची संपूर्ण देहबोली एका क्षणात उद्धव ठाकरे
व शरद पवारांसारखी झाली. त्या इतक्या नरमल्या की पक्ष कॉंग्रेसमध्ये
विसर्जित करतील की काय, अशी स्थिती निर्माण झाली.
बंगाल टायगर
संपविल्यावर महाशक्तीने पुन्हा महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करत २०२२ च्या
फुटीनंतर पक्ष नाम व चिन्ह गमावलेल्या उद्धव ठाकरेंनी उद्धव बाळासाहेब
ठाकरे सेना हे नवे नाव व मशाल या नव्या चिन्हासह २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ९
खासदार निवडून आणले. महाशक्तीने आता दोन वर्षानंतर या ९ मधले ६ खासदार
फोडले. महाशक्तीचे कौतुक हे की दोन तृतीयांशचा
आकडा पूर्ण करण्याइतपत खासदार त्यांनी खात्रीने फोडले. आता उबाठाकडे
उरलेत ते खरेच निष्ठावान!
याचा अर्थ २२ साली
शिवसेना विभाजित झाली तर २६ साली शिवसेनेनेच उर्वरित शिवसेना पुन्हा विभागली वा
फोडली. पाव्हण्याच्या काठीने साप मारण्यात महाशक्तीने महारथ हासिल
केलीय. कारण तृणमूल
फोडून त्यांनी ती अशा एका पक्षात विलीन केली
ज्याचे नाव त्या पक्ष संस्थापक व निवडणूक आयोगालाच माहित असावे.
तृणमूल व उबाठा यांनी जितकी वाहता येईल तितकी लाखोली काही
दिवसांपर्यंत आपल्याच असलेल्या खासदारांना वाहिली. उद्धव ठाकरे
या निमित्ताने त्या मतदारसंघात जाऊन वज्रमूठ दाखवून आले. पण या मूठीतून
वाळू घसरावी तसे खासदार घसरले. भविष्यात आमदार व नगरसेवक घसरणार नाहीत कशावरून? हा जनतेला पडलेला
प्रश्न.
इतिहासात सेनेतून बाहेर
पडल्यावर अखंडित सेना अंगावर घेण्याचे काम नारायण राणे यांनी एकट्यांनी केले होते
व ते सेनेला पुरून उरले होते.
आता शतखंडित सेनेला
अंगावर घेण्याचे काम संजय दिना पाटलांनी केले. त्यांची चूक एवढीच
झाली की, ते सेनेला भिडण्याऐवजी पत्रकारांना भिडले! एकनाथ शिंदेंनी गांभीर्य ओळखून
दिलगिरी व्यक्त करायला लावली खरी पण तोवर वेळ निघून गेली होती. संजय पाटलांचा
शिवराळपणा व धमक्या इतक्या अश्लाघ्य होत्या की, त्यामुळे संजय
राऊतांची तोंडपाटीलकी झाकली गेली!
हा तमाशा कमी की, काय म्हणून
अयोध्येतील बाबरी पतनानंतर हिंदू अस्मितेचे प्रतिक म्हणून चार पाचशे वर्षांच्या लढ्यानंतर
उभारलेले ऐतिहासिक भव्य राममंदिर चर्चेत आले ते तेथील निर्माणापासून ते देखभालीपर्यंत
सर्व व्यवस्था बघणाऱ्या ट्रस्टच्या काही पदाधिकारी, कर्मचारी व
सेवेकऱ्यांनी खरेदी विक्री केलेल्या जमिनी, दानपेटीतील रक्कम, सोने, चांदीसह प्रभू
श्रीरामाच्या पादुका गळ्यातील हार अशा सुमारे दोनशे कोटींहून अधिक रकमेचा
गैरव्यवहार, चोरी यामुळे! देशभरातील समस्त रामभक्तांच्या श्रद्धेशीच प्रतारणा
केली गेलीय. यावर विरोधी पक्षांनी विशेषत: समाजवादी पक्षाने आवाज उठवताच
या नास्तिकांना, सनातनी विरोधकांना काय अधिकार बोलण्याचा असा निर्लज्ज
प्रश्न विचारण्यात आला. निर्लज्ज अशासाठी कारण अयोध्या मतदारसंघातून समाजवादी
पक्षाचा खासदार निवडून आलाय. त्यामुळे संसदीय सदस्य म्हणून हा पक्ष, खासदार प्रश्न
उपस्थित करूच शकतो. असो. तर चार पाचशे वर्षांच्या
आंदोलनाला भाजप, रास्वसं व मंदिर ट्रस्ट यांनी दोन वर्षात बट्टा लावला. आता त्यांचं काय
करायचं ते जनताच ठरवेल. लवकरच उत्तर प्रदेशात निवडणुका आहेतच.
राम राम हे आपल्या
महाराष्ट्रातलं संबोधन. तर जय सियाराम हे उत्तरेतील! उत्तरेत राम गाजत
असताना महाराष्ट्रात २० वर्षाची सिया नामक मुलगी गाजत आहे. तिने आपल्या भावी
राम म्हणजे पती केतन याची लोहगडावरून ढकलून हत्त्या केली असा आरोप आहे. यात तिचा मित्र
चेतनचा सहभाग आहे. तोही आरोपी व सध्या पोलिसांच्या ताब्यात.
राममंदिरातील दानपेटी
चोरी इतकीच या तरूण मुलीने नाते पसंत नाही म्हणून ज्या पद्धतीने मित्रासोबत
मिळून हत्त्या केली ते ऐकून, पाहून, वाचून समाज पुन्हा
बधिरावस्थेकडे गेला.
ॲरेंज मॅरेजमध्ये मुलगा
वा मुलीची नापसंती विचारात घेण्याइतपत समजूतदारपणा निदान शहरी वा महानगरीत
वास्तव्य करणाऱ्या कुटुंबात दिसतो. अर्थात आधुनिकता पोषाखी व राहणीमानात येते पण जाती धर्माचे
कडवट संस्कार तसेच राहिलेले असतात. त्यातून मग काही घटना घडतात. या घटनेत मुलीने घरी
हे आवडले नसते, असे सूचित करणे तर घटना घडल्यावर मुलाकडच्या लोकांनी
मुलीच्या कुटुंबियांचेच चारित्र्यहनन करणे व सामाजिक बहिष्काराची भाषा बोलणे हे
कुठल्या संस्कृतीचे निदर्शक? मुलाच्या हकनाक मृत्यूचे दु:ख
मोठेच. त्यामुळे होणारा उद्वेग व त्रागाही समयोचित. पण कायद्याने
न्याय मागताना समांतरपणे स्वत:चेच नैतिक कायदे लावण्याची भाषाही करायची यातून आजही
मानसिकता तीच आहे, हे लक्षात यावे.
अशा पद्धतीने ही
वेगळीच सियाराम गोष्ट.
धर्माच्या ठेकेदारांची
दुकानदारी लोकशाहीच्या नावे जोरदार सुरू असताना धर्माच्याच अनुषंगाने गुन्हेगारीही
वाढावी, याला अधर्म म्हणण्याचीही हिंमत सध्या कुणात नाही.
रामायणातला परिट
रामायणातच बरा!
ताजा कलम:
विश्वगुरूंच्या देशात
विद्यार्थ्यांच्या परिक्षेचे पेपर तर नीट फुटलेच पण गुरूंची गुणवत्ता तपासणाऱ्या
टीईटीचे पेपरही फुटले. नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन करणाऱ्या झुरऴांनी आता टीईटी
फुटीचा विषयही आंदोलनात घेतलाय. विद्यार्थी व गुरू परिक्षा पेपरफुटी विरोधात एकत्र आंदोलन
करताहेत हे फक्त विश्वगुरूंच्याच देशात घडू शकते.
संजय
पवार




0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.