![]() |
| अनुराग कुमार यांनी सतीश गोलचा यांच्याकडून स्वीकारला पदभार |
सतीश गोलचा यांची गच्छंती; अनुराग कुमार नवे पोलीस आयुक्त
नवी दिल्ली, दि. १७ : राजधानी दिल्लीतील कायदा व
सुव्यवस्थेबाबत गेल्या काही महिन्यांत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर
केंद्र सरकारने शुक्रवारी दिल्ली पोलिसांच्या नेतृत्वात मोठा बदल करत पोलीस आयुक्त
सतीश गोलचा यांची बदली केली. त्यांच्या जागी १९९४ बॅचचे एजीएमयूटी संवर्गातील
आयपीएस अधिकारी अनुराग कुमार यांची दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती
करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील आदेश जारी केले असून
अनुराग कुमार पदभार स्वीकारल्यापासून पुढील तीन वर्षे किंवा पुढील आदेशापर्यंत या
पदावर कार्यरत राहतील.
दिल्ली पोलिसांच्या
नेतृत्वातील हा बदल अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा राजधानीतील काही घटनांमुळे पोलीस प्रशासनावर सातत्याने प्रश्नचिन्ह
उपस्थित होत होते. दिल्ली विधानसभेच्या परिसरात एका कारने सुरक्षा व्यवस्था भेदून
प्रवेश केल्याची घटना, काही भागांतील वाढत्या गुंडगिरी आणि
खंडणीच्या प्रकरणांबाबत विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न, तसेच
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेवरून झालेला
वाद यामुळे दिल्ली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर टीका झाली होती.
याशिवाय, राजधानीत महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न,
संघटित गुन्हेगारी, अंमली पदार्थांचे वाढते
जाळे आणि व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी यांसारख्या मुद्द्यांवरही दिल्ली
पोलिसांना लक्ष्य करण्यात आले होते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर
नेतृत्वबदलाची चर्चा सुरू होती.
अनुराग कुमार हे
नियुक्तीपूर्वी गुप्तचर विभागात (इंटेलिजन्स ब्युरो) विशेष संचालक म्हणून कार्यरत
होते. नियुक्तीच्या आदल्या दिवशी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी)
त्यांना त्यांच्या मूळ एजीएमयूटी संवर्गात परत पाठविण्यास मंजुरी दिली होती.
त्यानंतर अवघ्या एका दिवसात त्यांच्याकडे दिल्ली पोलिसांच्या सर्वोच्च पदाची धुरा
सोपविण्यात आली.
अनुराग कुमार यांना
दिल्ली पोलिसांमध्ये विविध पदांवर काम करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांनी उपायुक्त, संयुक्त आयुक्त आणि विशेष आयुक्त म्हणून
जबाबदाऱ्या सांभाळल्या असून त्यानंतर गुप्तचर विभागात राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवादविरोधी कारवाया आणि अंतर्गत सुरक्षेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या
जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना पोलीस पदक तसेच
राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरविण्यात आले आहे.
सतीश गोलचा यांनी २२
ऑगस्ट २०२५ रोजी दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. त्याआधी ते
तिहार कारागृहाचे महासंचालक होते. मात्र, नियोजित कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आली असून
पदभार सोपवल्यानंतर पुढील नियुक्तीसाठी दिल्लीच्या नायब राज्यपालांकडे हजर
राहण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.

0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.