बांधकाम, घरेलु, बिडी, ऊसतोड कामगारांचे ठिय्या आंदोलन
२ जून २०२६ : आझाद मैदान
कालपासून सिटूच्या
नेतृत्वाखाली आझाद मैदानावर सुरू झालेल्या आक्रोश ठिय्या आंदोलनात आज बांधकाम, घरेलु, बिडी, ऊसतोड, यंत्रमाग आदी असंघटित क्षेत्रातील कामगार हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. या
आंदोलनाचे नेतृत्व सिटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, सरचिटणीस एम. एच. शेख, सिटू पदाधिकारी के. आर. रघु, डॉ. विवेक
मॉन्टेरो, शुभा शमीम, भूषण
पाटील,
उज्वला पडलवार, बांधकाम कामगारांचे नेते भरमा कांबळे, शिवाजी मगदूम, बिडी कामगारांच्या नेत्या नसीमा शेख, घरेलु कामगारांच्या नेत्या आरमायटी इराणी, किरण मोघे, ऊसतोड कामगारांचे नेते आबासाहेब चौगुले, यंत्रमाग कामगारांचे नेते युसुफ मेजर आदींनी केले. व या
सर्वांनी कामगारांना गुलामीकडे ढकलणाऱ्या धोरणांवर घणाघाती टीका केली.
आंदोलनाला सुप्रसिद्ध
अर्थतज्ज्ञ अर्जुन सेनगुप्ता कमिटीच्या
सदस्या व गायिका डॉ. सुमंगला दामोदरन यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी नमूद केले
की, असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सरकारने विशेष जबाबदारी
घेतली पाहिजे व त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद केली पाहिजे. असंघटित क्षेत्रातील
कामगार देशात ९० टक्के असून देशाच्या आर्थिक विकासात ते फार मोठे योगदान करतात.
डीवायएफआयचे राज्य अध्यक्ष मोहन जाधव, यांनी आंदोलनाला पाठिंबा देत सरकारच्या बेरोजगारी
वाढवणाऱ्या धोरणांवर प्रहार केला.
कामगारांचे आपल्या झंझावाती गीतांमधून सातत्याने प्रबोधन करणारे क्रांतीकारी शाहीर संभाजी भगत यांनी कामगारांना संबोधित केले. त्यांनी जाती धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडून, गरिबांच्या पोरांना भडकवून दंगे करायला लावून सत्ता काबीज करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा आपल्या गीतांमधून पर्दाफाश केला.
आज सिटूच्या
शिष्टमंडळाला कामगार मंत्री माननीय आकाश फुंडकर यांनी निमंत्रित केले. सिटूच्या
शिष्टमंडळाद्वारे महाराष्ट्रातील तमाम असंघटित कामगारांच्या वतीने प्रमुख
मागण्यांचे निवेदन देण्यात आले व या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सिटूच्या वतीने शिष्टमंडळात डॉ. डी. एल. कराड, एम. एच. शेख, माकपचे आमदार कॉ. विनोद निकोले, डॉ. विवेक मॉन्टेरो, आरमायटी इराणी, किरण मोघे, भरमा कांबळे, आबासाहेब चौगुले आदी सहभागी होते.
असंघटित क्षेत्रातील
कामगारांच्या प्रमुख मागण्या
1. सर्व क्षेत्रातील
कामगारांना कायम करा व ३०,००० रुपये किमान वेतन द्या.
2. सर्व कामगारांना
भविष्य निर्वाह निधी, ईएसआय, पेन्शन
लागू करा.
3. असंघटित क्षेत्रातील
कामगारांसाठी क्षेत्र निहाय कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्यांना विविध योजना लागू
करा. त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करा.
4. मालक धार्जिण्या व
कामगार विरोधी चार श्रमसंहिता रद्द करा. त्यांची महाराष्ट्रात अंमलबजावणी करू नका.
कामगारांच्या बाजूचे कायदे लागू करून त्यांची कडक अंमलबजावणी करा.
5. महागाई कमी करा व
स्वयंपाक व वाहनांसाठी स्वस्त दरात गॅस उपलब्ध करून द्या.
6. सर्व योजना
कर्मचाऱ्यांना कायम करून किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, पेन्शन लागू करा.




0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.