गेला महिना दोन महिने प्रथम पेपरफुटीच्या बातम्यांनी या परिक्षासंबंधित विद्यार्थी पालक यांना मन:स्ताप दिला. नंतर एकूणच शिक्षण व्यवस्थेविषयी एक सार्वजनिक असंतोष उर्वरित जनतेच्या मनातच धुमसत राहिला.
त्या वाफेला वाट करून दिली सरन्यायाधीशांनी एक अकारण वक्तव्य करून. सरन्यायधीश पदावरील व्यक्तीने संविधानिक मार्ग वापरून आवाज उठविणाऱ्यांना न्यायिक साथ देण्याऐवजी त्यांनी अनावश्यक टिप्पणी केली आणि परिणामस्वरूप ‘कॉक्रोच जनता पार्टी’ असे नाव धारण केलेल्या आंदोलनाने सध्या देशाची मुख्य शहरे काही तासापुरती चर्चेत रहातात.
या कॉजपाने
शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा सात दिवसात मागितला होता. तो न घेतल्यास
देशभर तीव्र व अखंडित आंदोलन छेडण्याची घोषणा केली होती. सरकारने आजतगायत
काही राजीनामा घेतलेला नाही व येत्या रविवारी फेरपरिक्षा लष्करी बंदोबस्तात
करण्याचे जाहिर केले व दारूगोळा वा हत्त्यारबंद सैनिक वाहून नेणारी हवाई दलाची
विमाने एका प्रवेश पूर्व परिक्षेच्या प्रश्नपत्रिका बंदोबस्तात वाहून नेतील. अजून तरी या
परिक्षेवर सामूहिक बहिष्कार वा तात्विक विरोधाचे आवाहन ना कॉजपाने
केलंय, ना ती परिक्षा
देणाऱ्या विद्यार्थ्यानी ना त्यांच्या पालकांनी ना अन्य विद्यार्थी संघटनांनी. सर्वसाधारण जनता
एका टप्प्यानंतर बाजूला झालीय. कारण डॉक्टरी शिक्षणासाठी होणारी ही परिक्षा आता प्रस्थापित डॉक्टर
कुटुंबातील मुलं मुलीच या अभ्यासक्रमात येतात व त्यांनीच प्रवेश पूर्व व नंतर
प्रत्यक्ष परिक्षेत पेपरसेटर, ते तपासणारे यांना
पैशाचे इतके डोस पाजलेत की भलेभले उच्चविद्याविभूषित उच्चवर्णीय मेरिट वगैरे
बाजूला ढकलून या गैरव्यवहारात सामील झालेत. हे जे नवीन डॉक्टर
तयार होणार ते आपल्या पिढिजात रूग्णास नागवे करण्याची पिढीजात रूग्णसेवा करणार!
त्यामुळे या एका
परिक्षेभोवती जनआंदोलन उभारून कॉजपा काय साधणार? ते एका मंत्र्याच्या राजीनाम्यात अडकून न राहता व्यापक
प्रश्नांना भिडतील का?
पेपर फुटी आणि कॉजपावरून
समाजमाध्यमे व युट्यूबवरील समांतर पत्रकारिता दोन तीन गटात विभागली होती. गोदी मीडियाने
कोचिंग क्लासवाल्यांना धारेवर धरताच त्यांनी असा उलटवार केला की गोदी मीडियाचे
थोबाड फुटले.
या दरम्यान देशाच्या
राजकारणात निवडणुका संपल्यावर भाजपने पक्षफोडीचा जुनाच खेळ
नव्याने खेळायला सुरूवात केली. त्यात तृणमूल
कॉंग्रेसचा घास घेण्यात ते
यशस्वी झाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट फोडण्याचा प्रयत्न बहुधा अंगाशी येणार
पण तो व्हाया शिंदे असल्याने डाव उधळला गेला तर भाजप हात झटकून ‘मी नाही त्यातली
नी कडी लावा आतली,’ असे शहाजोगपणे म्हणू शकते. आगामी आकर्षण
म्हणून सपा संदर्भात बातम्या पेरायला सुरूवात करताच लाल टोपी सावध व अधिक लाल
झाली!
यानिमित्ताने इंडिया
आघाडीत मांडणी फेरमांडणीचा खेळ रंगला. ममता व शरद पवार या मूळ कॉंग्रेसवासीयांनी
आपले जवळपास पावशतकी पक्ष कॉंग्रेसमध्ये
विलिन करून भाजप विरोधात भक्कम आघाडी करावी, अशा
चर्चा सर्व माध्यमात चालू झाल्या. त्याचवेळी कॉंग्रेसने दुखावलेल्या द्रमुकला एनडीएत आणण्यासाठी भाजपने
दक्षिणदिग्विजयासाठी (अजून एकदा) प्रयत्न करण्यासाठी घोडी फुरफुरू लागली. यात युबीटी नेते
संजय राऊत यांनी गद्दारांना आता नुस्त्या शब्दांच्या लाखोली न वाहता शिवसेना-स्टाईल मुसक्या
आवळल्या जातील, असा इशारा दिल्याने मरगळलेल्या विरोधकात जराशी धग पेटली. पूर्वीच्या सेनेत ‘खोपकर करू’ असा शब्दप्रयोग
होता. (जिज्ञासूंनी याकरिता धर्मवीर चित्रपट पहावा) उबाठा आता
पुन्हा त्या स्तरावर उतरते की शिंदेना कात्रज घाट दाखवत स्वत:च
उजवे वळण घेते हे कळायला फडणवीसांकडे लक्ष ठेवावे लागेल. बाकी शरद पवार
कुठेही राहिले तरी दोन्ही काठ धरूनच ते प्रवाहात राहतात. म्हटलं तर विरोधी
प्रवाह, म्हटलं तर सत्तेचा
प्रवाह!
पेपर फुटीच्या बातम्या
नित्त्याच्या झालेल्या असताना, पक्ष फुटीच्या
बातम्याही अंगवळणी पडलेली जनता सध्या उन्हाच्या काहिलीत होरपळून जाताना ढगफुटी कधी
होईल, या प्रतिक्षेत चातकाच्या भूमिकेत अघिक समरसून गेलीय!
ताजा कलम:
मुंबईत सध्या पांढऱ्या
पट्ट्यांचा वाद पेटत चाललाय. यातला गंमतीचा भाग धर्मध्वजा घेऊन राजकारण व निवडणुकात उतरलेले
पक्षच आता धर्म रस्त्यावर नको, घरात ठेवा असा उलटा दम देताहेत. रस्ता नमाज नी
भोंगे यावरून इशारे देणारे हिरवे पट्टे चालतील का, असा सवाल
पांढऱ्या पट्ट्यावाल्यांना विचारताहेत. तर आक्रमक सकल हिंदू तूर्त मौनात
गेल्याचे दिसते!
संजय
पवार




0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.