नेपाळमध्ये २६ ऑगस्ट २०२६ रोजी हिमालयीन भागात आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडमुळे निसर्गाचा रुद्रावतार संपूर्ण जगाने पाहिला. 

हिमनदी आणि बर्फ-खडकाचा मोठा भाग कोसळल्यानंतर निर्माण झालेल्या प्रचंड पाण्याच्या लोंढ्याने नेपाळ आणि चीनच्या सीमावर्ती भागात मोठी विध्वंसक परिस्थिती निर्माण केली. रस्ते, पूल, घरे आणि वीज प्रकल्प उद्ध्वस्त झाले. या दुर्घटनेमागे अनेक नैसर्गिक घटक असले तरी वाढते तापमान आणि हिमनद्यांची अस्थिरता यामुळे अशा आपत्तींचा धोका वाढत असल्याचे हवामानतज्ज्ञ सांगत आहेत. नेपाळने गेल्या काही दशकांत हिमनद्यांमधील मोठ्या प्रमाणावर बर्फ गमावला आहे.

नेपाळमधील ही घटना आपल्याला एक मोठा प्रश्न विचारायला भाग पाडते तो हा की, पृथ्वीचे तापमान वाढत असताना आपण ज्या पद्धतीने शहरे आणि इमारती उभारत आहोत, ती पद्धत पर्यावरणाच्या संकटात आणखी भर तर घालत नाही ना? याच संदर्भात शहरांमध्ये वेगाने वाढणाऱ्या काचेच्या इमारतींकडे पाहणे आवश्यक ठरते.

काचेच्या भिंतींनी सजलेल्या उंच इमारती आज आधुनिक शहरांचे प्रतीक बनल्या आहेत. मोठ्या कंपन्यांची कार्यालये, पंचतारांकित हॉटेल्स, मॉल्स आणि व्यावसायिक संकुले यांना काचेचा झगमगाट देणे प्रतिष्ठेचे मानले जाते. काचेच्या इमारती सुंदर दिसतात, दिवसा नैसर्गिक प्रकाश आत येतो आणि बाहेरचे दृश्य स्पष्ट दिसते. त्यामुळे अशा इमारती आधुनिक आणि पर्यावरणपूरक असल्याचा आभास निर्माण होतो. पण काचेच्या या चमकदार दुनियेची एक काळी बाजूही आहे.

 

सूर्यप्रकाश की सूर्याची उष्णता?

काचेच्या इमारतींची सर्वात मोठी समस्या म्हणजे सूर्याची उष्णता. मोठ्या काचेच्या पृष्ठभागातून सूर्यप्रकाश इमारतीच्या आत येतो आणि त्याबरोबर काच गरम होऊन उष्णताही वाढते. त्यामुळे या काचेच्या इमारतीत काम करणाऱ्यांसाठी वातानुकूलन यंत्रणांचा वापर वाढतो. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वीज लागते. ही वीज जर कोळसा, नैसर्गिक वायू किंवा इतर जीवाश्म इंधनांवर आधारित असेल, तर अप्रत्यक्षपणे कार्बन उत्सर्जन वाढते. भारतासारख्या उष्ण हवामानाच्या देशांमध्ये ही समस्या अधिक गंभीर आहे.

म्हणजेच, काचेची भिंत दिवसा विजेच्या दिव्यांची गरज कमी करू शकते; पण त्याच वेळी इमारतीचे तापमान वाढवून वातानुकूलनासाठी लागणारी वीज वाढवू शकते. यामुळे काचेची इमारत किती पर्यावरणपूरक आहे, हे केवळ तिच्या बाह्य स्वरूपावरून ठरवता येत नाही.

 

जगाच्या हवामान संकटात काचेच्या इमारतींचाही वाटा

जागतिक ऊर्जा वापरामध्ये इमारतींचा वाटा मोठा आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या (IEA) ‘Energy Efficiency 2025 अहवालानुसार, २०२४ मध्ये जागतिक अंतिम ऊर्जा मागणीपैकी सुमारे ३० टक्के ऊर्जा इमारतींमध्ये वापरली गेली. इमारतींच्या वाढत्या क्षेत्रफळामुळे ऊर्जा कार्यक्षमतेत झालेली सुधारणा पुरेशी ठरत नसल्याचेही संस्थेने नमूद केले आहे.

याचा अर्थ असा नाही की, काचेच्या इमारतीच जागतिक तापमानवाढीसाठी जबाबदार आहेत. परंतु मोठ्या काचेच्या पृष्ठभागाचा चुकीचा वापर, वाढलेला वातानुकूलनाचा वापर, बांधकामासाठी लागणारी ऊर्जा आणि काचेच्या उत्पादनातील ऊर्जा खर्च या सर्वांचा एकत्रित विचार केला तर त्यांच्या पर्यावरणीय परिणामाकडे दुर्लक्ष करता येत नाही. जागतिक ऊर्जा क्षेत्रातून होणारे हरितगृह वायूंचे उत्सर्जन आजही प्रचंड आहे. २०२४ मध्ये ऊर्जा-संबंधित कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाने विक्रमी पातळी गाठली होती.

 

काच तयार करण्यासाठीही मोठी ऊर्जा लागते

आपल्याला काच म्हणजे वाळू आणि पारदर्शकता एवढेच वाटते. प्रत्यक्षात काचेचे उत्पादन ही मोठ्या प्रमाणावर ऊर्जा लागणारी औद्योगिक प्रक्रिया आहे. कच्चा माल मिळवण्यापासून त्याची वाहतूक, काच वितळवण्यासाठी आवश्यक असलेले अत्यंत उच्च तापमान, उत्पादन प्रक्रिया आणि तयार काच इमारतीच्या ठिकाणी पोहोचवणे या प्रत्येक टप्प्यावर ऊर्जा वापरली जाते. त्यामुळे काचेच्या इमारतीचा पर्यावरणीय परिणाम ठरवताना केवळ इमारतीत वापरल्या जाणाऱ्या विजेचा विचार पुरेसा नाही. काचेच्या उत्पादनापासून इमारत पाडल्यानंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्यापर्यंत तिच्या संपूर्ण जीवनचक्राचा विचार करावा लागतो. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या २०२५ च्या अहवालानुसार, विटा आणि काच यांसारख्या बांधकाम साहित्याशी संबंधित उत्सर्जनाचाही जागतिक उत्सर्जनात स्वतंत्र वाटा आहे.

 

पक्ष्यांसाठी काच म्हणजे अदृश्य भिंत

काचेच्या इमारतींचा पर्यावरणीय परिणाम केवळ कार्बन उत्सर्जनापुरता मर्यादित नाही. पक्ष्यांसाठीही काचेच्या इमारती धोकादायक ठरू शकतात. स्वच्छ काचेवर आकाश, झाडे किंवा मोकळी जागा प्रतिबिंबित होत असल्यामुळे पक्ष्यांना काचेची भिंत दिसत नाही. ते त्या दिशेने उडतात आणि काचेवर आदळतात. शहरांमध्ये काचेच्या इमारतींची संख्या वाढत असताना हा जैवविविधतेशी संबंधित प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरत आहे.

 

शहरांचे तापमान वाढवण्यातही हातभार?

काच, काँक्रीट आणि डांबर यांचे मोठ्या प्रमाणावरील बांधकाम आणि शहरांमधील हिरवाईचा अभाव यामुळे शहरी उष्णता वाढू शकते. काचेच्या इमारतींमधून सूर्यप्रकाशाचे परावर्तन काही ठिकाणी उष्णता अधिक केंद्रित करू शकते. त्यामुळे शहराची रचना करताना केवळ इमारत किती आकर्षक दिसते यापेक्षा ती स्थानिक हवामानाशी किती सुसंगत आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे.

 

मग काचेच्या इमारती पूर्णपणे चुकीच्या आहेत का?

नाही.

काच ही स्वतः पर्यावरणविरोधी वस्तू नाही. योग्य प्रकारची ऊर्जा-कार्यक्षम काच वापरल्यास उष्णतेचा प्रवेश कमी करता येतो. दुहेरी काच, कमी उत्सर्जन करणारे विशेष लेप, बाह्य सावली देणाऱ्या रचना आणि योग्य दिशानियोजन यामुळे इमारतीचा ऊर्जा वापर कमी करता येतो. नैसर्गिक प्रकाशाचा योग्य वापर केल्यास दिवसा कृत्रिम प्रकाशासाठी लागणारी वीजही कमी होऊ शकते. म्हणून प्रश्न ‘काचेच्या इमारती हव्यात की नकोत?’ हा नाही. खरा प्रश्न आहे—‘काचेचा वापर किती आणि कसा करायचा?’

 

काचेपेक्षा महत्त्वाची आहे वास्तुरचना

उष्ण देशांमध्ये संपूर्ण इमारत काचेने झाकण्याऐवजी स्थानिक हवामानानुसार वास्तुरचना करणे अधिक शाश्वत ठरू शकते. मोठे छज्जे, बाह्य सावली, नैसर्गिक वायुवीजन, झाडे, हिरवी छते, योग्य दिशानियोजन आणि ऊर्जा-कार्यक्षम काच यांचा एकत्रित वापर करता येतो.

इमारतीची रचना अशी असावी की वातानुकूलन आणि कृत्रिम प्रकाशावर कमीत कमी अवलंबून राहावे.

कारण खऱ्या अर्थाने ‘ग्रीन बिल्डिंग’ म्हणजे हिरव्या रंगाची काच लावलेली इमारत नव्हे; तर जिच्या संपूर्ण आयुष्यात कमी ऊर्जा, कमी पाणी, कमी कच्चा माल आणि कमी कार्बन उत्सर्जन लागते अशी इमारत. अशा इमारतींची दोन उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत.

१. गोदरेज प्लांट १३ अ‍ॅनेक्स, विक्रोळी, मुंबई



गोदरेज अँड बॉइसच्या विक्रोळी येथील प्लांट १३ अ‍ॅनेक्स या इमारतीला भारतातील पहिल्या सीआयआय–आयजीबीसी नेट झिरो एनर्जी बिल्डिंगचा दर्जा मिळाला आहे. ही इमारत उष्ण आणि दमट मुंबईच्या हवामानासाठी ऊर्जा-कार्यक्षम पद्धतीने तयार करण्यात आली आहे. तिचे क्षेत्रफळ सुमारे २४,४४३ चौरस मीटर आहे. मुंबईसारख्या उष्ण-दमट हवामानात मोठ्या प्रमाणावर ऊर्जा खर्च न करता कार्यालयीन इमारत कशी उभारता येते, याचे ही इमारत म्हणजे उत्तम उदाहरण आहे.

२. सीआयआय–सोहराबजी गोदरेज ग्रीन बिझनेस सेंटर, हैदराबाद



ही भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध हरित इमारतींपैकी एक आहे. इमारतीची रचना अशा प्रकारे केली आहे की नैसर्गिक वारे इमारतीभोवती आणि आतील भागातून फिरू शकतील. हिरव्या छतांचा वापर करण्यात आला आहे. वास्तुरचनेत सावली, नैसर्गिक प्रकाश आणि नैसर्गिक वायुवीजनाचा विचार केला आहे. विशेष म्हणजे या इमारतीच्या छताचा मोठा भाग हिरव्या वनस्पतींनी व्यापलेला आहे, तर उर्वरित भागात सौर पॅनेल्सचा वापर करण्यात आला आहे. इमारतीमध्ये ऊर्जा-कार्यक्षम काचेचाही वापर करण्यात आला आहे. उत्तरेकडील भागात नैसर्गिक प्रकाशाचा अधिक कार्यक्षम वापर करण्यासाठी काचेची रचना करण्यात आली असून, काही ठिकाणी दुहेरी काचेचा वापर करण्यात आला आहे. या इमारतीला आयजीबीसी नेट झिरो एनर्जी प्लॅटिनम दर्जा मिळाला आहे आणि तिच्या ऊर्जेची गरज मोठ्या प्रमाणावर ऑन-साइट सौरऊर्जेतून भागवली जाते.

सीआयआय–आयजीबीसी नेट झिरो एनर्जी बिल्डिंग म्हणजे काय?

सीआयआय–आयजीबीसी नेट झिरो एनर्जी बिल्डिंग म्हणजे अशी इमारत जी वर्षभरात जितकी ऊर्जा वापरते, तितकीच ऊर्जा नवीकरणीय ऊर्जेच्या स्रोतांमधून उदा. सौरऊर्जा आणि तत्सम उर्जा निर्माण करते किंवा भरून काढते. हे प्रमाणपत्र इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) देते. आयजीबीसीने ही नेट झिरो एनर्जी रेटिंग प्रणाली २०१८ मध्ये सुरू केली.

यासाठी इमारतीमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात:

ऊर्जेचा वापर कमीत कमी करणे. ऊर्जा-कार्यक्षम काच, योग्य वास्तुरचना, नैसर्गिक प्रकाश व वायुवीजन, कार्यक्षम वातानुकूलन आणि प्रकाशयोजना. उरलेली ऊर्जा नवीकरणीय स्रोतांतून मिळवणे. प्रामुख्याने सौरऊर्जा; ती इमारतीच्या परिसरात किंवा बाहेरील स्रोतांतून मिळू शकते.

आयजीबीसीच्या निकषांनुसार ‘नेट झिरो एनर्जी’ दर्जासाठी इमारतीच्या वार्षिक ऊर्जेच्या १०० टक्के गरजेइतकी ऊर्जा नवीकरणीय स्रोतांमधून निर्माण किंवा भरून काढणे अपेक्षित आहे. त्यापेक्षा किमान ७५ टक्के गरज भागवली तर ती निअर नेट झिरो एनर्जी श्रेणीत येते. महत्त्वाचे म्हणजे, हा फक्त इमारत किती सुंदर किंवा हिरवी दिसते यावर आधारित पुरस्कार नाही. इमारतीची प्रत्यक्ष ऊर्जा-कार्यक्षमता आणि ऊर्जा निर्मितीचे मोजमाप या रेटिंगमध्ये महत्त्वाचे असते. हे प्रमाणपत्र सध्या तीन वर्षांसाठी वैध असते.

 

नेपाळपासून काचेच्या इमारतींपर्यंतचा धडा

नेपाळमधील आपत्ती आणि जगभरातील वाढत्या उष्णतेच्या घटना आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे सांगतात की, निसर्गाच्या संतुलनाशी खेळण्याची किंमत मानवाला चुकवावी लागत आहे. हिमनद्या वितळणे, समुद्राची पातळी वाढणे, अतिवृष्टी, फ्लॅश फ्लड, उष्णतेच्या लाटा, दुष्काळ आणि जंगलातील आगी यांसारख्या घटनांचा धोका वाढत असताना शहरांच्या विकासाची पद्धतही बदलण्याची वेळ आली आहे. नेपाळमधील अलीकडील दुर्घटनेत हवामान बदल हा एकमेव कारणीभूत घटक होता, असे म्हणणे अचूक ठरणार नाही; मात्र वाढत्या तापमानामुळे हिमालयीन हिमनद्या आणि पर्वतीय भूभाग अधिक अस्थिर होत असल्याचा इशारा तज्ज्ञ देत आहेत. त्यामुळे विकास थांबवणे हा उपाय नाही. विकासाची दिशा बदलणे हा उपाय आहे.

उंच इमारती उभ्या राहतील, काच वापरली जाईल, आधुनिक शहरेही तयार होतील. पण या विकासाची किंमत जर वाढते तापमान, वितळणाऱ्या हिमनद्या, वाढते पूर आणि अस्थिर पर्यावरण अशा स्वरूपात पुढच्या पिढ्यांना मोजावी लागणार असेल, तर त्या विकासाचा पुनर्विचार करावाच लागेल. काचेच्या इमारतींची चमक डोळ्यांना आकर्षक वाटते; पण भविष्यातील पृथ्वी किती उष्ण आणि असुरक्षित असेल, हा प्रश्न त्या काचेच्या पलीकडे पाहून विचारण्याची वेळ आता आली आहे.