मुंबई : बिस्किटे, चिप्स, नमकीन, नूडल्स, चॉकलेट, शॅम्पू, डिटर्जंट पावडर, डिटर्जंट बार, साबण, टूथपेस्ट, चहा, कॉफी, मसाले, सॉस/केचप, खाद्यतेल अशा दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या वस्तू आता आधीच्या किमतीवरच मिळणार आहेत फक्त त्यांचे प्रमाण कमी ठेवलं जाणार आहे. 

महागाईच्या काळात या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना कच्च्या मालाच्या आणि वाहतुकीच्या वाढत्या किमतींमुळे त्या वस्तूंचे दर वाढवावे लागतात. मात्र आता या वाढीव किमतीचा भार थेट ग्राहकांवर न टाकता त्यांच्या गरजेच्या आणि आवडीच्या वस्तूंच्या पाकिटातील प्रमाणच कमी करून जुन्याच किमतीवर ग्राहकांना या वस्तू विकण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे.

एफएमसीजी कंपन्यांकडून उत्पादनांच्या पॅकचा आकार आणि वजन कमी करण्याची रणनीती अवलंबली जात आहे. विशेषतः पाच ते पंचवीस रुपयांच्या किमतीच्या उत्पादनांमध्ये ही कपात अधिक होण्याची शक्यता आहे. सणासुदीचा हंगाम जवळ येत असताना कंपन्यांकडून किरकोळ किमतीत मोठी वाढ टाळून नफ्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी हा मार्ग स्वीकारला जात आहे.

पाच ते पंचवीस रुपयांची उत्पादने ही ग्राहकांच्या रोजच्या वापरातील असल्याने या श्रेणीतील उत्पादनांच्या एमआरपीमध्ये थेट वाढ केल्यास मागणीवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे या उत्पादनांच्या पॅकमधील वजन कमी करण्याला कंपन्यांकडून प्राधान्य दिले जात आहे. मात्र, त्यापेक्षा जास्त किमतीच्या उत्पादनांमध्ये थेट किंमतवाढ करण्यास कंपन्यांना तुलनेने अधिक वाव आहे. ऑल इंडिया कन्झ्युमर प्रॉडक्ट्स डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, पाच ते पंचवीस रुपयांच्या उत्पादनांच्या किमती ग्राहकांना परवडणाऱ्या असणे आवश्यक आहे. यामुळे या श्रेणीत पॅकचे वजन कमी केले जाईल, तर त्यापेक्षा महाग उत्पादनांच्या किमती वाढवल्या जाऊ शकतात.

पॅकच्या आकारातील किंवा वजनातील कपात सर्व उत्पादनांमध्ये सारखी नसेल. लहान पॅकमध्ये साधारण दोन ते पाच टक्क्यांपर्यंत वजन कमी केले जात आहे. त्याउलट, एक किलो किंवा त्याहून अधिक वजनाच्या मोठ्या पॅकमध्ये तुलनेने अधिक कपात केली जाईल किंवा त्यांच्या किमती काही प्रमाणात वाढवल्या जातील असे वितरकांचे म्हणणे आहे. मोठ्या पॅकमध्ये वजन कमी करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या खरेदीच्या सवयींमध्येही बदल होत आहे. पूर्वी मोठ्या पॅकला तसेच ‘अधिक खरेदी करा, अधिक मिळवा’ अशा योजनांना ग्राहकांकडून पसंती दिली जात होती. मात्र, आता घरखर्चाचे बजेट सांभाळताना ग्राहक गरजेनुसार लहान प्रमाणात खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे कंपन्यांसाठी पॅकचे वजन कमी करणे हा तुलनेने कमी परिणामकारक बदल ठरत असून, सणासुदीच्या काळात दुकानांमधील उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ टाळण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे.

रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये अन्न आणि किराणा मालाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ झाली. त्याच काळात एकूण किरकोळ विक्री आठ टक्क्यांनी वाढली. मात्र, उत्पादनांच्या कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे कंपन्यांना महागाईचा संपूर्ण भार स्वतः उचलणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन यांच्या मते, ग्राहकांचा विश्वास आणि मागणी टिकवण्यासाठी कंपन्यांनी यापूर्वी वाढलेल्या खर्चाचा मोठा हिस्सा स्वतः सोसला होता. मात्र, ही पद्धत दीर्घकाळ कायम ठेवणे आता कठीण होऊ शकते.

काही कंपन्यांनी उत्पादनांच्या किमती वाढवण्यास सुरुवात केली असून, काही कंपन्या सणासुदीच्या काळातील मागणीवर परिणाम होऊ नये म्हणून किंमती स्थिर ठेवत आहेत. त्यामुळे आगामी काळात किमतीत थेट वाढ करण्याबरोबरच पॅकचा आकार कमी करणे आणि विविध पॅकच्या किंमत-वजन रचनेत बदल करणे, अशा विविध मार्गांचा कंपन्यांकडून वापर केला जाण्याची शक्यता आहे.