महानदी खोऱ्यात दीड हजार मीटर खोलीवर वायूचा प्रवाह; व्यावसायिक क्षमतेचे पुढील परीक्षण होणार
भुवनेश्वर : सरकारी मालकीच्या तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाने (ओएनजीसी) भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ खोल समुद्रात नैसर्गिक वायूचा शोध लावला आहे. ओडिशातील कोणार्कपासून सुमारे ४३ किलोमीटर अंतरावर महानदी ऑफशोअर खोऱ्यात हा शोध लागला असून, पुढील परीक्षणातून या साठ्याची व्यावसायिक क्षमता सिद्ध झाल्यास विकासाच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो.
पीटीआयच्या वृत्तानुसार, १८ सप्टेंबर रोजी एमएन-डीडब्ल्यू१८-१-एच-डी या विहिरीत हा वायू आढळला.
ओएनजीसीच्या ‘समुद्र मंथन’ या खोल समुद्रातील शोधमोहीमेअंतर्गत ही विहीर खोदण्यात
आली. महानदी खोऱ्यात या मोहिमेअंतर्गत खोदण्यात आलेली ही पहिली विहीर आहे. या
विहिरीत १,४४१
ते १,४५२ मीटर खोलीदरम्यान हा वायू आढळला.
विहीर १,६२३ मीटर खोलीपर्यंत खोदण्यात आली होती.
या विहिरीचे खोदकाम २५
जुलै रोजी ‘प्लॅटिनम एक्सप्लोरर’ या ड्रिलशिपच्या साहाय्याने सुरू करण्यात आले
होते. गेल्या तीन दिवसांपासून या विहिरीतून वायूचा
प्रवाह सुरू असल्याचे ओएनजीसीने म्हटले आहे. मात्र, या शोधाला अद्याप व्यावसायिक साठा म्हणून घोषित करण्यात
आलेले नाही. साठ्याचा विस्तार, उपलब्ध संसाधने आणि प्रत्यक्षात किती वायू काढता
येऊ शकतो,
याचे पुढील परीक्षण केल्यानंतरच या शोधाची व्यावसायिक
व्यवहार्यता स्पष्ट होणार आहे.
ओडिशाच्या
किनाऱ्यापासून अवघ्या ४३ किलोमीटर अंतरावर हा शोध लागल्याने वायूचा
साठा व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य ठरल्यास त्याचे उत्पादन आणि बाजारपेठेत वितरण
तुलनेने सुलभ होण्याची शक्यता आहे. या भागातील इतर वायू शोधांसोबत
सामायिक पायाभूत सुविधा आणि साधनांचा वापर करून या साठ्याचा विकास करण्याचाही
ओएनजीसीचा विचार आहे. प्रत्येक शोधासाठी स्वतंत्र पायाभूत सुविधा उभारण्याची गरज
कमी झाल्यास विकासाचा खर्चही कमी होऊ शकतो.
२०२५च्या पेट्रोलियम
आणि नैसर्गिक वायू नियमांनुसार या भागातील खोल समुद्रातील संसाधने सामायिक पायाभूत
सुविधांच्या माध्यमातून उत्पादनात आणण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे महानदी
खोऱ्यातील या शोधासह परिसरातील अन्य शोधांचा एकत्रित विकास करण्याचा मार्ग मोकळा
होऊ शकतो.
नैसर्गिक वायू म्हणजे काय?
नैसर्गिक वायू हे भूगर्भात आढळणारे जीवाश्म इंधन आहे. त्यातील प्रमुख घटक मिथेन (CH₄) असून त्याबरोबर इथेन, प्रोपेन, ब्युटेन आदी घटक अल्प प्रमाणात असू शकतात.
नैसर्गिक वायू तयार कसा होतो?
लाखो वर्षांपूर्वीचे वनस्पती व सूक्ष्मजीवांचे अवशेष गाळाखाली दडले. प्रचंड दाब आणि तापमानामुळे त्यांच्यात रासायनिक बदल होऊन कालांतराने नैसर्गिक वायू तयार झाला.
नैसर्गिक वायूचा उपयोग
- स्वयंपाकासाठी पीएनजी
- वाहनांसाठी सीएनजी
- वीजनिर्मितीसाठी
- खत उद्योगासाठी
- औद्योगिक वापरासाठी

0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.