मला गणेशोत्सवावर लेख लिहिताना त्रास होतोय. विकिपीडिया वर गणपति विसर्जनाविषयीचा एक रेफ्रन्स मिळाला आहे. 

ते मी या पूर्वीही कुठे तरी वाचलं होतं पण आता त्याची दाहकता का कुणास ठाऊक मला जास्त जाणवतेय. कदाचित मी या पूर्वी ती माहिती महानायक मध्ये लेख एडिट करताना वाचली होती. पण तिथलं वातावरण तसंही गणेशोत्सव विरोधी होतं. त्यामुळे तो लेख त्या प्रवाहातला होता. आणि माझं काम फक्त एडिट करणं असल्यामुळे एक पुसटशी माहिती मिळवून आपलं काम करणं एवढाच माझा आणि त्या लेखाचा संबंध होता. खरं तर महानायक आणि आपलं महानगर हे खूप वैचारिक खाद्य आणि कामाचं समाधान देणारी माध्यमं होती. नंतर तसा अनुभव कशातूनही मिळाला नाही. असो. पण आज ब्लूपॅडसाठी गणेशोत्सवावर लेख लिहिताना पूर्वी कधीतरी वाचलेली  माहिती विकिपीडिया वर वाचली आणि माझ्या अंतरंगात कुठे तरी खळबळ माजली... ती माहिती अशी.  

ब्रिटीश राजवटीत लोकांनी एकत्र जमून काही देशद्रोही कारवाया करू नयेत म्हणून ब्रिटीशांनी लोकांनी कोणत्याही कारणासाठी एकत्र न जमण्याचा नियम केला होता. त्याला मुस्लिम समाजाकडून विरोध झाला कारण या नियमामुळे शुक्रवारच्या सामुदायिक नमाजावर गदा येणार होती. त्यामुळे या नियमातून मुसलमानांच्या शुक्रवारच्या नमाजाला सूट मिळाली. हिंदूंनी एकत्र येऊन अशी प्रार्थना करण्याचा कोणताच प्रघात नव्हता. त्यामुळे हिंदूंचा एकमेकांशी असलेला संपर्क कमी झाला होता. त्यामुळे ब्रिटीशांच्या विरुद्ध काही योजना सुद्धा आखता येत नव्हत्या. त्यावेळी लोकमान्य टिळकांच्या मनात आलं की आपले असे सण असावेत ज्यात संपूर्ण हिंदू समाज एकत्र येईल. त्यावेळी गणेशोत्सव केवळ घरगुती पद्धतीने साजरा केला जात होता आणि पेशवे गणपतिचं पूजन करीत असत. लोकमान्यांनी हाच सण सार्वजनिक रित्या साजरा करण्यासाठी निवडला. ब्रिटीशांनी त्याला आधी मान्यता दिली नाही पण मुस्लिमांच्या नमाजासाठी तुमच्या नियमात शिथिलता आणता मग हिंदूंसाठी का नाही असा युक्तिवाद टिळकांनी केला. याला ब्रिटीशांकडे उत्तर होतं ते म्हणजे हिंदू एकसंघ नाहीत, ते जातीपातीत विभागलेले आहेत. टिळकांनी हे अमान्य केलं सरते शेवटी ब्रिटीशांना या उत्सवाला मान्यता द्यावी लागली.

पुण्यात गणेशोत्सव पहिल्यांदा १८९३ मध्ये सार्वजनिक रित्या साजरा झाला. पहिल्यांदा पेशव्यांचा गणपति सार्वजनिक मंडपात आणला गेला. ह्या उत्सवात सर्व जातीतील लोकांनी सहभाग घ्यावा असं आवाहन टिळकांनी केलं. त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक अस्पृश्य समाजाचे लोक आपल्या आराध्य दैवताच्या उत्सवात सामील झाले. कदाचित ब्रिटीशांना हिंदू धर्मातील एकोपा दाखवण्यासाठी असेल पण टिळकांनी सर्व अस्पृश्यांना गणपतीच्या मूर्तीला पदस्पर्श करून दर्शन घेण्यास सांगितलं. उत्सवाच्या अखेरीस पेशव्यांचा गणपति पुन्हा त्याच्या मूळस्थानी विराजमान करण्यास घेऊन जाऊ लागताच कर्मठ ब्राम्हण त्याला विरोध करू लागले. त्या मूर्तीला अस्पृश्यांचा स्पर्श झाला आहे, त्यामुळे ती अपवित्र झाली आहे, अशा अवस्थेत तिची पुनर्स्थापना न करता तिचे विसर्जन करावे असा मार्ग त्या कर्मठांनी काढला. त्यांचा रोष ओढवून घ्यायला नको म्हणून टिळकांनी त्याला मान्यता दिली. आणि अशा प्रकारे “विसर्जना”चा गणेशोत्सवात शिरकाव झाला. ही माहिती मला https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5 ह्या साइट वर मिळाली.  

ह्या माहितीची सत्यता मला अजून पारखता आलेली नाही. मी काही लोकांना ह्या विषयी विचारणार आहे. पण ही माहिती खरी आहे असं मानून मी पुढील काही मुद्दे ठेवत आहे.

एक नवरात्रातील देवी सोडल्यास अन्य कोणत्याही देवतेचं विसर्जन होत नाही. फक्त गणपतीचं विसर्जन का केलं जातं? असा लहान असल्यापासून आपल्याला प्रश्न पडत आला आहे पण त्याचं उत्तर देण्यासाठी अनेक पौराणिक कथा ऐकवल्या गेल्या. गणपति मामाच्या गावाला जातो वगैरे.

एका विशिष्ट कारणासाठी सुरू झालेला हा उत्सव स्वातंत्र्यानंतर ही सुरूच राहिला, काहीच हरकत नाही. रूढी आणि परंपरा अशाच काही ना काही कारणासाठी सुरू झाल्या आणि त्या तशाच राहिल्या. त्यांच्यात काडीमात्र बदल झाला तर त्या त्या ईश्वराचा कोप होईल या भीतीने त्या तशाच राहिल्या. पण प्रश्न उरतो तो गणपतीच्या विसर्जनाचा. अस्पृश्यांच्या स्पर्शाने अपवित्र झाली म्हणून पहिल्या गणपतीचं विसर्जन झालं. खरं तर तीच वेळ होती जेंव्हा टिळक आपल्या मधुर वाणीने सर्व मानव एक आहेत आणि ईश्वरासमोर कोणी उच्च नीच नाही, हे त्या तमाम धर्म मार्तंडांना आणि समाजातील सर्वच लोकांना समजावू शकले असते. पण त्यांनी ते टाळलं. आज अस्पृश्यता किमान कायद्यानुसार तरी हद्दपार झालेली असताना गणपति विसर्जनाची पद्धत बंद व्हायला हवी होती. पण ती तशीच का ठेवली गेली आहे. कारण ह्या विसर्जन उत्सवात सर्व जाती धर्माचे लोक आता खुलेपणाने सामील होतात म्हणून?

आपण जर नीट पहिलं तर कोणत्याही देवळाच्या गाभार्‍यात कोणालाही प्रवेश नसतो. याला कारण सुरक्षितता हे असतेच. पण त्या देवतांचे कधीही विसर्जन होत नाही. स्नान होते. पण मूर्ति हलवली देखील जात नाही. पण गणांचा अधिनायक म्हटल्या गेलेल्या गणपतीच्या बाबतीत असं का? ही एका अंगाने अस्पृश्यता कायम ठेवण्याचा तर डाव नाही ना?

विसर्जनाची ही पार्श्वभूमी जर खरी असेल तर ह्या सर्व बाजू कोर्टासमोर मांडून विसर्जन सोहळा गणेशोत्सवातून रद्द करण्याचे अपील आजवर का केले गेले नाही? कृपया ह्या सर्व बाबीवर प्रकाश टाकावा.   

मला हे देखील जाणून घ्यायचे आहे की बाबासाहेबांनी सर्व प्रथा परंपरा जशा आहेत त्या स्थितीत सुरू ठेवाव्यात असं सांगितलं असल्याचं बाबरी मशिदीच्या बाबतीत न्यूज चॅनेल वर पॅनल चर्चांमध्ये बोलताना मुस्लिम नेते सांगतात. बाबासाहेबांनी असं कुठे म्हटलं आहे हे माला जाणून घ्यायचं आहे आणि जर ते तसे बोलले असतील तर तर विसर्जनाला विरोध करता येणारच नाही. पण यापुढे मी वैयक्तिक रित्या मित्र मैत्रिणींच्या घरच्या गणपतीच्या विसर्जन सोहळ्याला जाणार नाही. एवढं मी माझ्या पुरतं करू शकते.

-    विनिशा धामणकर