भारतातील लोक देशाबाहेर जिथे कुठे जातात ते आपली जात आणि तिचा अभिमान सोबत घेऊनच जातात. आणि ते तिथेही तो जातिभेद करतात हे याआधीही काही घटनांनी दाखवून दिलं आहे. 

कॅलिफोर्नियाच्या सिस्को कंपनीत असा जातिभेद समोर आल्यावर तिथल्या प्रशासनाने असा जातिभेद हा भेदभावविरोधी नियमाच्या चौकटीत आणला. ही गोष्ट आपल्या देशातील लोकांना धडा शिकवणारी आहे. इथले स्वत:ला तथाकथित अभिजन आणि उच्चवर्णीय समजणारे लोक कृष्णवर्णीयांवर होत असलेल्या अत्याचाराने हळहळतात पण त्यांना ते स्वत:च्या देशात, स्वत:च्या प्रांतात काय करतात याची जाणीव कशी काय होत नाही? इथल्या बायका “आमच्यात असं असतं आणि तसं नसतं,” हे सहज गप्पांच्या ओघात कशा काय बोलून जातात? लग्नं करताना स्वजातीय आणि स्वधर्मीय वधू वर असावेत अशी मागणी कशी काय करू शकतात? आणि खेडोपाड्यात “दलितांच्या घरचं पाणी प्यालो तर आम्हाला बाट लागेल,” अशी मानसिकता अजूनही कशी काय टिकून आहे? का अजूनही रोटी बेटी व्यवहार खुलेपणाने होत नाहीत? ह्या लॉकडाउनमध्ये सुद्धा दलितांवर अत्याचार का सुरू आहेत? आता ह्या जातीय वर्चस्वामुळे जगभरात नाचक्की होऊ लागल्यावर तरी ह्या गोष्टी संपुष्टात येतील अशी अशा करावी काय?

नामदेव ढसाळ, ज. वि. पवार, राजा ढाले, अविनाश महतेकर, उमाकांत रणधीर, दयानन्द म्हस्के, गंगाधर गडे, अरुण कांबळे, के. बी. गमरे आणि अगणित पॅंथर्सनी चालवलेली दलित पॅंथरची चळवळ केवळ अभ्यासापूर्ती आहे काय? आणि तो अभ्याससुद्धा केवळ दलितांच्या विषयी आणि त्यांच्या चळवळींविषयी आत्मीयता असणार्‍यांनीच करायचा काय? दोन वर्षापूर्वी ब्लॅक पॅंथरच्या नेत्या एंजेला डेविस मुंबईत आल्या असताना आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज. वि. पवार म्हणाले होते की, “मॅडम, ब्लॅक पॅंथरचा लढा हा त्वचेच्या रंगावरून हीन वागणूक दिल्या जाणार्‍या लोकांचा लढा होता. किमान तुमचा रंग दिसतो. पण इथे असा कोणताच भेद वरकरणी दिसत नसताना केवळ जात कळली की तो भेद उफाळून येतो.” पाश्चात्य देशात रंगभेद असला तरी शिवाशिव हा प्रकार नव्हता आणि नाही. म्हणून तो लढा कमी ठरवण्याचा हेतु नाही. कुठलाही भेद जीवघेणाच असतो. पण इथे नुसती जात कळली आणि समोरचा व्यक्ती दलित आहे कळलं की त्याच्या सर्व विद्वत्तेला कवडीमोल ठरवून केवळ त्याच्या जातीच्या आधारावर त्याची सावली सुद्धा वर्ज्य केली जात होती आणि अजूनही तोच प्रकार होत आहे. बाबासाहेबांसारख्या जगद्विख्यात विद्वानाला जगात कुठेही न मिळालेली हीन वागणूक त्यांच्या स्वत: देशात, स्वत:च्या प्रांतात मिळाली, हे दु:खदायक नाही काय? आजही स्वत:च्या शिक्षणाच्या जोरावर परदेशात गेलेल्या दलित स्त्री पुरूषांना तिथल्या उच्चवर्णीय भारतीयांकडून तीच हीन वागणूक मिळणं हे तिटकारा आणणारं नाही काय? कोणत्या लोकशाही, एकता, बंधुत्व जपणार्‍या समाजवादी आणि उच्च संस्कृतिक वारसा लाभलेल्या भारताचं प्रतिनिधित्व ते करतात?

फुले – आंबेडकरी साहित्य हे केवळ फुले आंबेडकरांना मानणार्‍या लोकांनीच वाचण्यासाठी आहे काय? का अजूनही अनेकांना “जातीयतेचे निर्मूलन” हा ग्रंथ माहीत सुद्धा नाही? का अजूनही बहुतांशी लोक बाबासाहेबांना आणि इथल्या जाती विरोधी आंदोलनं आणि चळवळींना जाणून घेण्याच्या फंदात सुद्धा पडत नाहीत? का आंबेडकरी वर्तमान पत्रे अजूनही त्याच हातात दिसतात ज्यांना आधीच बाबासाहेब, फुले, शाहू महाराज, भगवान बुद्ध हे माहीत आहेत? का अजूनही माझ्यासारख्या अनेक जातीच्या लोकांसोबत काम करणार्‍या व्यक्तीस काही अतर्क्य गोष्टी ऐकाव्या लागतात? का आम्हाला प्रत्येक वेळी त्यांना उत्तरं द्यावी लागतात? का आम्हाला कुचेष्टा किंवा जास्तीत जास्त सहानुभूती शिवाय काहीच मिळत नाही? का आमची गाडी आरक्षणावर येऊन थांबते? आरक्षण संपलं तरी जातीयता संपेल का हा साधा विचार त्यांना का शिवत नाही? का आम्ही प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करत बसायचं, तपशील देत बसायचं, सरकारी आकडेवारी सांगत बसायचं? का अभिजन आणि उच्चवर्णीय म्हणवणार्‍यांना स्वत:लाच आपलं कुठे चुकलं आणि काय असायला पाहिजे यावर अंतर्मुख होऊन विचार करण्याची चर्चा गरज वाटत नाही? ज्यांना याची जाणीव आहे अशा अनेक आदरणीय व्यक्ती आहेत पण त्यांनी याविषयीचं आपआपल्या समाजाचं किती प्रबोधन केलं? कुठे चूक झाली? कुठे कमी पडलो? कुठे चळवळ कमी पडली? आणखी किती पिढ्यांनी हे सर्व प्रश्न विचारायला हवेत?
  
संदर्भ : लोकसत्तेतील ४ जुलै २०२० रोजीचा अग्रलेख आणि ३ जुलै २०२० रोजीचे इंडियन एक्सप्रेस मधील संपादकीय