त्या सर्व स्त्रियांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आणि पुरुषांनी ग्रासलेल्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यांच्या सारख्या अनेक स्त्रियांच्या त्या त्या क्षेत्रातील प्रवेशाचा आणि त्यांच्या यशाचा मार्ग प्रशस्त केला. संपूर्ण जगात स्त्रीविश्व असं नेहमी विस्तारत जात असताना आजही अशी अनेक क्षेत्र किंबहुना काही देशातील अशी क्षेत्र जिथे स्त्रियांना त्या मानाने कमी स्वातंत्र्य होतं त्या क्षेत्रातून एखाद्या स्त्रीच्या यशाच्या बातम्या येतात तेंव्हा त्याला एक वैश्विक महत्त्व अपोआप प्राप्त होत असतं. अशाच ह्या दोघी जणी. शीर्षकात म्हटल्याप्रमाणे दोघी जणींपैकी एक आहे मैदान गाजवणारी आणि दुसरी आकाश छेडू पाहणारी.
मैदान गाजवणारी म्हटलं की आपल्या समोर क्रिकेट ह्या आद्यखेळातील कोणी तरी एखादी ऑल राउंडर क्रिकेटर किंवा हॉकी खेळाडू किंवा गेला बाजार कोणी तरी धावपटू विषयी इथे मी बोलत आहे असं वाटेल. खेळ हा एक धागा इथे बरोबर आहे. पण ज्या खेळाविषयी मी बोलणार आहे तो खेळ भारतात पुरुष सुद्धा खेळ म्हणून कमी आणि जुगार म्हणून जास्त खेळत असल्यामुळे स्त्रियांनी मारलेल्या मैदानाचं कौतुक होईल अशी अपेक्षा मला तरी नाही. पण पुरुषांच्या या क्षेत्रात स्त्रीने मुसंडी मारणं हा वैश्विक पराक्रम भारतातील पुरुषांसाठी सुद्धा मार्गदर्शक ठरेल अशी आशा मात्र आहे. तर हा खेळ आहे घोडा शर्यतीचा. अगदी बरोबर आपल्याकडे याला फक्त “रेस” या नकारात्मक नावाने ओळखतात. खरं तर सामान्यांना माहित नसलेल्या या खेळाला बॉलीवूडने एक घोड्यांच्या रेस वर पैसे लावण्याचं व्यसन ह्याच अंगाने समोर आणल्यामुळे खेळाडूच्या कौशल्याची परीक्षा पाहणाऱ्या या खेळत आणि खेळाच्या निमित्ताने चांगल्या दर्जाचे घोडे निर्माण करण्याच्या कामात खोडा घातला. भारतात या खेळाला मान सन्मान नसला तरी इंग्लंडमध्ये आहे. सायबाचाच खेळ तो. पण ज्या देशावर राणीचं राज्य आहे त्या देशात सुद्धा स्त्रिया अजूनही काही क्षेत्रात पहिल्यांदा पुढे येत आहेत याचं दु:ख मानायचं आनंद या वादात न पडता आपण त्यांच्या यशाचा आणि स्त्रियांसाठी आणखी दरवाजे उघडत असल्याचा आनंदच मानला पाहिजे. कारण या खेळाच्या स्पर्धेत रॅचेल ब्लॅकमोर ह्या अवघ्या ३२ वर्षांच्या युवतीने आपल्या मिनेला टाईम्स या ८ वर्षांच्या घोड्याच्या सोबतीने पहिला क्रमांक पटकावला आणि ती ही स्पर्धा जिंकणारी पहिली महिला जॉकी ठरली आहे.
राणी एलिझाबेथ यांचे ९९ वर्षांचे पती राजपुत्र फिलीप, ड्युक ऑफ एडिनबर्ग यांचे ९ एप्रिल २०२१ रोजी निधन झाले. पण १० एप्रिल २०२१ ला लंडन मधल्या लिवरपूल या शहराती ऐनट्री इथल्या रेस कोर्स वर होणारी ग्रँड रेस ही आधीच ठरली होती. त्यामुळे राजपुत्राना श्रद्धांजली वाहून ग्रँड नॅशनल हंट रेसची सुरुवात झाली. कोविड मुळे प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत ही स्पर्धा झाली. तब्बल ६.९०७ किमी एवढ्या जागेत पसरलेल्या ह्या मैदानात ही स्पर्धा झाली ज्यात तब्बल ३० अडथळे पार करत आणि ४० स्त्री पुरुष सह स्पर्धकांना मागे टाकत ही स्पर्धा रॅचेल आणि तिचा घोडा मिनेला टाईम्स याने जिंकली. मागच्या एका वर्षात झालेल्या चेल्टनहेम फेस्टिवलमध्ये तिने सहा स्पर्धा जिंकल्या होत्या आणि १० एप्रिलला तिने या प्रांतात इतिहास घडवला.
रॅचेल ब्लॅकमोर ही एका डेरी फार्म वाल्याची मुलगी. स्वत: शिक्षिका. घोडे, गाई आणि बकऱ्या यांच्या सोबतच तिचं बालपण गेलं. तिने एन्क़्विन सायन्स म्हणजेच घोड्यांची देखभाल आणि शुश्रुषा या विषयात पदवी संपादन केली आहे. घोडेस्वारीचा छंद असाच कधीतरी जडला आणि लहानपणापासूनच तिने गोदेस्वरीची सुरुवात केली आणि विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला. आज ती जगातील सर्वच स्त्रियांसाठी आदर्श बनून उभी आहे.
मैदान मारणाऱ्या स्त्रिया आकाशाला ही गवसणी घालतात. आपल्याकडे आपण नेहमीच कल्पना चावला या अंतरीक्ष यात्रीचं नाव घेत असतो. पण जिथे स्त्रियांना सर्वच बाबतीत मज्जाव केला जातो अशा अरब देशात जर तुम्हाला अशीच एखादी स्त्री तयार होताना दिसली तर? नक्कीच ही अभिमानाची बाब आहे. युनायटेड अरब अमिरात यांनी नासाच्या अवकाश कार्यक्रमासाठी आपल्याकडून नोरा अल मातृशी या २७ वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर तरुणीची निवड केली आहे. अबू धाबीच्या नॅशनल पेट्रोलियम कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करणारी नोरा ही अवकाश कार्यक्रमात भाग घेण्यास जाणारी पहिली अरब महिला ठरली आहे.
इतर देशांप्रमाणे युनायटेड अरब अमिरात या देशाला सुद्धा अनेक अवकाश कार्यक्रम करायचे आहेत. त्यांनी या आधी त्यांच्या इंटर प्लॅनेटरी एक्सपेडिशनच्या अंतर्गत मंगळाच्या कक्षेपर्यंत आपले यान नेले आहे. त्यांना आपले अवकाश कार्यक्रम वाढवायचे आहेत त्यासाठी ते एकूण चार जणांची टीम नासाला पाठवणार आहेत त्यात नोरा एक आहे. शिवाय यात २०१९ ची अवकाश यात्रा करणारा पहिला अमिराती हझा अल मन्सुरी सुद्धा आहे. एकूण ४३०० लोकांमधून नोराची निवड शिक्षण, अनुभव, शारीरिक आणि मानसिक क्षमता यावर झाली आहे. नोरा २०११ मध्ये झालेल्या इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडमध्ये पहिली आली होती. २०१३ मध्ये दक्षिण कोरिया तील युथ अँबेसेडर प्रोग्रॅमसाठी तिची निवड झाली होती. २०१८ आणि २०१९ मध्ये युएन इंटरनॅशनल युथ कॉन्फरन्स मध्ये तिने युएईचं प्रतिनिधित्व केलं होतं. तिच्या ह्याच सर्व कारकीर्दीमुळे तिला नासामध्ये जाण्याची संधी मिळाली आहे.
मुलींमध्ये, स्त्रियांमध्ये इतक्या गुणवत्ता असताना सुद्धा त्यांना संधी फारच कमी मिळतात. यासाठी नोरा प्रमाणे मुलींना अधिकाधिक प्रोत्साहन देऊन त्यांना तितकं सक्षम करणं सुद्धा आवश्यक आहे. तेंव्हाच संपूर्ण जगात असं एकाही क्षेत्र उरणार नाही जिथे मुली नाहीत.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.