नासाच्या शिरपेचात आणखी एक मोरपीस
नासाकडून मंगळाच्या पृष्ठभागाचा आणि तिथे जीवसृष्टी आहे का याचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आलेल्या प्रीजर्वरंस ह्या फेब्रुवारी २०२१ मध्ये मंगळावर उतरलेल्या यानाने आणखी एक मोरपीस नासाच्या शिरपेचात खोवला आहे. प्रीजर्वरंस सोबत गेलेल्या इन्जेन्युइटी ह्या हेलिकॉप्टरचं मंगळाच्या पृष्ठभागावरच्या मार्टीयन या एअरफिल्डवर काल १९ एप्रिल २०२१ रोजी यशस्वी उड्डाण झालं. हे उड्डाण दक्षिण कॅलिफोर्निया इथल्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी मध्ये बसलेले नासाचे सदस्य कंट्रोल करीत होते. ज्यावेळी सौर उर्जेवर चालणाऱ्या इन्जेन्युइटी या हेलिकॉप्टरने मंगळाच्या पृष्ठभागावरून उड्डाण घेतलं तेंव्हा या सदस्यांनी टाळ्यांचा कडकडाट करीत आनंद साजरा केला. साधारण १० फूट म्हणजेच ३ मीटर उंच हवेत हे हेलिकॉप्टर ३० सेकंद गिरक्या घेत राहीलं आणि मग त्याने पुन्हा पृष्ठभागावर उतरलं.
मंगळावरचं तापमान हे ऋण ९० अंश असतं त्यात त्यावरचं वातावरण हे अगदीच हलकं असतं, गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा फार कमी. म्हणजे माणूस तिथे गेला तर त्याला हवेत उडाल्याप्रमाणेच चालावं लागेल. अशा वेळी प्रीजर्वरंसची जडणघडण त्या वातावरणात साजेही करून त्याच्या गर्भात इन्जेन्युइटी ह्या हेलिकॉप्टरचं गर्भारोपण करून त्याला मंगळावर पाठवलं गेलं. आज हे बाळ पोटातून बाहेर आलं आणि अवकाश यात्रेच्या इतिहासात एक हसू उमटलं.
Courtesy : https://mars.nasa.gov/technology/helicopter/ |
प्रीजर्वरंस म्हणजे चिकाटी आणि इन्जेन्युइटी म्हणजे चातुर्य किंवा कल्पकता अशी चपखल नावं असणाऱ्या या जोडीने एका मागच्या इतिहासाची सुद्धा पुनरावृत्ती केली. तब्बल ११७ वर्षांपूर्वी राईट बंधूनी असंच एक विमान उडवलं होतं. त्यावेळी त्यांना कल्पनाही नसेल की त्यांची विमान बनवण्याची चिकाटी आणि विज्ञानातील चातुर्य भविष्यात लोकांची निकड बनेल. त्यांच्या मनात ते विमान उडवताना ज्या भावना आल्या असतील त्याच भावना आज नासाच्या सदस्यांच्या मनात उचंबळून आल्या होत्या अशा शब्दात नासाचे असोसिएट ऍडमिनिस्ट्रेटर फॉर सायन्स थॉमस झुर्बूचेन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
“हे दोन अवकाश विज्ञानात घडलेले आदर्शवत असे क्षण आहेत. फक्त काळ वेगळा आहे आणि जागा एकमेकींपासून १७३ लक्ष मैल दूर आहेत. मात्र या दोन्ही घटनात काडीमात्र फरक नाही,” असंही ते म्हणाले.
इन्जेन्युइटीचं हे यशस्वी उड्डाण भविष्यातील अनेक मोहिमांची नांदी ठरू शकेल. असे हेलिकॉप्टर हे यान पोहोचू शकणार अशा ठिकाणी जाऊन तिथे काही फोटो घेऊन ते केंद्राकडे पाठवू शकतील किंवा भविष्यात रोबोटिक हेलिकॉप्टर किंवा मानव सहित हेलिकॉप्टर पाठवून तिथे अभ्यास करता येईल. असे अनेक उपक्रम राबवता येतील. म्हणजेच यापुढे शक्यतांची मांदियाळीच असेल. शेवटी स्काय इज द लिमिट.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.