देशात कोविड 19 रुग्णांच्या मृत्युला प्रामुख्याने जबाबदार असणाऱ्या ऑक्सिजन तुटवड्याला थोडासा विराम मिळून अधिकाधिक रुग्णांचे प्राण वाचण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

डीआरडीओ अर्थात डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांच्या 2DG ह्या औषधास डीसीजीआयने मान्यता दिली आहे. डीआरडीओच्या न्यूक्लिअर मेडिसिन अँड अलायड सायन्सेस (आयएनएमएस) ह्या प्रयोगशाळेत हे औषध हैदराबादच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीच्या सहाय्याने तयार केलं आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचं संकट ओढवल्यापासूनच ह्या नव्या विषाणूशी लढा कसा द्यायचा याविषयी विचार मंथन सुरु झालं होतं. त्याच वेळी डीआरडीओच्या आयएनएमएस आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीनी यावर संशोधन करून एक औषध निर्माण करण्याची सुरुवात केली होती. तब्बल एक वर्षानंतर आणि क्लिनिकल ट्रायलच्या तीन यशस्वी फेऱ्या झाल्यानंतर आता हे औषध मध्यम आणि गंभीर स्वरूपाच्या रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी डीसीजीआय म्हणजेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने ह्या औषधाला हिरवा कंदील दाखवला आहे.

कोविड 19ची लागण रुग्णाच्या फुफ्फुसामध्ये होत असल्याने रुग्णास श्वास घेण्यास त्रास होतो आणि त्याचं सामान्य ऑक्सिजन घेण्याचं प्रमाण घटत जातं. अशा वेळी त्याला बाहेरून ऑक्सिजन देण्याची नितांत गरज असते अन्यथा असा रुग्ण ऑक्सिजनच्या अभावी दगावू शकतो. अशा मध्यम (moderate) आणि गंभीर (serious) रुग्णांना डीआरडीओचे 2DG म्हणजेच 2-डीऑक्सी – D – ग्लुकोज – G हे औषध दिल्यास त्यांना ऑक्सिजन देण्याची गरज कमी होते. हे औषध विषाणूने बाधित झालेल्या पेशींवरच जमा होतं आणि विषाणूचे संश्लेषण थांबवून त्यांच्या वाढीला अटकाव करतं. विषाणूची वाढ थांबल्यामुळे रुग्ण हळू हळू आपला श्वास नियंत्रित आणि सामान्य पद्धतीने करू शकतो. त्यामुळे त्याला बाहेरून देण्यात येणाऱ्या ऑक्सिजन वर अवलंबून राहण्याची गरज रहात नाही.

ह्या औषधाच्या २२० लोकांवर केलेल्या तिसऱ्या फेरीच्या ट्रायलमध्ये ४२ टक्के रुग्णांचं ऑक्सिजन अवलंबित्व कमी झालं आणि ते ह्या तडाख्यातून वाचले. पावडर रुपात येणारे हे औषध रुग्णाला पाण्यात मिसळून दिल्याने रुग्णाला काही त्रासही होत नाही. ह्या औषधातील कंटेंट हे जेनेरिक मॉलिक्युल्स आणि ग्लुकोज ऍनालॉग असल्यामुळे ते सहज रित्या देशात अनेक ठिकाणी बनवता येऊ शकेल आणि त्याचा तुटवडा कधीही भासणार नाही अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

मे ते ऑक्टोबर २०२० मध्ये ह्या औषधाच्या दोन ट्रायल ११० रुग्णांवर झाल्या तर तिसरी ट्रायल डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ मध्ये २२० रुग्णांवर झाली. ह्या ट्रायल्समध्ये हे औषध कोरोना रुग्णांवर उपयुक्त ठरेल याची खात्री पटल्यावर डीसीजीआयने त्याला मान्यता दिली आहे आणि आता हे लवकरच रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या रुग्णांना मिळेल अशी आशा आहे.