गेलं दीड वर्ष आपण कोरोना नावाच्या राक्षसाशी झगडत आहोत. जिथे गेल्या वर्षी तीन ते चार हजार रुग्ण दिवसाला नोंदवले जात होते तिथे आता संपूर्ण देशातून तब्बल चार लाख रुग्णांची नोंद होत आहेत. ही स्थिती भयावह आहे. यापुढे स्थिती आणखी की बिकट होत जाणार आहे की काय ठाऊक नाही. पण अशा स्थितीत सुद्धा मृत व्यक्तीच्या टाळू वरचं लोणी खाणारे समोर येत आहेत. रेमडेसिवीर, ऑक्सिजन, लशी आणि इतर अत्यावश्यक वैद्यकीय सेवांचा जीवघेणा तुटवडा निर्माण झालेला असताना काही असामाजिक लोक अडलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आणखीनच नाडवून त्यांच्याकडून अव्वाच्यासव्वा पैसे उकळून त्यांना आवश्यक वैद्यकीय सेवा देत आहेत आणि काही तर एकदा का पैसे हातात आले की ते ही देत नाहीत. आज एक बातमी आली की मध्य प्रदेशातील करेली बस स्थानकानजीक एक ट्रक सात तासांपासून उभा होता. तिथल्या नागरिकांना शंका आली म्हणून त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली तेंव्हा त्यात तब्बल लाख ४० हजार कोवॅक्सीनच्या लशी सापडल्या. ह्या लशींची अंदाजे किंमत आठ कोटी रुपये आहेत. आता सांगा, जिथे ७० वर्षावरील काही लोक पहिली लस घेण्यासाठी तर काही दुसरी लस घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहतात पण लस संपल्यामुळे त्यांना माघारी फिरावं लागतं, अशा वेळी इतक्या लशी या ट्रकमध्ये कशा आल्या असतील? भ्रष्टाचाराशिवाय तर त्या आल्या नाहीत. ह्या सगळ्याचा निश्चितच काळा बाजार होत आहे. जे पकडले जातात ते तर मिडियामध्ये दिसतात पण जे पकडले जात नाहीत अशा लोकांची संख्या किती जास्त असेल?




अशा सर्व मनाला वेदना देणाऱ्या घटना घडत असतानाच काही संवेदशील माणसं खूप चांगलं काम करीत आहेत. आपण या आधीच्या लेखात तीन लोकांच्या कार्याची माहिती सांगितली आहे. https://www.itivrutta.com/2021/04/blog-post_23.html  ही त्याची लिंक आहे. पण यांच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक लोक संपूर्ण देशात काम करीत आहेत. काही लोक ऑक्सिजन पुरवत आहेत तर काही ट्रक ड्रायवर ते ऑक्सिजन विनामूल्य पोहोचवण्याचं काम करीत आहेत. काही रक्तदान आणि प्लाझ्मादान शिबिरं आयोजित करीत आहेत आणि लोकांना अशा प्रकारची मदत करण्यासाठी आव्हानं आणि प्रोत्साहित करीत आहेत. काही ऑक्सिजन बेड असलेले रुग्णालय उभारत आहेत. काही अन्नधान्य, तयार जेवण पुरवत आहेत. काही एका घरात सर्वच पॉजिटीव्ह निघाल्यावर त्यांना अन्नधान्य, फळं, भाज्या पुरवत आहेत.  असे अनेक लोक प्रत्येक राज्यात काम करीत आहेत. काहींच्या संस्था आहेत तर काही वैयक्तिक स्वरुपात काम करीत आहेत. गेल्या वर्षी मुंबईत ज्योती बडेकर या झुंझार कार्यकर्तीने तृतीय पंथीयांना अन्नधान्याचं वाटप केलं. पण शेवटी दानशूर व्यक्ती किती काळ मदत करत राहणार. ऑक्सिजन पुरवणारे सुद्धा किती काळ हे काम करत राहतील? आणि सर्वात महत्त्वाचं हे की हा काळ किती मोठा असेल हे आपल्याला कुठे माहितीये.

आपल्या देशातील लोक अनेक अटीतटीच्या वेळी एकत्र आले आहेत, मग ते भूकंप असो की चक्रीवादळ असो. त्या त्या प्रत्येक वेळी दानशूर व्यक्तींनी आर्थिक तर सेवाभावी व्यक्तींनी सेवेच्या माध्यमातून आपलं योगदान दिलं आहे. पण ती संकटं ही आली आणि गेली होती. आपलं काम फक्त झालेलं नुकसान भरून काढणं आणि बाधित लोकांना सावरणं एवढंच होतं. पण आजचं हे संकट जातंय असं वाटत असताना पुन्हा डोकं वर काढतंय. आणि आपल्या सोबत अनेकांना घेऊन जात आहे.



यावर एक उपाय आहे. हा हा:हा:कार थांबवण्यासाठी जे लोक शर्थीचे प्रयत्न करीत आहेत त्यांनी आपापल्या हेल्पलाईन बनवल्या आहेत. यांचा प्रसार ते फेसबुक, व्हाट्सऍप आणि इतर समाज माध्यमांवर करीत आहेत. पण सगळेच लोक सगळं वाचत नाहीत. अनेकदा काही महत्त्वाची माहिती निसटून जाते. त्यामुळे सरकारने अशा सर्व लोकांच्या माहितीचं संकलन करावं आणि ती माहिती आपल्या शासकीय वेबसाईट आणि ऍपवर प्रसिद्ध करावी. एका छताखाली त्यांना आणावं कोणाला गरज लागालीच तर ते त्यातील योग्य संघटनेला मदतीला बोलवू शकतात. सगळ्या संघटना स्वत:हून एकत्र येतील अशी शक्यता कमी आहे. त्यामुळे सरकारने हा पुढाकार घ्यावा. पण त्यांना केवळ एकत्र आणण्याचं काम सरकारने करावं आणि त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू द्यावं. सरकारी यंत्रणा कुठेतरी आखडली म्हणून अशा संघटनांना उभं रहावं लागलं हे लक्षात असू द्यावं. त्यामुळे अशा समर्पित आणि नि:स्वार्थी भावनेने काम करणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांची मदत सरकारने घेतली तर त्यांचे देणाऱ्याचे हात हजार होतील हे नक्की. सरकारने लोकांसाठी विकत घेतलेल्या वस्तू लोकांपर्यंतच पोहोचतील. भ्रष्टाचाराला थोडा तरी आळा बसेल. काळा बाजार थांबेल. संघटनांनी आणि मदत कार्य करणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा सरकारी पोर्टल वर आल्यावर त्या ठराविक सरकारी उदासीनतेला आपल्या आसपास भटकू देऊ नये. त्यांना आपल्या कामात इतर संघटनांची मदत घेता येईल असे संबंध ठेवता येतील. काम करू इच्छिणाऱ्यांना आपल्या सोबत जोडून घेता येईल. ही पद्धत जर यशस्वी ठरली तर कोरोनाच नाही तर भविष्यात येणाऱ्या कोणत्याही नैसर्गिक किंवा मानव निर्मित संकटाला सामोरं जाणं कठीण जाणार नाही. हा प्रयोग सरकार आणि समर्पित व्यक्ती, संस्था, संघटनांनी करून बघितला पाहिजे