त्याच्या मित्राच्या चुलत बहिणीचा मृत्यू गेल्या वर्षीच्या कोविडच्या पहिल्या लाटेत झाला

जेंव्हा त्याला कळलं की तिला वेळेत ऑक्सिजन मिळाला असता तर तिचा जीव वाचला असता तेंव्हा नुसतंच हतबल होऊन हातात वर हात धरून तो बसला नाही. त्याने सरळ आपली फोर्ड एन्डेवर ही एसयुवी कार विकली आणि ऑक्सिजनचे सिलिंडर विकत घेऊन ते गरजवंत रुग्णांना मोफत देऊ लागला. त्याच्या या ऑक्सिजन पुरवठ्यामुळे त्याला लोकऑक्सिजन मॅनम्हणू लागले. तसं ह्या खऱ्या हीरोचं खरं नाव आहे शहानवाझ शेख.

ऑक्सिजन मॅन” शहानवाझ शेख 


मालाडच्या मालवणी भागात तो युनिटी अँड डिग्निटी फाऊंडेशन ही एक संस्था चालवतो आणि तिच्या माध्यमातून तो गरजूंना ऑक्सिजन पुरवतो. गेल्या वर्षी त्याने तब्बल पाच ते सहा हजार ऑक्सिजन सिलिंडर रुग्णांना पुरवले. मात्र यावेळी ऑक्सिजनची फारच कमतरता असल्यामुळे जिथे दिवसाला ५० सिलिंडरची मागणी होती तिथे आता ५०० ची मागणी होत आहे आणि शाहनवाझ त्याची पूर्तता करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्याने यासाठी आपल्या मित्रांच्या मदतीने एक कंट्रोल रूम सुद्धा बनवली आहे. या कंट्रोल रूम मधूनच तो सध्या लोकांची मागणी फोन वर स्वीकारून त्यांना ऑक्सिजन सिलिंडर पुरवत आहे. गरज असल्यास आपणही 9892012132 क्रमांकावर संपर्क साधा.


ऑक्सिजन मॅन”  आसीम हुसैन.


दिल्लीमध्ये असाच एक ऑक्सिजन मॅन काम करीत आहे त्यांचं नाव आहे आसीम हुसैन. ते दिल्लीच्या दरियागंजमध्ये राहतात. आपल्याबी ह्युमनया संस्थेतर्फे ते ऑक्सिजन बँक चालवतात आणि गरजूंपर्यंत मोफत पुरवठा करतात. मार्च २०२० पासून आतापर्यंत त्यांनी ५५० लोकांना ऑक्सिजन सिलिंडर देऊन त्यांचे प्राण वाचवले आहेत. यावर्षी फक्त एप्रिल महिन्यातच त्यांनी किमान १५० लोकांचे प्राण वाचवले आहेत.


ऑक्सिजन मॅन”  गौरव राय 

शहानवाझने आपली गाडी विकली तर पटनामध्ये एक असा अवलिया आहे जो आपली वॅगन आर कारमध्ये ऑक्सिजन सिलिंडर ठेवतो आणि घरी क्वारंटाईन असणाऱ्या किंवा हॉस्पिटलमधील गरजू रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करतो. त्यांचं नाव आहे गौरव राय. ५२ वर्षांचे गौरव हे स्वत:ला कोरोनाच्या पहिल्या लाटेत गेल्या वर्षी जुलै महिन्यात कोरोनाचं संक्रमण झालं होतं. त्यांच्या पत्नीने त्यांना तातडीने पटनाच्या मेडिकल कॉलेजमध्ये आणलं खरं पण एकाच वेळी अनेक रुग्ण आल्यामुळे आणि त्यावेळी ही साथ नवीनच असल्यामुळे त्यांना बेड मिळाला नाही की ऑक्सिजन मिळाला नाही. ते हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर बसून जोरजोरात श्वास घेत होते, ऑक्सिजनचा स्तर घसरल्यामुळे त्यांना धाप लागली होती. त्यांच्या पत्नीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि अखेर पाच तासांच्या प्रयत्नानंतर त्यांना खाजगीरित्या एक सिलिंडर मिळाला. मृत्युच्या दाढेतून गौरव अशा प्रकारे बाहेर आणि आणि हा दुसरं मिळालेला जन्म त्यांनी रुग्णसेवेसाठी वाहून दिला. गौरव आणि त्यांच्या पत्नीने आपल्या घराच्या बेसमेंटमध्ये ऑक्सिजन बँक बनवली आणि फेसबुक ट्विटरच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचले. लोकांची मागणी आली की गौरव स्वत: आपल्या कारने रुग्णापर्यंत सिलिंडर पोहोचवतात.   

शहानवाझ, आसीम आणि गौरव यांच्या प्रमाणे अनेक कोविड योद्धे आज विविध स्तरावर काम करत असतील. त्या सर्वाना

https://www.itivrutta.com/  चा सलाम.

असे अनेक कोविड योद्धे आज समाजात काम करीत आहेत. आपल्याला अशा कोणाची माहिती असल्यास कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या विषयी नक्की सांगा.