सत्ता भल्याभल्यांना बिघडवते.  साम, दाम, दंड, भेद याचा बेदरकार वापर करतानाच काम, क्रोध, मद, मत्सर आदि षङरिपुंवरही नियंत्रण रहात नाही


आणि मग एक अनिर्बंध, बेबंद आणि मग्रुर व्यक्तिमत्वाचा संचार अशा घोड्यावरून होतो, जो घोडा विनाशाच्या दरीतच पडणार आहेमहाराष्ट्राच्या साठ वर्षांच्या राजकारणातील सर्वात मोठे ऱ्हासपर्व सध्या सुरू आहे. पक्षीय राजकारण, नेतृत्व, शासन, प्रशासन अशा सर्वच स्तरावर जी काही वेगाने घसरण होतेय, ती थांबायची शक्यता नजिकच्या काळात तरी दिसत नाही. आणि देशाच्या राजकारण, अर्थकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रात कायम पथदर्शी ठरलेलं राज्य आज घडीला एक राष्ट्रीय मनोरंजनाचं साधन बनावं यासारखी शोकांतिका नाही. यापूर्वी उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान यांना मिळून बिमारूराज्य म्हटलं जायचं. पण आज ही राज्यही सर्व राजकीय चढउतारासह स्थिरस्थावर होताहेत. प्रगतीपथावर हळूहळू मार्गक्रमणा करताहेत.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मात्र रोज नवा तमाशा (या कलाप्रकाराची माफी मागून) घडतोय, घडवला जातोय. अनागोंदी, अस्थिरता आणि आरोप प्रत्यारोपांनी वातावरणात एक ताण, समाजात तणाव अशी परिस्थिती विरोधी पक्षांसह सत्ताधारीही करताहेत.अरे ला का रे हे आता निव्वळ शाब्दिक राहता त्याची प्रात्यक्षिके सुरू झाली आहेत.

या सर्व गदारोळात गेल्या काही वर्षात सत्तेच्या राजकारणातील सर्वच पक्षातील पुरूषांचा जो तथाकथित पुरूषार्थविविध प्रकरणातून बाहेर आलाय आणि त्यानिमित्ताने या पुरूषार्थाच्या मोहात पडलेल्या वा बळी पडलेल्या स्त्रियांच्या कहाण्याही प्रसृत होताहेत. मात्र सरतेशेवटी सर्व काही त्या स्त्रीलाच भोगावे लागतंय. समाजाचे काही काळ मनोरंजन होते. नैतिक अनैतिकतेच्या चर्चा रंगतात पण अपवादानेच एखादा पुरूष राजकारणी आपल्या क्षेत्रातून बेदखल होतो. नव्या बाजारकेंद्री समाजमाध्यमी उन्मादाच्या काळात स्त्रीचं होणार शोषण (तिचा दोष गृहीत धरूनही) हे खमंग बातम्यांआड दडपलं जातं हे संवेदनशील समाजास डाचणारं नववास्तव आहे.

राजकारणी आणि स्त्रिया हा विषय ३०/४० वर्षांपूर्वी बुवा तिथे बाया या पध्दतीने, उपहासाने आणि मध्यमवर्गीय नैतिकतेने नकारात्मक पध्दतीने पाहिले जायचे. त्या काळात कॉंग्रेस हा देशव्यापी पक्ष होता स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच कॉंग्रेसमध्ये स्त्रिया सक्रीय होत्या. पण स्वातंत्र्यपूर्वकाळात ध्येयवाद होता. याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व आंदोलनात स्त्रिया होत्या, त्या आत्मसन्मानासाठी नंतर धर्मांतरासाठी.

स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस सत्ताधारी पक्ष बनला, तर कम्युनिस्ट, समाजवादी, जनसंघ, आरपीआय, शेकाप, लोकदल, असे विरोधी पक्ष म्हणून सत्तेच्या राजकारणात सक्रीय झाले. या सर्व पक्षात स्त्रिया सक्रीय होत्या, त्यांच्या महिला आघाड्याही होत्या. यापैकी कम्युनिस्ट, समाजवादी, आरपीआय, शेकाप या पक्षातल्या स्त्रिया मूलत: विचारधारेला आकर्षून त्या त्या पक्षात होत्या. सत्ताधारी झाल्यावर कॉंग्रेस मधला ध्येयवाद संपला सत्ता एके सत्ता हा खेळ सुरू झाला आणि बहुतांश उच्चवर्गीय, उच्चजातीय घराण्यातील महिला सत्तापदी गेल्या. सर्वसामान्य स्त्री कॉंग्रेस कार्यकर्तीच्या वाट्याला फरफट, उपेक्षा, हमाली प्रसंगी शोषण आले. राजकारणातील महिलेकडे हीनत्वाच्या नजरेनं पहायची सुरूवात याच काळात झाली. जनसंघासारख्या पक्षातल्या स्त्रिया या संघसंस्कारात वाढलेल्या आणि मुख्यत: ब्राह्मणी सांस्कृतिक वातावरणात वाढलेल्या त्याच विचारांच्या वाहक झाल्या.

कम्युनिस्ट, समाजवादी, आरपीआय, शेकाप या पक्षातील स्त्रिया अभ्यासू, परिवर्तनवादी, क्रांतीप्रवण लढाऊ वृत्तीच्या होत्या. पण या वैचारिक पायावर उभ्या पक्षांतूनही अनेक वर्षे स्त्रियांना निर्णयप्रक्रियेत स्थान नव्हतं. शिवाय स्त्री प्रश्नांना प्राधान्यही नव्हतं. ते आलं १९७५ च्या आंतरराष्ट्रीय महिला वर्षानंतर!

आंतरराष्ट्रीय महिला वर्षानंतर देशभरच स्त्री प्रश्न ऐरणीवर आले. या काळात बिगरसंसदीय राजकारणात अनेक नवनव्या स्त्री संघटना जन्माला आल्या. स्त्रीवादी साहित्य म्हणून एक नवी धारा साहित्य, कला क्षेत्रात सुरू झाली. मुलींचे शिक्षणाचे प्रमाणही वाढते राहिले. पारंपरिक व्यवसाया पलिकडे विविध क्षेत्रात मिळवत्या स्त्रियांचे प्रमाण वाढत गेले.

१९८५ मध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना पंचायत राज संकल्पना सुरू झाली आणि स्त्रिया ग्रामपंचायत ते संसद अशा सर्व सभागृहात थेट पक्षीय सत्तेच्या राजकारणात पोहचल्या. ९० च्या दशकातील मंडल आयोगाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याने देश ढवळून काढला तर त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुत्वाचे  राजकारण सुरू झाले. एका बाजूला हा जातीय, धर्मीय संघर्ष चालू असतानाच देशाने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आणि खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण या त्रिसूत्रीमुळे भारताचे केवऴ आर्थिकच नव्हे तर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वातावरणही वेगाने बदलत गेले, तर विसाव्या शतकाच्या अखेरीस झालेल्या माध्यम तंत्रज्ञान क्रांतीने तर समाजातला मध्यमवर्ग, नवश्रीमंत झाला, श्रीमंत अधिक श्रीमंत झाले तर गरीब वर्ग दारिद्र्य रेषेच्याही खाली ढकलला गेला त्याचवेळी चंगळवादी जीवनशैलीचा शिरकाव देशात सर्वत्र झाला आणि त्यातून नवेच सांस्कृतिक पर्यावरण उभे राहिले.

१९७५ नंतरचे स्त्री पुरूष समानतेचे, सहजीवनाचे लढे, मुलींच्या शिक्षणाचे वाढते प्रमाण, मुली, स्त्रियांचे पुरूषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात सक्षमतेने पुढे जाणे यामुळे मोठ्या संख्येने स्त्री पुरूषांचा स्वतंत्र एकत्रित सार्वजनिक वावर वाढला. बाजारकेंद्री अर्थव्यवस्थेने पारंपरिक मूल्ये झाकोळत नवी मूल्यव्यवस्था प्रस्थापित करत नेली. माध्यम तंत्रज्ञानाच्या स्फोटाने ही नवी मूल्यव्यवस्था त्सुनामी सारखी पसरली यात पूर्वीपासूनच वस्तू विषय असलेली स्त्री आता थेट बाजाराचा केंद्रबिंदूच झाली. स्त्री पुरूष यांतील सर्वच स्तरातली स्पर्धा वाढली. परिणामस्वरूप स्त्री चा वापर विविधांगी, खुलेपणाने होऊ लागला. नवनवीन कायदे करावे लागले. तरीही स्त्रीचं वस्तूकरण सुरूच राहिलं. पूर्वी ते एखाद दुसऱ्या क्षेत्रात व्हायचं, आता ते सर्वव्यापी झालं.

हा इतिहास लिहिण्यामागे कारण गेल्या काही वर्षात सत्ता स्थानावरील पुरूष आणि त्याच्या सोबत काम करणारी अथवा कामाच्या निमित्ताने ओळख आणि मग मैत्री, प्रेमसंबंध, शरिरसंबंध, प्रसंगी संतती  आणि नंतर नात्याचा गौप्यस्फोट वाद, आरोप प्रत्यारोप, कोर्ट कचेऱ्या यात अलिकडे जिला खऱ्या अर्थाने म्हणता येईल अशा सत्तेच्या राजकारणातील पुरूषांच्या आयुष्यातील लग्नबाह्यसंबंधातील स्त्रिया या खूपच चर्चेत येताहेत.

याआधी तरूण तेजपाल निमित्ताने माध्यमातील पुरूषांच्या लैंगिक वर्तनाची चर्चा झाली तर तनुश्री दत्ताने चित्रपटसृष्टीतील लैंगिक वर्तनावर केलेल्या आरोपांनंतर मी टूनावाची हॉलिवूड मधली मोहिम इथेही सुरू झाली!

महाराष्ट्रातील राजकारणी पुरूषाच्या आयुष्यातील दुसरी स्त्री याबद्दल सर्वात उघड चर्चा झाली ती वसंतदादा पाटील शालिनीताई पाटील यांची! त्या आधीही काही मंत्री, आमदार, खासदार यांची अशी नाती होती पण त्याची वाच्यता झाली नाही किंवा वसंतदादांच्या कुटुंबाने ते वास्तव जसं (आहे तसं) स्वीकारलं, तसंच अनेकांच्या कुटुंबांनी स्वीकारले.

आता गेल्या दोन वर्षात संजय राठोड, धनंजय मुंडे आणि आता ताजे प्रकरण गणेश नाईक यांचे. यापैकी राठोंडांचा संबंध असलेली मुलगी त्यांच्याच समाजातली त्यांच्या मानाने तरूण चित्रपटसृष्टीच्या आकर्षणाने या नात्यात अडकली आणि खूपच करूण अंत झाला तिचा. राठोडांनी संबंध नाकारत, समाजातील स्थानाचा वापर करून मुलीच्या आईवडिलांना शांत केले. राजीनामा देऊन राजकीय चर्चा थांबवली. पण ती मुलगी तशी हकनाकच गेली ना?

धनंजय मुंडे प्रकरण बाहेर आल्यावर त्यांनी सारे स्वीकारून कबुलीच दिली हा एक समांतर संसार आहे हे जाहिरच केलं. हे संबंध खूपच जुने असल्याने तेव्हा ते भाजपात असल्याने ते उघड गुपित असणार तेंव्हा! त्यामुळेच संजय राठोडांच्या मागे हात धुवून लागलेल्या चित्रा वाघ मुंडे प्रकरणात सायलेंट मोडवर गेल्या. फडणवीसही जुन्या मैत्रीला जागले!

गणेश नाईकांचाही समांतर संसार त्यांना नकोसा झाला किंवा त्यात नवनवीन पेच उद्भवू पहाताहेत म्हटल्यावर नाईकांनी साम दाम दंड भेद असे सर्व प्रकार वापरून थेट प्रकरण संपविण्याचाचप्रयत्न सुरू केला. पण ती स्त्री ही निकराने उभी राहिली आता गणेश नाईक अटकपूर्व जामीनाच्या शोधात फरार झालेत!

ही झाली जाहिर झालेली वा काही कारणाने उघड झालेली प्रकरणे. जाजमाखाली अजून किती असतील? राजकीय वार्ताहरांकडे तर यादीच असेल! तशी ती सर्व पक्षश्रेष्ठींकडे असतेच. वेळ पाहून तिचा उपयोग केला जातो!

बरं बिल क्लिंटन प्रकरणाने तर हा जागतिक जीवन व्यवहार आहे हे जगाला कळले. आज जवळपास सर्वच सत्ताधीशांच्या (काही अपवाद अर्थातच)अशा संबंधांच्या खमंग चर्चा चालू असतात. वाईट वाटते ते हेच की या सर्व प्रकरणात बदनाम होते ती स्त्री. जिने आपले तन, मन, प्रसंगी धन दिलेले असते तिचा अक्षरश: वापर करून सोडून द्यायचे यातून पुरूषी रासवटपणा, सत्तेची मस्ती, पाण्यासारखा पैसा यातून कधीच उदात्त प्रेमकहाणी पहायला मिळाली नाही.

एन डी तिवारी ते गणेश नाईक स्वत:चे पितृत्वच नाकारून आपल्या एकेकाळच्या प्रेमपात्राला ज्या पध्दतीने झिडकारतात ते पाहून वाटते की, स्त्रिया पुरूषांच्या पुरूषीवृत्तीला नजरेआड करत किती युगं नुस्तं समर्पणच करत रहाणार आहेत?

किती काळ त्या भोगदासी म्हणूनच वावरणार? आज हक्काची लढाई त्या लढतात. पण कधी? जेव्हा सारं लुटून नेलेलं असतं, आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं! अभागीपणाचा शिक्का कपाळी मिरवत समाज हेटाळणीच्या, शेलक्या विशेषणांचे अलंकार जबरदस्ती तनमनावर घालून जी शोभायात्रा निघते त्यात निव्वळ शरिर फरफटत जात असतं, जीव तर कधीच उडून गेलेला असतो!

कधी थांबतील या शोकांतिका?

 

संजय

पवार