अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती बडनेराचे आमदार रवी राणा. या लोकप्रतिनिधी दाम्पत्याला मातोश्रीवर हनुमान उडी मारण्याचा खेळ अंगाशी येऊन पुढील काळात भलताच महागात पडायची शक्यता आहे.  

जवळपास आठवडाभर वृत्तवाहिन्यांचा पडदा ताब्यात ठेवून या दाम्पत्याने आपल्या "अपक्ष" राजकीय ताकदीचा भलताच भ्रम करून घेतला. आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याच्या कलमांनी जर जामीन मिळाला नाही तर वृत्तवाहिन्यांचे फ्लॅशेस, विरोधी पक्षियांचे बाईटस दुसऱ्या बातम्यांकडे वळतील आणि उरेल फक्त वकिलांची, जेलर, न्यायालयाची वाणी, जेलचा सूर्योदय आणि जेलचा सूर्यास्त! त्यावेळी कदाचित हनुमान चालिसा मनोधैर्य टिकवायला कामी येईल जी मातोश्रीवर वाचायला पाठ केली होती!

राणा दाम्पत्याला कायमच चर्चेत रहाण्यात स्वारस्य रहात आलंय. सुरूवातीला कॉंग्रेसच्या सावलीतले रवी राणा नंतर पत्नीसह कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर अपक्ष म्हणून लढून सेनेला पराभूत करून निवडून आले. पण २०१४ नंतर २०१९ ला ही मोदी सरकारलाच बहुमताची पसंती मिळताच या अपक्ष पतीपत्नीने सरळ भाजपच्या कमळा भोवतीच्या भुंग्याची भूमिका घेतली. आणि चहापेक्षा किटली गरम तसे हे दाम्पत्य भाजपचा अजेंडा अपक्ष म्हणून राबवू लागले. त्याचे त्यांना काय बक्षिस मिळते हे भविष्यात कळेलच. अन्यथा त्यांना सदाभाऊ खोत, महादेव जानकर, विनायक मेटे यांच्या राजकीय कारकिर्दीकडे बघून सहज अंदाज करता येईल. हायकोर्टाने गुन्हे रद्द करण्याची याचिकाही फेटाळल्याने आता या धाडसी दाम्पत्याला किमान २९ एप्रिलपर्यंत तरी जेलमध्येच रहावे लागणार. भाजपच्या मदतीने चिंतनासाठी हा वेळ घालवायला हरकत नाही.

अपेक्षेप्रमाणे नवनीत राणांचे ब्लडप्रेशर वाढले त्यांना इस्पितळात हलवावे लागले तरीही त्यांनी पोलिसांनी छळ केल्याचा आरोप केला तर साक्षात विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांनी तुरूंगात नवनीत राणांना पाणीही नाकारले म्हणत गळा काढलायत्याआधीच्या रात्री प्रसिद्धी लोलुप किरीट सोमय्या कारण नसताना राणा दामप्त्याला भेटायला गेले संतप्त शिवसैनिकांच्या हल्ल्यात जखमी(?)  होऊन रात्रभर प्रसिध्दी मिळवून सकाळीच दिल्ली दरबारी जाऊन तक्रार केली! (इतक्या सहज केंद्रीय गृह मंत्रालय वा इतर मंत्रालयांचे दरवाजे माध्यम प्रतिनिधी वा इतरांसाठी उघडत नाहीत!) राणा दामप्त्याच्या समर्थनार्थ भाजपची धडपड, लगबग खूप काही सांगणारी आहे.

मुळात राणा दाम्पत्याचा मातोश्रीवर जाऊन() हनुमान चालीसा म्हणण्याचा हट्ट हा एक अशोभनीय आगाऊपणा होता. उध्दव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करून देण्यासाठी हा हट्ट! हनुमान चालिसाचे पठण करून कुणाचे हिंदुत्व जागृत करायचा हा उद्योग म्हणजे तंत्र मंत्र, जारण, मारणाचा प्रकार झाला. संविधानिक शपथ घेतलेल्या आमदार खासदाराने, संविधानिक पदावर असलेल्या उध्दव ठाकरेंच्या घरावर हे असलं पठण करायला जाणं हे जितकं असंविधानिक तितकंच अवैज्ञानिकही

खरं तर या दोघांवर महाराष्ट्र अंधश्रध्दा जादूटोणा निर्मूलन  कायद्याखाली गुन्हा दाखल करायला हवा कारण या बाई सतत महाराष्ट्राला लागलेली साडेसाती दूर करण्यासाठी हनुमान चालीसा म्हणायचीय असं ओरडून सांगत होत्या. मुख्यमंत्री हे संविधानिक पद महाराष्ट्र हे एक प्रगत राज्य, त्याला साडेसाती लागलीय असं म्हणत हे अवैज्ञानिक, असंविधानिक उपाय धर्माच्या नावाने करणे हाच खरा तर मोठा गुन्हा समजून यांना ताब्यात घ्यायला हवं होतं. अजूनही या कलमांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. किंबहूना व्हायला हवा. त्याशिवाय असले बालिश चाळे थांबणार नाहीत.

आश्चर्य म्हणजे विरोधी पक्षनेते फडणवीस अगदी निरागस चेहरा करत प्रतिप्रश्न करतात की काय हरकत होती परवानगी द्यायला? हनुमान चालिसा म्हणण्यात गैर काय? पाच दहा मिनिटात गेले असते चालिसा वाचूनआता याच फडणवीसांनी मुंबईच्या राष्ट्रवादीच्या फहमिदा खान हसन यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून पंतप्रधान निवासासमोर सर्वधर्मिय प्रार्थना म्हणण्यासाठी परवानगी मागितलीय, ती मिळवून द्यावीत्याही प्रार्थनाच म्हणणार आहेत, ती ही सर्वधर्मिय! पुन्हा त्यांचा काही साडेसाती वगैरेसाठी हा उपक्रम नाही तर भाईचारा रहावा म्हणून आहे. मग आता देवेंद्रजी घेतील का पुढाकार? का मुख्यमंत्र्यांच्या दारी काहीही चालतं पंतप्रधानांच्या दारी फक्त आणि फक्त नियम, राष्ट्रीय सुरक्षा, पदप्रतिष्ठा वगैरे?

आता पुन्हा जरा राणा दामप्त्याकडे पाहू. रवी राणा अमरानतीचेच सुपूत्र. तिथूनच पदवीधर झालेले. सुरूवातीपासून समाजकारण, राजकारणाची आवड. कॉंग्रेसशी जवळीक, त्यात योगाची आवड निर्माण झाली रामदेवबाबांचे शिष्यत्वही घेतलेनवनीत कौर ही मुंबईच्या पंजाबी कुटुंबातील, वडिल सैन्यात होते. अनेक सेनाधिकाऱ्यांच्या मुली मॉडेलिंग क्षेत्रात जातात, तशीच नवनीतही गेली. यशस्वी झाली मग बारावीनंतर शिक्षण सोडून थेट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत दाखल. कन्नड, तेलगू मल्याळम चित्रपटात उत्तम कामगिरी रूपाच्या जोरावर केली. देहसंवर्धनासाठी योगा करू लागली. त्यातून रामदेव बाबा तिथेच योगायोगाने रवीची भेट. मग परिचय, प्रेम पुढे साक्षात रामदेवबाबांच्या आशिर्वादाने चक्क सामुहिक विवाह सोहळ्यात दोघं विवाहबध्द झाले. रवी राणा राजकारणात होतेच. लग्नानंतर काहीच वर्षात नवनीत राणाही राजकारणात उतरल्या. इथे त्यांना दाक्षिणात्य चित्रपटसॄष्टी राजकारण या समीकरणाची मदत झाली असावी वा तो अनुभव प्रेरणास्त्रोत ठरला असावा!

मुंबईचा जन्म, पंजाबी रक्त दाक्षिणात्य चंदेरी राजकीय धिटाई यामुळे मुंबईहून अमरावतीत जाऊनही नवनीतजी ना लाजल्या ना बुजल्या. उलट अल्पावधीत त्या लक्षणीय व्यक्तिमत्व झाल्या. रवी राणांची राजकीय कारकीर्द झाकोळत एक पराभव पचवत त्या दुसऱ्याच प्रयत्नात आनंदराव अडसूळांसारख्या भक्कम गडाला खिंडार पाडत थेट संसदेत पोहचल्या. हा प्रवास उल्लेखनीय तसाच वेगवानही. नवनीत राणांनी लोकसभेत पोहचताच भाजपची साथ देत राजकारणाचे धडे जोरात गिरवायला सुरूवात केली. अपक्ष असूनही दोन तीन भाषांवर प्रभुत्व, अभिनयाने आलेला सभाधीटपणा. यामुळे लोकसभेतील त्यांची कामगिरी उठावदारच ठरली. सुप्रिया सुळेंप्रमाणे ती अभ्यासू नसेल पण लक्षवेधी करण्यात त्या यशस्वी होतात. त्यामुळे चर्चेतही रहातात.

पण याच आत्मविश्वासाने आता त्यांचा घात केलाय. तो अति झाला  आणि त्यांनी मातोश्रीला ललकारण्याची चूक केली. ती ही अवेळी. आणि कारणे कृतीही समाजोपयोगी नसलेली. धाडस करून त्या मुंबईत पोहचल्या खऱ्या. पण इथूनच पोलिसांनी प्रतिबंधक आदेश बजावत सापळा रचायला सुरूवात केली. राणांच्या घराखाली सैनिक तैनात होतेच. मातोश्रीवरही होतेदाम्पत्य खिंडीत सापडले.आता सन्मानीय सुटकेची वाट शोधताना एक धागा सापडला, पंतप्रधानांचा दौरा! पटकन हे कारण देत वीरांगनेने पांढरे निशाण फडकवले! अपेक्षा ही की आता पोलीस संरक्षणात विमानतळ आणि रात्री अमरावतीच्या घरी!

पण पांढरे निशाण हाती येताच पोलिसांनी आपले काम सुरू केले. आरोपपत्र ठेवत ताब्यात घेतले. आता दाम्पत्याची देहबोली बदलली. चेहऱ्याचे रंग बदलले. सकाळपासूनचा वीरतेचा मेकअप उतरला. पुढची वारी दिसू लागली, तसा फडणवीस, राणेंचा धावा सुरू केला. पण तोवर पोलिसांनी सापळा घट्ट आवळून थेट १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळवत शनिवार, रविवारचा फायदा घेत हायकोर्टही सोमवारशिवाय लाभणार नाही हे पाहिलेलोकप्रतिनिधी झालो म्हणजे राजकारण कोळून प्यायलो. कवचकुंडले घेऊन कशाही उड्या मारू या भ्रमात विरोधी पक्षांने आपल्या पतंगाची दोरी कधी ताब्यात घेतली हे कळलेले हे दाम्पत्य आता तारिख पे तारिखमध्ये अडकू शकते कारण गुन्हा राजद्रोहाचा आहे! या कलमाचा वापर कसा करावा हे केंद्रानेच सर्व राज्यांना शिकवलेय. दामप्त्याचा हा कदाचित पहिलाच कारावास असेलआता त्यांना कळेल भले भले राजकारणी अटकेपासून का पळतात! हा धडा पुढच्या वाटचालीत उपयोगी पडावा!

 

संजय

पवार