कामगारांच्या अभ्यासकांच्या मते स्त्री कामगाराला नेहमीच पुरुष कामगारांच्या तुलनेत कमी पगार मिळतो.


रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारात हा फरक स्पष्ट दिसतो. याला स्त्री ही मुळात पुरुषांपेक्षा कमी ताकदवान असल्याने मेहनतीचे अपेक्षित काम ती करू शकत नाही असं नियोक्ता किंवा ठेकेदार स्वत:हूनच ठरवतो आणि त्याच्याकडे कामाला असलेल्या स्त्रियांना तो कमी मोलमजुरी देतो. हेच धोरण सरकरी कार्यालये आणि खासगी कंपन्यांमध्येसुद्धा वापरलं जातं. अमेरिकन आर्थिक इतिहासकार (economic historian) आणि कामगार अर्थतज्ज्ञ (labor economist) क्लॉडिया गोल्डिन यांनी आपल्या संशोधनातून उपरोक्त धोरण हे केवळ व्यापाऱ्यांच्या किंवा नियोक्त्यांच्या फायद्यासाठी असतं. प्रत्यक्षात स्त्री पुरुष सारखेच काम करता आणि त्यांना सामान वेतनच मिळालं पाहिजे हे दाखवून दिलं. त्यांच्या या कामासाठी त्यांना २०२३ मध्ये त्यांना नोबेल अर्थशास्त्र पुरस्कार प्रदान करण्यात आला.

क्लॉडिया गोल्डिन यांचा जन्म १४ मे १९४६ रोजी न्यूयॉर्क शहरातील ब्राँक्स येथे झाला. सुरुवातीला त्यांना मायक्रोबायोलॉजी शिकण्याची इच्छा होती, पण कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे वर्ग घेतल्यानंतर त्यांना त्यात रुची वाटू लागली. पुढे कॉर्नेल विद्यापीठात अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. नंतर युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो येथून मास्टर्स व PhD मिळवली.

गोल्डिन यांनी युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन, प्रिंसटन युनिव्हर्सिटी, पेनसिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापकी केली आणि सध्या त्या हार्वर्ड युनिव्हर्सिटी हार्वर्डमध्ये अर्थशास्त्र विभागात कार्यरत आहेत. त्यांनी National Bureau of Economic Research (NBER) यांचे “Development of the American Economy Program” या कार्यक्रमाची धुरा दीर्घ काळ सांभाळली आहे. तसेच Gender in the Economy या गटाच्या सह-निर्देशक आहेत.



नोबेल पुरस्कार मिळवणारे संशोध

गोल्डिन यांना हा पुरस्कार गोल्डिन यांच्या कार्याने महिलांच्या कामगार बाजारातील परिणामांविषयी असलेले गैरसमज दूर करून प्रत्येक कार्यक्षेत्रात लिंगसमतेसाठी चालू असलेल्या आव्हानांवर प्रकाश टाकला. त्यांनी त्यांच्या संशोधनात अमेरिकेसह इतर उच्च-उत्पन्न देशांमधील २०० वर्षांहून अधिक काळातील डेटा वापरून महिलांच्या मजुरी आणि रोजगारातील सहभागाचा पहिला सर्वंकष ऐतिहासिक आढावा घेतला. त्यांनी दाखवून दिले की महिलांचा कामगार बाजारातील सहभाग हा एकरेषीय नाही तर तो यू-आकाराच्या वक्राप्रमाणे होता.

U-आकाराच्या वक्राचा सिद्धांत

त्यांच्या अभ्यासानुसार, महिलांच्या कामगार बाजारातील सहभागाच्या स्तरात एक U-आकाराचा वक्र दिसतो: सुरुवातीला खूप सहभाग, त्यानंतर तो घटतो आणि पुन्हा वाढतो. U च्या डावीकडच्या बाजूने सुरू होऊन म्हणजेच लग्नाआधी पोरवयापासून आईसोबत कामाला जाणे, सोबत शिक्षण सुरू असेल तर ते घेणे. यात ती कामगार म्हणून आपले योगदान देत असते. मग लग्नाचं वय झालं किंवा लग्न झालं की पहिलं मूल होईपर्यंत तरी ती कामावर जात नाही. नंतरही काही महिने अथवा वर्षे जात नाही. इथे ती U च्या मधल्या गोलाकार पण पातळ भागावर येते. नंतर वय उतरू लागल्यावर पुन्हा कामाला लागते. ग्रामीण सह शहर भागातही हा फरक दिसतो. ग्रामीण महिला मनरेगा कामावर जाते तर शहरी स्त्री घर, मुलं सांभाळून करता येईल असा काहीतरी कामधंदा, नोकरी करू लागते. म्हणजेच ती U आकाराच्या उजवीकडच्या भागावर येते. आर्थिक विकास,  सामाजिक बदल,  शिक्षण आणि कौटुंबिक धोरणे हे घटकांमुळे हे या सर्व स्थित्यंतरामध्ये घडत असतं.

स्त्रियांच्या कामगार म्हणून म्हणजे मानधन कमावणारी कामगार म्हणून असलेला आलेखही U आकार दाखवतो. एकोणिसाव्या शतकात शेतीप्रधान समाजात अनेक महिला काम करीत, परंतु बहुतेक वेळा हे श्रम घरच्या शेतात किंवा कौटुंबिक व्यवसायात न भरपाईचे (unpaid) असत. अर्थव्यवस्था औद्योगिकीकरणाकडे वळल्यावर महिलांचा रोजगारातील सहभाग कमी झाला,  कारण कुटुंब आणि काम यांचा समतोल साधणे अधिक कठीण झाले. विसाव्या शकतात मात्र सेवा क्षेत्राच्या वाढीसोबत आणि नवीन शैक्षणिक संधींमुळे महिलांचा रोजगारातील सहभाग पुन्हा वाढू लागला. क्लॉडिया गोल्डिन यांच्या या संशोधनामुळे अनेक गैरसमज दूर झाले आणि कार्यस्थळी लिंगसमता (gender equity) साधण्यातील आव्हाने अधिक स्पष्ट झाली.



लिंगाधारित वेतन तफावत (Gender Pay Gap): क्लॉडिया गोल्डिन यांनी शोधून काढले की, स्त्री-पुरुषांतील कायमस्वरूपी वेतन फरक हा मुख्यत्वे शिक्षणातील किंवा नोकरीच्या निवडीतील फरकांमुळे नसतो. हा फरक बहुतेकदा पहिल्या अपत्याच्या जन्मानंतर दिसतो, ज्याला Parenthood Penalty असे म्हणतात. कारण उच्च वेतन देणाऱ्या अनेक नोकऱ्या अधिक वेळेच्या आणि लवचिक नसलेल्या कामाच्या तासांना प्राधान्य देतात, ज्यामुळे मुलांच्या संगोपनाची जबाबदारी जास्त प्रमाणात सांभाळणाऱ्या महिलांना तोटा होतो.

शांत क्रांती’ (Quiet Revolution): १९६० च्या दशकात गर्भनिरोधक गोळ्यांच्या (contraceptive pill) व्यापक उपलब्धतेने महिलांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणला. यामुळे तरुण महिलांना विवाह आणि मातृत्व पुढे ढकलता आले, शिक्षणात गुंतवणूक करता आली आणि दीर्घकालीन करिअरची आखणी करता आली.

ऐतिहासिक डेटा विश्लेषण: गोल्डिन यांच्या संशोधनाची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत म्हणजे ऐतिहासिक आकडेवारीचा तपशीलवार आणि “गुप्तहेरासारखा” अभ्यास. त्यांनी १९व्या शतकाच्या उत्तरार्धातील अधिकृत जनगणना आकडे तपासून दुरुस्त केले आणि महिलांचा रोजगारातील सहभाग पूर्वी नोंदवलेल्या आकड्यांपेक्षा खूपच जास्त असल्याचे सिद्ध केले.



गोल्डिनच्या संशोधनाचा प्रभाव खालील प्रमाणे दिसतो:

·        धोरण बनवणाऱ्यांना महिलांच्या कामगार बाजारातील अडचणी समजण्यास मदत झाली आहे. अधिक समानता (gender equality) साधण्यासाठी कायदे, निती, संस्था यांच्या सहभागाची गरज अधोरेखित झाली आहे.

·        शिक्षण, कौशल्य विकास, कामाच्या लवचिकतेचा विचार (flexible working), कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा योग्य वाटा (work-family balance) यांसारख्या गोष्टींना महत्त्व मिळाले आहे. यामुळेच गृहिणींच्या कर्तृत्वाला जीडीपीमध्ये स्थान देण्याविषयी विचार होऊ लागला आहे.

·        महिला-पुरुष उत्पन्नातील विषमता (wage gap) फक्त तात्पुरती समस्या नाही, ती सामाजिक आणि ऐतिहासिक संदर्भात खोलपणे तयार झालेली आहे हे लक्षात आले आहे.

क्लॉडिया गोल्डिन हे नाव आर्थिक इतिहास व लिंगाधारित आर्थिक असमानता यांच्या अभ्यासातील अग्रगण्य नाव आहे. सामाजिक बदल, कौटुंबिक जबाबदाऱ्या, निती, शिक्षण हे सगळे घटक महिलांच्या काम, उत्पन्न आणि संधींवर कसे प्रभाव टाकतात हे त्यांनी दाखवून दिलं आहे. त्यांच्या संशोधनामुळे जागतिक स्तरावर महिला समानतेच्या चर्चेला नवा आयाम मिळाला आहे. स्त्रियांच्या योगदाणामुळे त्यांना 'अनमोल' ठरवणाऱ्या क्लॉडिया गोल्डिन यांचे शतश: आभार. 

--- विनिशा धामणकर

---------------=========------------