सध्या आपल्या देशात कोणाला कोणापासून खतरा आहे, हे रोजच्या ‘कोण कोणास म्हणाले’ टाईप न्यूज बुलेटीन मधून समजतं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फक्त खूप भाबडेच आहात असं नाही तर तुम्ही झुरळ सुद्धा आहात. 

ते झुरळ ज्याला जगात काय चाललं आहे याच्याशी काही देणंघेणं नसतं, जो कोणत्याही परिस्थितीत तगून राहतो, जगतो, आपल्यासारख्या आणखी झुरळांची पैदास करत राहतो आणि कोणाच्या अध्यातमध्यात पडलाच तर त्याला झटकून टाकलं जातं, चिरडलं जातं, ज्याच्या अस्तित्वाला काहीच किंमत नसते. अशा या तुमच्या आमच्या सारख्या सगळ्या झुरळांना आपापसात लढवत ठेवत उद्योजक, शासन, प्रशासन आणि स्थानिक लालची लोकांचं सिंडीकेट खरोखरची मालक असलेल्या अखंड जनतेला कसं नाडतं, त्यांच्या भविष्याची चिंता करतो असं भासवून त्यांचा श्वास गुदमरवून टाकण्याचा अव्यापारेषु व्यापार कसं करतं याचा आरसा दाखवणारी एक धाडसी कलाकृती म्हणजे नुकताच झळकलेला चित्रपट ‘दशावतार’.

‘दशावतार’ म्हणजे कोकणातल्या मातीतली अस्सल कलाकृती. त्यातल्या विष्णूच्या दशावतारासह पुराण, रामायण, महाभारत, सत्यवान सावित्री सारख्या नाटकात मुख्य भूमिका करणाऱ्या कलाकाराला त्या त्या गावात सुपरस्टारचा दर्जा असतो. असं असलं तरी दशावतार हा चित्रपट फक्त कोकणातील लोकांच्या आयुष्याशी, विकासाच्या नावावर त्यांच्या आयुष्याचे ‘दशावतार’ कसे झाले याच्याशीच आपण संबंधित ठेवले तर आपल्याला स्वत:ला पुन्हा तेच म्हटलं पाहिजे. झुरळ. असो.


दशावतार’ चित्रपटाची कथा कोकणवासियांना नको असलेल्या खाणकामातून येणाऱ्या विकासाच्या विरोधातील संघर्षाची आहे. त्यामुळे ती कोकणापुरती मर्यादित राहत नाही. हा संघर्ष देश पातळीवरचा आहे. हा चित्रपट मी त्यावेळी पाहिला जेव्हा लेह लडाख हे केंद्रशासित न ठेवता त्याला राज्य म्हणून दर्जा द्यावा आणि सहाव्या अनुसूचीमध्ये त्याला सामावून घ्यावं या मागणीला हिंसक वळण लागलं आणि निसर्गाला वैज्ञानिक पद्धतीने जपणाऱ्या सोनम वांगचुक यांना अटक झाली. देशाचे वर्तमान आणि भविष्य या दोन्हीसाठी एकाच वेळी लढणाऱ्या माणसावर अशी नामुष्की ओढवलेली पाहून माझ्या मुठी वळल्या होत्या. ‘दशावतार’ चित्रपटातही याच कारणासाठी छातीवर गोळी झेलणारा बाबली मिस्त्री (८० वर्षीय दिलीप प्रभावळकर) पाहिला आणि कोकणातील पडझड उघड्या डोळ्यांनी मोठ्या पडद्यावर साकारताना पाहून अशाच मुठी वळल्या. आपण किती निकृष्ट, निरुपयोगी, निरुपद्रवी झुरळ आहोत याची जाणीव झाली.




‘दशावतार’ हे निमित्त आहे. अशा कलाकृतींमुळे चर्चेची सुरुवात होते. मुलाखती होतात. अभिनेते, रंगकर्मींची वाहवा होते. पुढे काय? काही होतं? काही होईल? तसं ‘कांतारा’ पण निमित्त झालाच होता. त्यानंतरही ‘हसदेव’ रडतोय, त्यानंतरही ‘शक्तीपीठ’, ‘समृद्धी’, ‘बुलेट ट्रेन’ निसर्गाच्या बोकांडी येऊन बसत आहेतच. ‘दशावतार’ चित्रपटाच्या शेवटी वंदना (प्रियदर्शिनी इंदलकर) गावकऱ्यांना एकत्र करून कातळोबाला फोडून त्याच्या पोटातून बेसोल्ट काढण्याचा इरादा असणाऱ्या उद्योगपती सरमळकरच्या (विजय केंकेरे) विरोधात उभी करते. सरमळकरला गावकरी विचारतात, ‘खाण बंद करणार की नाही?’ तर तो त्यांना नोकऱ्यांचं अमिष दाखवतो. गावकरी नकार देतात. पण तो सीन तिथेच संपतो! का? सरमळकर खाण बंद करण्याविषयी काहीच बोलत नाही. का? इथेच दिग्दर्शक सुबोध खानविलकर यांना सूचित करायाचं आहे की, कितीही आंदोलने, निषेध मोर्चे झाले तरी उद्योगपती तेच करणार जे त्याला हवं आहे. कारण त्याच्या भोवती सिंडीकेट आहे. दशावतारातील वराहाने, मत्स्यरुपाने, नरसिंहाने त्या सिंडीकेटमधले कितीही राक्षस मारले तरी ‘सरमळकर’ मरत नाहीत. ते जिवंतच राहतात आणि आपल्या शेल कंपन्यांचं सिंडीकेट बनवतच राहतात. त्यांना कवरिंग फायर देण्यासाठी राजकारणी लोक ‘सतरंज्या’ अंथरून तयार असतात.

विकासातला कोणता वाटा कशाप्रकारे स्थानिकांना मिळतो याचा लेखाजोखा जन्माने इराणी असलेल्या आणि अमेरिका, इंग्लंडमध्ये शिक्षण घेतलेल्या प्रा. लालेह खलिली यांनी त्यांच्या ‘एक्स्ट्रॅक्टिव्ह कॅपिटालिझम’ या पुस्तकातून मांडला आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीने श्रीमंत असूनही आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिकेतील राष्ट्रे गरीब कशी राहिली आणि दक्षिण जगतातील म्हणजे ज्याला आपण आता ग्लोबल साऊथ आणि पूर्वी तिसरे जग म्हणत होतो तिथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी, विशेषत: खनिज तेलासाठी जागतिक साखळी कशी काम करते, हे या ग्रंथातून दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. नैसर्गिक ‘साधनसंपत्तीच्या व्यापाराला अडचणीचे ठरणारे अडथळे बहुराष्ट्रीय कंपन्या साम-दाम-दंड भेद वापरून मोडून काढतात. ही प्रक्रिया कशी घडते हे लेखिकेने उदाहरणांतून दाखवून दिले आहे,’ असं अंकुश पाराजी आवारे यांनी लोकसत्तातील ‘बुकमार्क’ मध्ये लिहिलं आहे. म्हणून म्हटलं, हा ‘दशावतार’ फक्त कोकणापुरता मर्यादित नाही. हे जागतिक सिंडीकेट निसर्गाला ओरबडत राहिल्यानेच त्याचे परिणाम उत्तराखंड, हिमालय, सिक्कीमचे नागरिक भोगत आहेत. निसर्गाचा प्रकोप आणि चुकीच्या विकासातून उभ्या राहिलेल्या संकटाचा सामना करत आहेत.



‘दशावतार’मध्ये सुद्धा असाच अडचणीचा ठरणाऱ्या माधवाला (सिद्धार्थ मेनन) कातळोबा फोडण्यासाठी त्याने केलेल्या विरोधासाठी साम-दाम-दंड भेद वापरून शिक्षा केली जाते. केरळच्या सुंदर देवभूमीतून आलेला हा कलाकार कोकणच्या ‘दशवतारातून’ मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करतो हा सुद्धा काव्यगत न्यायच म्हणायला हवा. कातळोबावर आलेलं अरिष्ट समजल्यावर अधीर, अस्वस्थ होऊन कावराबावरा झालेला तरी या विनाशकारी प्रकल्पाचे फोटो आपल्या फोनमध्ये उतरवून महत्त्वाची रेकॉर्डिंग करणाऱ्या सिद्धार्थने प्रचंड ताकदीने साकारलेला माधव पाहून वाटतं, असे कितीतरी माधव या व्यवस्थेला बळी पडले असतील. आपल्या मातीला जाणणारे, जोपासणारे,  राखणदाराचे इशारे ओळखणारे लोक अशा 'जंगल अपने बाप का है' म्हणत आपल्या पोशिंद्याच्या उरावर घाव घालणाऱ्यांच्या कटाचे बळी ठरत असतील. आणि त्यांचे बळी 'आत्महत्या' ठरवून शहरात बसून वर्तमान पत्रात ती बातमी वाचणाऱ्यांसाठी 'न्यू नॉर्मल' ठरवत असतील. विचार करून डोकं चक्रावून जातं. ज्याचं म्हणणं ऐकून घेतलं जातं नाही, ज्याच्या न्यायाच्या साध्या अपेक्षेला धुडकवून लावलं जातं तो हाती शस्त्र उचलतो. लडाखमध्ये तेच झालं. अशा प्रकरणात पुढे जे घडतं, इतिहासातही जे घडून गेलं आहे आणि वेळीच सावध झालो नाही तर भविष्यात जे घडू शकतं  ते म्हणजे 'दशावतार'.

माणूस आणि माणसातल्या राक्षसी महत्त्वाकांक्षेतील संघर्ष म्हणजे 'दशावतार'  देवेंद्र गोलतकर या सिनेमेटोगाफरने टिपलेल्या हिरव्याकंच रानाचो आणि लाल मात्येचो कोकणातलो ‘दशावतार’. भरत जाधव, रवी काळे, सुनील तावडे, लोकेश मित्तल, अभिनय बेर्डे यांच्या ताकदीच्या अभिनयातून आलेल्या सिंडीकेटवर उलटलेला ‘दशावतार’. महेश मांजरेकर यांच्या इन्स्पेक्टर मायकेल डीकास्टाने ओळखलेला ‘दशावतार’. ए. व्ही. प्रफुलचंद्र यांच्या संगीतातून ज्याची 'रंगपुजा' अजय गोगावाले च्या आवाजातून बांधली जाते तो दशवतात, ओंकारस्वरूप आणि स्वत: दिलीप प्रभावळकर यांच्या आवाजातील 'आवशीचो घो' म्हणत कोकण आणि तिथली माणसं टिपत निसर्गाचा उत्सव साजरा करतो तो दशावतार. आणि गुरू ठाकूरच्या संवादातून प्रवाहित होत राहतो दशावतार.          

‘कांतारा’नंतर आलेल्या या ‘दशावतारा’ने ‘रानमाणूस’ प्रसाद गावडे, ऍड. गिरीश राउत, सोनम वांगचुक यांच्यासह सर्व पर्यावरण अभ्यासक जे सांगतात ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही पर्यावरण, निसर्ग  आणि मानवी जीवन संबंधावर झालेलं हे अतिक्रमण थांबणार आहे की नाही, केव्हा आणि कसं थांबणार, जगभरातील सिंडिकेटना आळा कसा घालणार असे अनेक अनुत्तरित प्रश्न उभे करणारा हा 'दशावतार' आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, ‘माझी दहा भाषणं जे काम करतात ते शाहिराचं एक गाणं करतं.’ या कलाकृतीनेही असाच परिणाम साधला जाऊन हा नको असलेल्या विकासाविरोधातला लढा तीव्र होईल अशी आशा करूया.

---- विनिशा धामणकर