गुढीपाडव्याच्या सभेपासून राज ठाकरे यांनी त्यांच्या आवडत्या वृत्तवाहिन्या या माध्यमातला आपला टीआरपी सतत वरचा ठेवलाय तो आजतगायत. लगोलग त्यांनी हेही स्पष्ट केलंय की हे आंदोलन मर्यादित कालावधीसाठी नाही. भोंगे उतरवेपर्यंत चालूच राहणार. त्यांना डेसिबलचा मुद्दा अव्यवहार्य वाटतो. दिवसातून पाच वेळा अशी वर्षभर अजान लाऊडस्पीकरवरून देण्यासच त्यांचा विरोध आहे! राज्य सरकार याबाबत केंद्राने धोरण ठरवावे असं म्हणून डेसिबल मर्यादेसह भोंग्याना परवानगी देतेय. नवनवीन अर्ज येताहेत. परवानगी वर्षभरासाठी मिळते. राज ठाकरेंचा त्यालाही विरोध.
परवानगी रोजची रोज द्या! कारण आम्हाला म्हणजे बिगर मुसलमानांना (यात हिंदूंसह ख्रिस्ती, शिख, बौध्द, पारसी असे इतर सर्व धर्म आले) तुम्ही नैमितिक परवानगी देता. मग तोच कायदा त्यांनाही लावा. शिवाय त्यांचं असंही म्हणणं आहे की ज्या काही मशिदी आहेत त्यातल्या निम्म्याहून अधिक मशिदी अनधिकृत आहेत. तर अनधिकृत मशिदींना अधिकृत परवानगी कशी देतात पोलिस? या मशिदीतून अनेक गैरव्यवहार व देशविरोधी गोष्टी चालतात असा एका अंत:स्थ सूत्राचा हवाला देत मुंब्रा या मुस्लिमबहुल शहराबद्दल त्यांनी आरोप केला. जो तिथले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आव्हान देत खोडून काढला. पण इथे राज ठाकरे संघनीतिप्रमाणे वागले व संशय पेरून ठेवला!
यावर पुन्हा चर्वितचरण, कोर्टबाजी, सरकारी बैठका, समित्या, पोलिसांचे अहवाल, स्थानिक प्रशासनाचे अहवाल आणि यावर वृत्तवाहिन्यांची अज्ञानी बडबड, अतिरेकी घिसाडघाई आणि बातमी पुनरावृत्तीचे नवनवीन विक्रम!
तोवर पावसाळा व हिंदू सणासुदींचे दिवस येतील. यंदाची रामनवमी व हनुमान जयंतीचा नजारा पहाता रक्षाबंधन, नागपंचमीसह वटपौर्णिमेचेही इव्हेंट होतील. पुढे दहिहंडी व गणपती तर हक्काचेच! याच धार्मिक - कम - सामाजिक वातावरणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या तर मग काय विचारूच नका!
आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात राज ठाकरे या निवडणुकांबाबत काय भूमिका घेतात हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. कारण राजसाहेब निवडणुकांबाबत मोदी - शहांच्या अगदी उलट स्वभावाचे आहेत. मोदी - शहांना तर निवडणुका म्हणजे 20-20 चा थरार वाटतो तर राजसाहेबांना वाटतं जेव्हा बघावं तेव्हा निवडणुकींचा हंगाम हे काही बरोबर नाही. त्यामुळे ते अचानक निवडणूक न लढवण्याचं अथवा ऐनवेळी उमेदवार माघारी बोलवून उमेदवारासह पक्षालाही सरप्राईज देतात. सध्या मनसे भाजप युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. पण ती होईल ही शक्यता केंद्रीय नेतृत्वाचा कल पाहता अशक्य वाटते. आत्ताच त्यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपतूनच जाहीर विरोध होतोय. उत्तर प्रदेशातील निवडणूक नुकतीच झालीय व २०२४ ला तसा अजून अवकाश आहे. अयोध्येत राममंदिर उभारणीचे काम चालू आहे. तिथे आत्ता राज ठाकरे जाऊन काय करणार नेमकं? अयोध्येत जाऊन काय सिध्द करू पाहताहेत राजसाहेब? का त्यांना वाटतंय त्यामुळे मुंबई महापालिकेत उत्तर प्रदेशी, बिहारी मनसेला मतदान करतील? किंवा भाजपवर युतीसाठी दबाव वाढेल?
आता थोडं मागे जाऊन पुढे येऊया. मनसे स्थापन झाली तेव्हा राजसाहेबांनी सेनेने भाजपसह युती करून हिंदुत्वाला प्राधान्य देत मराठी माणसांचें प्रश्न मागे टाकले असं म्हणून तेव्हा मनसेने पुन्हा मराठी माणसासाठी आवाज उठवत, सेनेला खिंडीत गाठत लक्षणीय विजय मिळवले.
आज तेच राज ठाकरे सेनेला तुम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या भुरट्या सेक्युलरवाद्यांच्या मांडीला मांडी लावून भाजपला व हिंदुत्वालाही सोडलंत म्हणून बोल लावत स्वत:च हिंदूजननायक म्हणून पुढे सरसावलेत! जर सेनेने हिंदुत्वासाठी मराठी माणूस व त्याचे प्रश्न बाजूला ठेवले असतील तर तेच कार्य आता राज ठाकरे कसं काय करणार? मराठी व हिंदुत्वाची तलवार एकाच म्यानात कशा ठेवणार? की जे सेना सोडते ते मनसे धरते असं काही आहे का?
ज्या ठाकरे बंधूंनी एकत्र यावं व महाराष्ट्राला कॉंग्रेस, राष्ट्रवादी व भाजप यांच्या शिवायच पण मराठी बहुजनांचं हिंदुत्व असलेलं सरकार द्यावं अशा आशेवर बसलेल्या महाराष्ट्राला आज काय दिसतंय तर कॉंग्रेस राष्ट्रवादी एका भावाला तर भाजप दुसऱ्या भावाला बकअप करीत या दोघातच कुस्ती लाऊन देऊन मोकळे झालेत!
आता ही कुस्ती कुणी जिंकलं, हरलं तरी इतर तिघांना काडीचाही फरक पडणार नाही. कुस्ती निकाली लागली तर जो कुणी विजयी ठाकरे असेल त्याला कुणाचा तरी खांदा लागेलच; आणि समजा कुस्ती अनिर्णित राहिली तरी नुकसान खेळणारांचेच होणार!
शेवटी उर्वरित तिन्ही पक्ष दोघा भावांना एक रिंगण आखून देत म्हणतील, बसा तुम्ही खेळत, आम्ही आलटून पालटून सत्ताधारी व विरोधी हा खेळ खेळतो. अशा वेळी राज ठाकरे काय करतील? ते वैतागून म्हणतील, “अरे याच्याशी कुस्त्या खेळून कंटाळूनच तर मी शिवसेना सोडली ना? मग आता परत इतक्या वर्षांनी हाच माझ्या वाट्याला यावा? हा शिवसेना अध्यक्ष झाला, हा युती करणारा, तोडणारा झाला, हा महाविकास आघाडीत शिरून थेट मुख्यमंत्रीही झाला. आता याला हरवून या उर्वरित तिघांना सत्तेचं ताट वाढून देऊ?”
फिर मेरा नंबर कब आएगा?
त्यापेक्षा आपलं गप्पाष्टक रंगवणं, सिनेमे पहाणं, अधून मधून व्यंगचित्रं काढणे, वाटलंच तर झेंडा बदलून बघणे, विचारांची व निशाणीची दिशा बदलणे आणि अधूनमधून दौरे करत जाहीर सभांचे फड लावणे व करीज्मॅटिक लिडर ही प्रतिमा जपत राज ठाकरे नावाचे वलय अग्निहोत्रासारखं कायम प्रज्वलित ठेवणे हे उत्तम!
(एमएसईबीवाले जसे मागच्या मे महिन्यात तुम्ही किती वीज वापरलीत त्यावर आधारित चालू वर्षीच्या मे च्या बिलाचे अंकगणित मांडतात, तसा हा पूर्वानुभवावर आधारित एक राजकीय पण सामाजिक अभ्यास.)
संजय
पवार
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.