आज हयात असणाऱ्या प्रत्येक माणसाचं एक भविष्य तर असणारच आहे

पण ते भविष्य पर्यावरणाच्या ऱ्हासाने लिप्त असू नये म्हणून इथल्या मध्यमवयीन किंवा प्रौढ माणसांपेक्षा इथली तरुण पिढी अधिक जागृत आहे असं गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्याला दिसत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास हा जागतिक पातळीवर होत आहे आणि मुंबई यात अग्रभागी आहे कारण इथे पर्यावरणाच्या बाबतीत असलेली शासकीय उदासीनता. ही उदासीनता समोर आली ती मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडच्या जागेच्या प्रश्नावरून. ही कारशेड आरेच्या अत्यंत सुपीक, झाडांनी वेढलेल्या आणि जैव विविधतेने नटलेल्या जंगलात करू नये म्हणून पर्यावरण प्रेमी आणि तज्ञांनी वारंवार सरकारला सांगितलं, मोर्चे काढले. या आधीचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वत: या आंदोलनात भाग घेऊन ही मेट्रो कारशेड आरे मध्ये करता त्यासाठी कांजुरमार्गमध्ये जागा मिळवण्यासाठी हालचाली केल्या. त्यामुळे ही कारशेड आता आरे मध्ये तरी होणार नाही असं चित्र निर्माण झालं. पण ठाकरे सरकार सत्तेतून पायउतार झाल्यावर शिंदे सरकारने पहिला निर्णय कोणता घेतला असेल तर तो आरे मध्येच कारशेड करण्याचा. अर्थातच याला विरोध होत आहे. यासाठी तरुणांना जागतिक स्तरावर जागृत करणाऱ्या ग्रेटा थनबर्ग यांच्या फ्रायडेज फॉर फ्युचर ह्या संस्थेच्या मुंबईतील कार्यकर्त्यांनी २४ सप्टेंबर २०२२ रोजी दादरच्या वीर कोतवाल मैदान ते चैत्यभूमी असा मोर्चा काढला. त्याला तरुणांचा आणि आरे मधील रहिवाशांचा, तिथल्या कोळ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.



खरं तर फ्रायडेज फॉर फ्युचरने हा मोर्चा केवळ आरे कारशेडच्या विरोधात नाही तर एकूणच कॉंक्रीटीकरण, वातानुकूलन, रस्त्यांची लांबी अनावश्यक रित्या वाढवण्यासाठी झाडांची कत्तल करणे, जंगलांची कत्तल, जैवव्यवस्थेवर हल्ला करणे या विरोधात होता. समुद्र किनारे, जंगलं, खारफुटीची जंगलं नष्ट करणं ही नष्ट करून जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा अति वापर, कॉंक्रीट बनवणाऱ्या कंपन्यांना प्राधान्य दिलं जात आहे. हे होत असताना लोकांच्या आणि पर्यावरांच्या भवितव्याचा विचार केला जात नाही. २०५० पर्यंत मुंबईतील अनेक भाग बुडतील अशी धोक्याची सूचना देऊन सुद्धा कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही उलट अधिक ऱ्हासाच्या जवळच आपण चाललो आहोत.

आरेतील जंगलाचा ऱ्हास झाला तर फक्त तिथे राहणाऱ्या आदिवासींनाच त्याचा फटका बसेल असं जर कोणाला वाटत असेल तर ते चूक आहे. कारण ह्या ऱ्हासामुळे संपूर्ण जैव सृष्टीवर परिणाम होणार आहे,” असं मनीषा दिंडे या एका आदिवासी विद्यार्थी मैत्रिणीने सांगितलं.  



ह्या मोर्च्यानंतर फ्रायडेज फॉर फ्युचरने ऑक्टोबर या महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनीनफरत छोडो, संविधान बचाओहा मोर्चा ऑगस्ट क्रांती मैदान ते मंत्रालयाच्या जवळील महात्मा गांधी मैदान इथपर्यंत काढला. आज देशात होत असलेल्या जातीय, धार्मिक द्वेष पसरवण्याच्या कामाला रोकण्यासाठी हा मोर्चा होता. पर्यावरणावर आघात करण्याचा प्रकार हा काही धनवन्तांची तुंबडी भरण्यासाठी केलेला कट आहे. यासाठी छत्तीसगड मधील हसदेव हे जंगल अदानी यांच्या खाणीसाठी  संपवलं जात आहे. एकूणच सामान्य माणसाशी निगडीत असणाऱ्या गोष्टींना डावलून त्यांना संपवण्याचा प्रयत्न जो सध्या सुरु आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं फ्रायडेज फॉर फ्युचरने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

निसर्गची आर्त हाक तरुणांनी तर ऐकली पण ह्या तरुणांचा हा आक्रोश सरकारच्या कानावर पडेलच आणि पडलाच तर त्याला तितक्याच गांभीर्याने घेतलं जाईलच हे सांगता येत नाही. त्यामुळे आता जनरेटाच तयार झाला पाहिजे आणि त्यासाठी सामान्य जनतेनेच गांभीर्याने विचार केला पाहिजे.