आयुष्य हे अनेक घडामोडीं टिपून ठेवणारी एक वही आहे असं म्हटलं तर त्यातील अक्षरं, त्यातील ओळी कालांतराने एकमेकात गुंतून जातात. आयुष्याचा हा गुंताडा एखाद्या जंगला सारखा असतो. एखाद्या धाग्याच्या किंवा अगदी केसांच्या गुंत्यातून दुसरी एखादी वस्तू जात नाही. आयुष्यातील बऱ्या वाईट घटनांच्या गुंत्यातून सुद्धा चांगलं असं काही झिरपतच नाही. जे निबिड आयुष्य वाट्याला आलं आहे तेच आपलं विधिलिखित आहे असं समजून आपण जगू लागतो आणि अधिकाधिक दुःखाच्या गर्तेत ओढले जातो. त्यात काही चांगलं घडलं तरी मनाला उभारी मिळत नाही. दु:ख आणि ते सहन करण्याची कमावलेली ताकद यामुळे आपण स्वत:चंच स्वत:शी गौरवीकरण करू लागतो.
माझ्या आयुष्यात इतकं दु:ख आहे तरीही मी कशी ठाम उभी किंवा उभा आहे पहा, असं अभिमानाने सांगतो. पण यातून बाहेर पडण्याचे मार्ग मात्र आपण शोधत नाही. किंबहुना जे मार्ग शोधले जातात ते पुरेसे नसतात; आणि पुरेसे असले तरी ते आपल्याला पटतीलच असंही नाही. त्यामुळे हे आयुष्य रेतीप्रमाणे सरत गेलं तरी आपण मात्र त्या वेदनेच्या सेलिब्रेशनमध्येच गुंतलेले असतो. हे निबिड अरण्य नको असं वाटत असलं तरी प्रकाश पोहोचत नसलेल्या आणि कोणतीच नव निर्मिती होत नसलेल्या सावलीच्या सावटाला आपण बिलगून राहतो!
पण कुठेतरी जाणीव असते प्रकाशाची! सर्व जगाला दीप्यमान करणाऱ्या सूर्याची ओढ आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. सावटच तर आहे, मनात आणलं तर लीलया दूर करू अशी ग्वाही आपलं मनच आपल्याला देत असतं. म्हणूनच त्या सावटाला दूर करण्यासाठी तेज:पुंजाची आराधना करू लागतो.
असं म्हणतात की आपल्या जन्माच्या वेळी आपल्या कपाळावर सटवीने आपले भोग लिहिलेले असतात. पुढे आयुष्याच्या गुंतागुतीमुळे तिथे निबिड जाळं निर्माण झालेलं असतं. म्हणून ह्या कवितेत सूर्याची आराधना करताना “निबिड रेघा पुसून टाक, नवं कोरं भाळ दे,” असं म्हटलं आहे. यासोबतच ते भयावह आणि कारागृह वाटावं असं जंगल नको; तर डवरलेला माळ कवियत्री मागते आहे. यासोबतच उदासीन आयुष्यात चैतन्य येण्यासाठी “बहरलेली सकाळ” मागते आहे. सूर्याच्या एका किरणाने सुद्धा ह्या निबिड रेघा पुसून जातील आणि ते भाळ लखलखीत होईल, आपलं भविष्य आपण लिहिण्यासाठी याची ग्वाही ही छोटीशी कविता देते.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.