Article by Sunil Bansode



भाकरीचे प्रकार भाकरी खाण्याचे फायदे !

बाजरीमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस सारखे अनेक पोषक घटक असतात. थंडीच्या दिवसात सगळ्यांनी बाजरीची भाकरी खाल्ली पाहिजे. बाजरी हिवाळ्यात शरीर उबदार ठेवते. शारीरीक कष्टाची कामे करणाऱ्या लोकांसाठी बाजरी हा मुख्य आहार आहे.

बाजरी कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो. याशिवाय बाजरी मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. जर आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत असाल तर बाजरीची भाकरी खाणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. बाजरीची भाकरी खाल्ल्यानंतर फार काळ भूक लागत नाही. बाजरी वजन नियंत्रित करण्यास मदत करते.

ज्वारीची भाकरी शरीरासाठी अतिशय पौष्टीक असून बाजरीच्या तुलनेत शीत (थंड) गुणाची, पचावयास हलकी असते. यात कर्बोदके, प्रथिने तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे ज्वारीची भाकरी ऊर्जादायी ठरते. ज्वारीची भाकरी पचनक्रिया सुरळीत ठेवते बद्धकोष्ठाचा त्रास कमी करते म्हणून सर्व प्रकारच्या पोटाच्या आजारात गुणकारी आहे. यातील तंतुमय पदार्थ अँटीऑक्सिडेंटमुळे लठ्ठपणा, रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे सोपे जाते. नियमित आहारात ज्वारीची भाकरी घेतल्याने शरीरात अतिरिक्त चरबी (मेद) साठत नाही. ज्यांना वजन कमी करण्याची ईच्छा आहे त्यांनी तर रोज जेवणात ज्वारीचा समावेश करावा. हाडांची मजबुतीवर गुणकारी आहे. ज्वारी बाजरी एकत्र करून हिवाळ्यात भाकरी खावी.



आहारात वेगळेपणा आणण्यासाठी आहार जास्त पोषक बनवण्यासाठी ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, उडीद मेथी यांचे पीठ बनवून मिश्र पिठाची भाकरी करावी. भाकरी कोणत्याही धान्याची असो, ती पचायला हलकी, पौष्टिक, ऊर्जादायी असते. अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा समावेश असल्यामुळे भाकरी आरोग्यदायी ठरते. भाकरीचा समावेश आहारात कोणत्याही वेळी करू शकता. विशेषत: रात्री भाकरी खाल्ल्याने शरीराला फायदा होतो. न्याहारीला दूध भाकरी किंवा गूळ, तूप, भाकरी खावी, तर जेवणात भाकरी सोबत एखादी पातळ फळभाजी त्याबरोबर ताकाचा समावेश करावा. रात्रीच्या जेवणात पचायला हलकी असल्यामुळे दूध-भाकरी, भाकरी लोणी खावे. याने पचन सुधारते, पोट साफ होण्यास मदत होते रात्री शांत झोप लागते. अपचन होत नाही. अम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी तर नियमित वातावरणानुसार भाकरी खावी. प्रत्येकाने आपल्या प्रकृती नुसार विविध प्रकारच्या भाकर्यांचा आहारात समावेश करावा.

नाचणी थंड असल्यामुळे तिचा समावेश उन्हाळ्यात केला पाहिजे. नाचणी पचायला हलकी असते ऊर्जादायी असते. नाचणीत कर्बोदके, प्रथिने, तंतुमय पदार्थ असतात मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते. यामुळे नाचणीचा समावेश आहारात भाकरी म्हणून खावी किंवा लहान ज्येष्ठांनी त्याचे सत्त्व खावे.

तांदळाची भाकरी पौष्टीक असून शरीरात थंडावा निर्माण करते. त्वचेच्या समस्येवरील रामबाण उपाय म्हणजे तांदळाच्या पिठाची भाकरी. तांदळाचे पीठ हा एक असा उपाय आहे ज्याची भाकरी नियमित खाल्ल्याने त्वचेचे कोणतेही विकार होत नाहीत. तांदळाच्या पिठाची भाकरी खाल्ल्यास मुरुमांवर फायदा होतो. तांदळाच्या पिठात एक चमचा मध आणि कोरफडीचा गर मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट मुरुमांवर लावा. काही दिवसांतच फरक जाणवेल. डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी तांदळाच्या दोन चमचे पिठात पिकलेले अर्धे केळे आणि एक चमचा साय घालून ते मिश्रण एकजीव करा. हे मिश्रण डोळ्यांच्या खाली लावल्यास फायदा होईल. चेहर्यावरील टॅनिंग दूर करायचे असेल तर तांदळाच्या पिठात लिंबाचा थोडा रस मिसळून त्याची पेस्ट तयार करा. टॅनिंग झालेल्या भागावर ती लावा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.


लेखक - सुनील बनसोडे