डॉ. उषा रामवाणी - गायकवाड यांच्या ग्रंथ प्रकाशन प्रसंगी गौरवोद्गार

कोणत्याही समाजात मुलीने लग्न करून सासरी जावं आणि तिने सासरच्या लोकांची सेवा करावी अशीच अपेक्षा केली जाते. सिंधी समाजातही काही वेगळी अवस्था नाही. उषाला मात्र शिक्षणाची गोडी लागली होती. तिने बी.ए. केलं आणि तिने पी.एच.डी करण्याचा निर्णय घेतला तिथून सर्व गोष्टी तिच्या आयुष्यात बदलू लागल्या किंबहुना बिघडू लागल्या. ह्या काळातील तिचा संघर्ष फार मोठा होता. त्याच संघर्षाची गाथा म्हणजे तिचं ‘निर्वासित’ हे आत्मचरित्र आहे, अशा शब्दात ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला पवार यांनी गौरवोद्गार काढले. त्या डॉ. उषा रामवाणी - गायकवाड लिखित ‘निर्वासित’ ह्या आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभात बोलत होत्या. दि. 1 जून २०२३ रोजी मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरातील पु. ल. देशपांडे सभागृहात हा समारंभ पार पडला.

उषा ह्या मूळच्या सिंधी समाजातील असूनही त्यांचं मराठी अत्यंत उत्तम आहे. त्यांनी अनेक ग्रंथांसाठी मुद्रित शोधनाचं काम केलं आहे. आपल्या आयुष्यात त्यांना अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागलं.. ‘माझं मराठीपण कोणी समजून घेतलं नाही. कदाचित मी मराठी माणसापेक्षाही अधिक मराठी होते,’ अशा शब्दात आपल्या भावना ह्या ग्रंथात व्यक्त करणाऱ्या डॉ. उषा रामवाणी - गायकवाड ह्यांचं ‘निर्वासित’ हे आत्मकथन एका सिंधी स्त्रीने लिहिलेलं मराठीतील पाहिलं आत्मकथन आहे, असे गौरवोद्गार उर्मिला पवार यांनी काढले.



डॉ. उषा रामवाणी - गायकवाड यांच्या उष:काल प्रकाशनातर्फे झालेल्या ह्या कार्यक्रमाला विचारमंचावर मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, ज्येष्ठ लेखिका उर्मिला पवार, मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. वंदना महाजन आणि प्रख्यात अभिनेत्री चिन्मयी सुमित उपस्थित होते. युवक बिरादरीचे संचालक पद्मश्री क्रांती शहा हे ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विचारमंचावर उपस्थित होते.

ह्या कार्यक्रमाला संबोधित करताना डॉ. वंदना महाजन यांनी मराठी साहित्यातील स्त्री आत्मकथनाच्या परंपरेचा गोषवारा घेताना स्त्री साहित्याच्या सुरुवातीला लक्ष्मीबाई टिळकांप्रमाणे पतीविषयी लिहिण्याची पद्धत होती; पुढे दलित स्त्री साहित्यिकांनी समाजाविषयी आणि त्याच्या संघर्षाविषयी लिहिलं. डॉ. उषा रामवाणी गायकवाड यांनी मात्र आपल्या आत्मकथनात स्वत:च्या संघर्षाविषयी लिहिलं आहे त्यामुळे हा ग्रंथ वाचताना मला फार अस्वस्थ वाटलं, सर्वार्थाने एकाकी असणाऱ्या स्त्रीचं हे आत्मकथन असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं. यासोबतच आत्मकथन लिहिताना स्त्रियांवर वास्तव समोर ठेवण्याचं मोठं दडपण असतं. असं असलं तरी ह्या आत्मकथनात त्यांच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींची खरी नावे द्यायला हवी होती अशी सूचनाही डॉ. वंदना महाजन यांनी केली. चिन्मयी सुमित यांनी आपल्या संबोधनात ‘निर्वासित’ हे अत्यंत प्रांजळ आत्मकथन असल्याचं म्हटलं.

नरेंद्र वाबळे यांनी डॉ. उषा रामवाणी गायकवाड यांच्या संघर्षाचे हे आत्मकथन नक्कीच लोकप्रिय होईल अशा सदिच्छा व्यक्त केल्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात पद्मश्री क्रांती शहा यांनी डॉ. उषा यांच्या संपूर्ण कारकीर्दीचा आढावा घेताना त्यांना लोकांच्या अवहेलनेला कसं सामोरं जावं लागलं हे सांगून समाजाने संकुचित विचारसरणीतून आता बाहेर यायला हवं, असं म्हटलं. त्यांनीही ‘निर्वासित’ हे आत्मकथन लोकप्रिय होईल अशा सदिच्छा दिल्या.

ह्या कार्यक्रमाला प्रेक्षकात मीना गोखले, डॉ. शारदा तुंगार, प्रा. आशालता कांबळे, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार पाटील, नमिता कीर (को. म. सा. प.) आणि इतर मान्यवरांसह उषा रामवाणी - गायकवाड यांची मुलगी तेजस्विनी गायकवाड आणि त्यांच्या शहापूर स्थित गणपत विठुजी खाडे विद्यालयातील बालपणीचे मित्र मैत्रिणी आवर्जून उपस्थित होते. सर्व मान्यवरांचं स्वागत उषा रामवाणी गायकवाड यांचे पती दीपक गायकवाड यांनी केलं तर समीक्षक रविप्रकाश कुलकर्णी यांनी अगदी ओघवत्या शैलीत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.

'निर्वासित' हे डॉ. उषा रामवाणी - गायकवाड लिखित पुस्तक उष:काल पब्लिकेशनने प्रकाशित केलं आहे. ४३० पानांच्या ह्या पुस्तकाची किमत रुपये ४००/-आहे. हे पुस्तक मिळवण्यासाठी 7४९८३८०४०३ ह्या क्रमांकावर संपर्क साधावा.   

To get this Book do contact Dr. Usha Ramvani-Gaikwad on  7498380403