पेहेलवान मुलींना पाठींबा देण्याऐवजी भारतरत्न सचिन चोळतोय जखमेवर मीठ

एकीकडे देशासाठी ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये पदक पटकावलेल्या पेहेलवान मुली आपल्याला न्याय मिळणारच नाही ह्या निराशेतून आपली पदकं गंगेत विसर्जित करण्यासाठी निघाल्या होत्या, त्या वेळी इकडे महाराष्ट्रात क्रिकेटचा देव सचिन तेडुलकर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या स्वच्छ मुख अभियानाचा स्माईल अॅम्बेसेडर म्हणजे हास्य राजदूत म्हणून पाच वर्षांसाठी करार करत होता. हे अत्यंत निराशाजनक चित्र आहे. खरं तर सचिनने एक खेळाडू म्हणून या मुलींच्या आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सर्वच खेळाडूंच्या मागे उभं राहायला हवं होतं. पण उलट तोच भाजप सरकारच्या आदेशावरून दिल्लीत जंतरमंतर वर पोलिसांनी केलेल्या मुलींच्या छळाला, घृणास्पद कृत्याला मूक संमती देतो आहे असंच चित्र आज दिसलं. कोणी काही करा, आम्हाला काही फरक पडत नाही अशा सचिनच्या आजच्या भूमिकेचा इतिवृत्त निषेध करीत आहे.

खरं तर विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या सह देशातील अन्य पहिल्या फळीचे पेहेलवान आंदोलन करत असताना देशातील सर्व खेळाडूंकडून त्यांना पाठींबा मिळायला हवा होता. तसं न होता उलट क्रिकेटचे आयपीएल सामने मोठ्या झोकात सुरु आहेत. ज्यांच्यावर लोकांनी प्रेम केलं, ज्यांच्या चित्रपटांवर लोकांनी प्रेम केलं असे महेंद्रसिंग धोनी सारखे खेळाडू सुद्धा आयपीएलमध्ये दंग आहे. पेहेलवान मुली आंदोलन करत असताना एक वेळ जाऊ द्या पण काल जंतरमंतर इथे झालेल्या प्रकारानंतर तरी निषेधाचे चार शब्द ह्या क्रिकेटवीरांकडून यायला हवे होते. पण तसं काही झालं नाही. उलट सचिन सारखा देव ह्या सर्व प्रकारावर स्माईल अॅम्बेसेडर म्हणून दात काढून हसतोय की काय असं वाटायला लागलं आहे. सचिनच्या हास्यात मीठ आहे आणि हे निर्दयी सरकार ते न्याय मागणाऱ्यांच्या जखमेवर चोळतं आहे हेच या प्रकारावरून दिसून येतं. नाहीतर इंडियन डेंटल असोसिएशनला आत्ताच लोकांनी तोंडाचे स्वास्थ्य जपण्यासाठी, तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी मोहीम आखण्याची काय गरज होती. सचिन जर खरंच आपल्या खेळाडूंचा हितचिंतक असता तर त्याने ह्या मोहिमेचा अॅम्बेसेडर बनायला नकार दिला असता. पण त्याने तसं न करता उलट ही मोहीम हसत हसत स्वीकारली. निषेध निषेध निषेध! त्रिवार निषेध!!!



ही मोहीम आणि पेहेलवान मुलींचं आंदोलन, त्यांचा छळ ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. असं कोणीही म्हणेल. पण सरकारने आणि डेंटल असोसिएशनने साधलेली ही वेळ खचितच योग्य नाही. मी मोहीम पुढे ढकलल्याने लोकांना आता लगेच काही तोंडाचे आजार होणार नव्हते.

सरकार आणि डेंटल असोसिएशनला लोकांच्या तोंडाच्या स्वास्थ्याची जर खरंच काळजी असेल तर त्यांनी आधी बाजारात अवैधरित्या विकला जाणारा गुटखा मोठ्या प्रमाणावर पकड मोहीम राबवून हस्तगत करावा. आणि सर्वात आधी त्या विमल पान मसाल्या सारख्या गुटख्याच्या जाहिराती करणाऱ्या कंपन्या आणि त्यांचे तथाकथित ब्रांड अॅम्बेसेडर असणाऱ्या अक्षय कुमार, अजय देवगन आणि शाहरुख खान यांच्या वर कारवाई करावी. जिथे पाणी मुरत आहे तिथे न खोदता भलतीकडेच खोदल्याने तिथे फक्त खड्डाच पडेल, हाती काही लागणार नाही. अशा कृत्यांनाच आपण दुटप्पी धोरण म्हणतो.



जनतेची स्मृती फार कमी असते असा विचार करूनच कदाचित आज सचिनला सरकार आणि डेंटल असोसिएशनने पाच वर्षांसाठी स्माईल अॅम्बेसेडर केलं असेल. कारण सचिनने कोणत्या परिस्थितीत ह्या करारावर सह्या केल्या होत्या हे काही दिवसात लोक विसरूनही जातील. पण काही जखमा बऱ्या झाल्या तरी त्याचे व्रण राहतात हे सचिनला तरी चांगलंच माहित असेल. सचिन किंवा इतर खेळाडू कोणत्या तरी दबावाखाली आपला पाठींबा पेहेलावानांना अजून देत नसतील तर तेही पुढील काळात कळेल. आज मात्र सचिनचं कृत्य निषेधार्ह आहे. एवढं नक्की.