रायगड जिह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील कुसूमादेवी मंदीर मार्गावर राहणा-या शशांक केळस्कर यांच्या घराच्या परिसरात ८ फुट लांबीचा अजगर अढळून आला.  त्याने खुराड्यातील  3 कोंबड्या आणि 2 बदकांना गिळले.

 या ठिकाणी सुहास गुरव यांनी कुक्कूट पालन करून गावठी अंडी विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. काही महिन्यांपासून त्यांनी या व्यवसायाला सुरूवात केली आहे. मोठयाप्रमाणात गावठी अंडी तयार करण्यासाठी प्रथम ते कोंबड्यांची पैदास करत आहेत. कोंबड्या ठेवण्यासाठी त्यांनी खास खुराडा बनवला आहे.

मात्र दि. 26 जुलै २०२३ रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास त्यांनी कोंबड्यांचा खुराडा उघडला असता त्यांना आतमध्ये सुमारे ८ फुट लांबीचा अजगर आढळून आला. त्याने ३ कोंबड्या आणि २ बदक गिळले होते. सर्पमित्र सुशांत भोसले यांना पाचारण केले. त्यांनी त्या आजगाराला कोणतीही इजा न करता नैसर्गिक आधिवासात सोडले.

या परिसरात या पूर्वी घराजवळ कधीही अजगर अढळून आला नव्हता. हा परिसर घनदाट जंगलाचा असून, या ठिकाणी हिरवी गर्द झाडी आहे. या परिसरात अनेक प्रकारच्या प्राणी आणि पक्षांचा अधिवास आहे. श्रीवर्धनच्या एका टोकाला असलेला हा परिसर निसर्ग आणि सृष्टी सौदर्यांने संपन्न आहे. पण निसर्ग वादळामुळे जसं इथल्या माणसांची घरं आणि आयुष्यं उद्ध्वस्त झाली तशीच जंगलात राहणाऱ्या जनावरांची घरं सुद्धा उद्ध्वस्त झाली. त्यानंतर माणसांनी तर आपली घरं पुन्हा उभारली पण जनावरं मात्र बेघरच राहिली. झाडं उन्मळून पडली, जंगलं बरबाद झाली. उन्हातलं घर उन्हातच राहिलं! म्हणूनच कदाचित ती सैरभैरही झाली. अशी बेघर आणि सैरभैर झालेली जनावरं अर्थातच मानवी वस्तीतच येऊ लागली आणि जंगलासारखं स्वैर जीवन इथंही जगता येईल असं बहुधा त्यांना वाटू लागलं. मग कोणत्याही झाडावर चढणं, कोणच्याही घरांच्या छपरांवरून उड्या मारत राहणं, घरात मोरीत शिरणं, उब मिळवण्यासाठी लाकडांमध्ये घुसून बसणं असले प्रकार समोर येऊ लागले. असं वागणं हे त्यांच्यासाठी नैसर्गिक असतं.  माणसाचं नियमात बांधलेलं जगणं मात्र यामुळे अस्ताव्यस्त होतं. वाघ, हरीण, हत्ती, माकडं, कोल्हे आणि अजगर असे अनेक प्राणी आपल्या नैसर्गिक अधिवासाच्या शोधात मानवी वस्तीत येतात पण त्यांच्या नैसर्गिक वावरण्याला आपण ‘धुडगूस घालणं’ हे नाव देतो.

आज श्रीवर्धनमधील ह्या घरात आलेला हा अजगर सुद्धा असाच आपल्या अधिवासाच्या किंवा अन्नाच्या शोधात आला असावा. भुकेला असावा. म्हणून त्याने कोंबड्या आणि बदकं खाल्ली. त्याच्या येण्याने लोकांची मात्र तारांबळ उडाली. ही तारांबळही योग्यच आहे. अजगर हा माणसाला गिळून वेटोळं घालून बसतो हे आपल्याल डोक्यात फिट असल्यामुळे ही भीती साहजिकच आहे. पुढे मागे असा अजगर किंवा अन्य हिंस्त्र प्राण्याच्या भक्ष्यस्थानी एखादा लहान मोठा माणूस पडण्याची शक्यता नाकारत येत नाही.  यावर उपाय म्हणजे आपण त्यांना त्यांचे अधिवास दिले पाहिजेत. ते त्यांच्या अधिवासात असतील तर तेही सुखरूप राहतील आणि माणसाच्या घरात माणूस सुद्धा. यासाठी आता प्रयत्न पूर्वक पावलं उचलली पाहिजेत. वन्य प्राणी आणि मानवाच्या बाबतीतील Co Existence म्हणजेच सह अस्तित्व म्हणजे दोघांनीही एकमेकांचा आदर करत ‘जिओ और जिने दो’ म्हणत दूर तरीही एकत्र जगणं असतं, हे समजून घेतलं पाहिजे.