विधानसभा अधिवेशन अपडेट -  पुण्याला आय टी सेक्टर म्हणून मान्यता मिळवून देणाऱ्या पिंपरी चिंचवडलाच विजेच्या खेळखंडोबा सहन करावा लागतो आहे. विजेच्या अनियमिततेमुळे इथल्या आय टी सेक्टर आणि विजेवर आधारित इतर उद्योगांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसतो आहे. नागरिकांचेही मोठे हाल होत आहेत. चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप (Ashwini Lakshman Jagtap) यांनी ही समस्या बुधवारी २६ जुलै रोजी विधानसभेत मांडली. पुण्यात ज्याप्रमाणे महावितरणचे स्वतंत्र वीज मंडळ आहे तसेच पिंपरी-चिंचवडलाही सुरु करण्याची मागणी त्यांनी विधानसभेत केली.

सोमवारी अधिवेशनात त्यांनी पुरवणी मागण्या हाउस समोर मांडल्या. मंगळवारी त्या  औचित्याच्या मुद्याव्दारे मुलभूत सोयीसुविधाही नसलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालया विषयी प्रश्न उपस्थित केला. बुधवारी औचित्याच्या मुद्याव्दारेच त्यांनी  चिंचवडच नाही तर भोसरी, पिंपरी विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराला भेडसावणाऱ्या वीजेच्या समस्येकडे सभागृहाचे म्हणजे सरकारचे लक्ष वेधले.

गेल्या मार्च महिन्याच्या शेवटी भोसरी परिसर दीड दिवस अंधारात राहिल्याने आमदार महेश लांडगे यांनी महावितरणच्या भोसरी विभागीय कार्यालयातील कर्मचारी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. तरी अजूनही पिंपरी चिंचवडचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. म्हणून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करताना अश्विनी जगताप  यांनी थेट महावितरणच्या वेगळ्या वीज मंडळाचीच मागणी केली आहे.



सध्या शहरातील महावितरणची भोसरी आणि पिंपरी विभागीय कार्यालये ही पुण्यातील गणेशखिंड मंडळ कार्यालयाच्या अखत्यारीत आहेत. पुण्यात वीज ग्राहकांमध्ये झपाट्याने वाढ होते आहे. त्यामुळे शहराला तीन विभागीय कार्यालयांची गरज असल्याचे त्यांनी विधानसभेत सांगितले. अशा तीन कार्यालयांसाठी मंडळ कार्यालय असते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसाठीही ते पुण्यातील कसबा पेठ आणि गणेशखिंडच्या धर्तीवर सुरु करण्याची मागणी त्यांनी केली.

तसेच शहरातील वीज यंत्रणेच्या पायाभूत सुविधांसाठी निधी देण्याची मागणीही त्यांनी केली. पिंपरी-चिंचवडकरांना वीजेच्या समस्या सोडविण्याकरिता वारंवार पुणे येथील मंडल कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. म्हणून शहरासाठी या कार्यालयाची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आता त्यांची ही मागाणी किती तत्परतेने सरकार तडीस नेते आणि पिंपरी चिंचवडकरांच्या दैनंदिन जीवनातला अंधार  कधी दूर होतो ते पाहायचं.