मानसिक स्थैर्य मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला तरी जोवर मन, मेंदू अस्थिर होण्याची कारणं दूर होत नाहीत तोवर ते मानसिक स्थैर्य मिळत नाही. 

असं असलं तरी काही वेळा ती अस्थिरतेची कारणं दूर करणं आपल्या हातात अजिबातच नसतं तेव्हा आपण मानसिक स्थैर्य मिळवण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करणं हेच आवश्यक असतं.  

मानसिक स्थैय मिळवणं ही साधी बाब नाही. ही एक साधना आहे. यासाठी तुमच्यासोबत झालेल्या प्रत्येक अन्यायाच्या क्षणांना तुम्हाला स्मरण परिघाच्या बाहेर फेकावं लागतं. नाहीतर त्या स्मृती मार बनून सतत तुमच्या मनावर हल्ले करतात. हे हल्ले थोपवणं तेव्हाच शक्य होतं जेव्हा तुमच्या मनाचा निर्धार पक्का असतो. चांगल्या वाईट दोन्ही प्रकारच्या गोष्टी जेव्हा घडायच्या तेव्हा घडतीलच पण त्या प्रत्येक प्रसंगाला सामोरे जायला आपण तयार आहोत का, आपलं मानसिक संतुलन त्या अटीतटीच्या क्षणी ढळणार तर नाही ना, याचा विचार आपण केला  पाहिजे. त्या प्रसंगांसाठी आपल्याला तयार ठेवण्यासाठी आपल्याला मानसिक स्थिरता महत्वाची असते. यामुळेच एखाद्या गंभीर क्षणी आपण योग्य विचार करून योग्य निर्णय घेऊ शकतो. मानसिक संतुलन बिघडू न देता योग्य निर्णय घेणं सर्वांना प्रत्येक वेळी शक्य होईलच, असं नाही. पण आपण पूर्ण निष्ठेने, सकारात्मकतेने आणि प्रामाणिकतेने आपलं प्रत्येक पाऊल उचलत आहोत याचं भान आपल्याला असलं पाहिजे.

त्या प्रत्येक वेळी आपल्याला हवा तसा प्रतिसादही आपल्याला मिळेलच असं नाही. अशावेळी सुद्धा मानसिक स्थैर्यच आपल्याला मदतीला येतं. हिऱ्याला पैलू पडताना त्याला किती वेदना होत असतील पण जोवर योग्य तो आकार मिळत नाही तोवर तो ते आघात सहन करतो. हे केवळ उपदेशपर भाषण नाही तर तेच सत्य आहे. मानसिक स्थैर्याला तुमचा मित्र बनवा, सगळं काही नीट होईल, चांगलं होईल अशी अशा बाळगा. जो ऐकतो समजतो त्याच्याशी बोला, जो समजून घेत नाही त्याच्याशी हुज्जत घालू नका. आपली उर्जा प्रयत्न पूर्वक चांगल्या कामात लावा. मनात येणाऱ्या वाईट कल्पनांना चांगल्या कल्पनांनी रिप्लेस करा. खड्डा पडला आहे आता त्यात माती पाणी पडून चिखल होत असेल तर त्यात झाड लावा. मनातील वृंदावन फुलून येईल. त्याची गोमटी फळेही चाखायला मिळतील. पण आधी त्या मानसिक स्थैर्य मिळविण्याच्या अग्निदिव्यातून जावंच लागेल. पर्याय नाही. लक्षात घ्या, याला पर्याय नाही.