उर्मिला पवार 

मोहनदास नैमिषराय 


संगितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका 'आयदान'कार उर्मिला पवार तर उद्घाटक म्हणून हिंदीतील ज्येष्ठ साहित्यिक मोहनदास नैमिशराय यांची निवड 

चिपळूण (प्रतिनिधी): 


कोकणातील अर्थात अपरान्त भूमीतील आंबेडकरी व पुरोगामी - परिवर्तनवादी साहित्यिकांचा, कलावंतांचा हक्काचा विचारमंच म्हणून ओळखल्या जाणार्‍या  'अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी' या संस्थेच्या वतीने दिनांक २७ व २८ जानेवारी २०२४ रोजी  'दुसऱ्या सम्यक साहित्य कला संगिती'चे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे करण्यात आले आहे. या संगितीच्या अध्यक्षस्थानी मराठीतील ज्येष्ठ साहित्यिका व आयदानकार उर्मिला पवार यांची तर संगीतीचे उद्घाटक म्हणून हिंदीतील जेष्ठ साहित्यिक, संपादक मोहनदास नैमिशराय (दिल्ली) यांची निवड करण्यात आली आहे.

अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी या संस्थेची मुंबईत नुकतीच सभा पार पडली. या सभेत वर्ष २०२४ मध्ये होणाऱ्या दुसऱ्या सम्यक साहित्य कला संगितीच्या नियोजनाबाबत निर्णय घेण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रबोधिनीचे अध्यक्ष व दलित पॅंथरचे सहसंस्थापक, ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक ज. वि. पवार होते. या बैठकीस प्रबोधिनीचे कार्याध्यक्ष प्रा.आनंद देवडेकर, सरचिटणीस सुनील हेतकर, उपाध्यक्ष प्रा. आशालता कांबळे, भावेश लोखंडे, प्रा. डॉ. संजय खैरे, सल्लागार रमाकांत जाधव, कार्यकारणी सदस्य अशोक चाफे, कायदेशीर सल्लागार अॅड.धम्मकिरण चन्ने, अंतर्गत हिशेब तपासणीस प्रदीप जाधव या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह इतर अनेक मान्यवर सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत दुसरी सम्यक साहित्य कला संगिती कणकवली येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले. ६ व ७ मे २०२३ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे पहिली सम्यक साहित्य कला संगिती मोठ्या उत्साहात पार पडली होती. जानेवारी २०२४ मध्ये दुसऱ्या सम्यक साहित्य कला संगितीचे आयोजन करण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेला मिळाला असून, त्याचे यजमानपद सिंधुदुर्ग जिल्ह्याला देण्यात आलेले आहे.

या संगितीच्या अध्यक्षस्थानी निवड झालेल्या लेखिका उर्मिला पवार यांचे बालपण कोकणात गेले. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी बराच काळ व्यतीत केलेला आहे. उर्मिला पवार यांच्या सहावं बोट (१९८८), चौथी भिंत (१९८९), हातचा एक (२००४) इ. कृतीचा कथासंग्रहात समावेश आहे. बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित कथा 'उदान' (१९८९) या भाषांतरांने त्यांना नावलौकिक प्राप्त झाला. आंबेडकरी चळवळीत स्त्रियांनी दिलेल्या योगद‍ानाविषयी 'आम्हीही इतिहास घडविला' (१९८९) या सशोधनपर लेखनाशिवाय माॅरिशस एक प्रवास (१९९४) हे प्रवासवर्णनही प्रसिद्ध आहे. आयदान (२००३) हे अ‍ात्मकथन मैलाचा दगड ठरले. या आत्मकथनाचे इंग्रजी, हिंदी, कन्नड व तेलुगू भाषेत अनुवाद झाले आहेत. 'दलित लेखिका आणि त्याचं साहित्य' (२०१०) व 'कोकणातील दलित‍ांचे रितीरिवाज आणि लोकगीते' इ. महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रसिद्ध असून यातील बहुतेक साहित्यकृतींना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आ.सो. शेवरे जीवनगौरव (२०२२) पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांची पुस्तके अभ्यासक्रमात आहेत. अकराव्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षाही होत्या.

सम्यक साहित्य कला संगितीचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणारे हिंदीतील साहित्यिक मोहनदास नैमिशराय यांची भारतीय साहित्य व कलाक्षेत्रात अजोड कामगिरी आहे. डॉ. आंबेडकर फाउंडेशन, भारत सरकार, नवी दिल्ली येथे पाच वर्षे संपादक आणि मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा आणि इतर विद्यापीठांमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणूनही काम पाहिले आहे. पत्रकारिता, रेडिओ, टेलिव्हिजन, चित्रपट, नाटक इत्यादी क्षेत्रातील लेखन आणि सादरीकरणातील त्यांचा अनुभव दांडगा आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडी, शिमला येथे फेलो म्हणून मराठी आणि हिंदी दलित नाटक या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे.

क्या मुझे खरीदोगे?,  मुक्ती पर्व, झलकारी बाई,  जखम हमारे, महानायक बाबासाहेब डॉ. आंबेडकर ( कादंबरी), आवाज , जबाव हमारा, जवाब (कथा संग्रह), सफदर एक बयान, आग और आंदोलन ( कविता संग्रह), अपने अपने पिंजरे, अदालतनामा, हॅलो कॉम्रेड (नाटक), भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर, आत्मदह, संस्कृती,  उजाले की और बढते कदम,  स्वतंत्रता संग्राम के दलित क्रांतिकारी, हिंदुत्व का दर्शन, डॉ. आंबेडकर और काश्मीर समस्या,  भारत के अग्रणी समाज सुधारक (अनुवाद), दलित उत्पीडन, विशेषांक हिंदी दलित साहित्य इत्यादी अनेक साहित्य रचना त्यांच्या प्रसिद्ध आहेत. त्यांना अनेक मानाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. हिंदी मासिक बयान चे संपादक म्हणून काम पाहत आहेत.

या संगितीमध्ये उद्घाटन सत्र, परिसंवाद, कवी संमेलन, शाहीर संमेलन, रॅप सादरीकरण, कथा अभिवाचन, नाट्य सादरीकरण, त्यावरील चर्चा, प्रकट मुलाखती व इतर अनुषंगिक कार्यक्रम असे स्वरूप आहे. शिवाय कलादालनाची निर्मिती करून चित्र प्रदर्शन, अपरान्त लेण्यांचे छायाचित्र प्रदर्शन, आयदान प्रदर्शन, डॉक्यूमेंटरी, सेल्फी पॉइंट इत्यादी गोष्टी असणार आहेत. संगितीच्या निमित्ताने अपरान्त भूमीचा आढावा घेणारी एक संदर्भ मूल्य असणारी स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार असून यातून कोकण क्षेत्राचा इतिहास आणि सांस्कृतिक लेखाजोखा मांडण्यात येणार आहे. लवकरच संगितीचे विस्तृत स्वरूप व तपशील जाहीर केले जातील.

दुसऱ्या सम्यक साहित्य कला संगितीला कोकणातील आंबेडकरी व परिवर्तनाच्या चळवळीतील साहित्यिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने सरचिटणीस सुनील हेतकर व संदेश पवार यांनी केले आहे.