पाँडिचेरीच्या सॅन रेचल गांधीने ‘मिस आफ्रिका गोल्डन वर्ल्ड २०२३’ मध्ये जिंकला दुसरा क्रमांक     


तिच्या यशाबद्दल प्रत्येकाने तिचं कौतुक केलं आणि याचं तिला आश्चर्य वाटलं! कारण आजवर तिने फक्त आणि फक्त टोमणे ऐकले होते. पण ज्यांचं म्हणणं कधी कोणी ऐकून घेत नाही, ज्यांचा आवाज तमाम जगापर्यंत कधी पोहोचत नाही अशा लोकांना तिचं यश हे आपलंच यश असल्यासारखं साजरे करताना बघून समजुतींच्या ठराविक साच्यातून स्वत:ला आणि समाजाला बाहेर काढण्यासाठी तिने जे परिश्रम घेतले याचं तिला निश्चितच सार्थक झाल्यासारखं वाटलं असेल. ती आहे सॅन रेचल गांधी. ‘मिस आफ्रिका गोल्डन वर्ल्ड २०२३’ या फक्त ‘काळ्या’ वर्णाच्या मुलींसाठी असणाऱ्या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्त्व करून ‘फर्स्ट रनर अप’चं म्हणजेच दुसऱ्या क्रमांकाची विजेती ठरलेली तामिळनाडूच्या पाँडिचेरीतील एका मध्यम वर्गीय घरातील स्वप्नाळू आणि तितकीच धाडसी २४ वर्षीय मुलगी. आपल्या लक्षात आलं असेल की सॅन रेचलने दुसऱ्या देशात जाऊन तिथे भारताचा झेंडा रोवला आहे पण याचा गवगवा एका विशिष्ट वर्तुळाच्या बाहेर आणखी कुठेही होताना दिसत नाहीये. आज यश मिळाल्यानंतर जर ही अवस्था असेल तर रंगावरून कोणाचाही निवाडा करू नका असं जगाला सांगण्यासाठी सौंदर्य स्पर्धांचा मार्ग निवडणाऱ्या सॅन रेचलची वाट किती खाच खळग्यांनी भरलेली राहिली असेल याचा फक्त विचारच केलेला बरा.




सॅन रेचल वर्णाने काळी असली तरी दक्षिण भारतात हा त्वचेचा काळेपणा सर्रास पाहायला मिळतो. मात्र सॅन या सगळ्यांपेक्षा काळी आहे. त्यामुळे लहान असल्यापासून तिला ‘नकोशी’ प्रमाणेच वागणूक मिळालेली. अशावेळी एखादी मुलगी आपला रंग उजळवण्यासाठी जे जे करते ते ते सॅनने केलं. टीव्हीवरच्या गोरेपणा म्हणजेच सौंदर्य असं अगदी ठासून सांगणाऱ्या जाहिरातींमुळे सॅन पुढे आलेल्या सर्व पर्यायांचा तिने वापर केला. पण रंग काही उजळला नाही. 

हेही वाचा - 'गोरेपणाचे' गृहीतक : एक सांस्कृतिक चूक  

तेरा – चौदा वर्षांच्या अजाणत्या वयात हा रंग कुठे नेऊन ठेऊ असा प्रचंड न्यूनगंड येऊन आत्मविश्वास हरवण्याच्या बेतात असतानाच ऐश्वर्या रायचा 'जीन्स' हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्यावेळी ऐश्वर्या रायला प्रेक्षक तिच्या नावाने नाही तर ‘मिस वर्ल्ड’ म्हणून संबोधन करीत असल्याचं सॅनने ताडलं. याचाच अर्थ आपण आपल्या यशाने आपली ओळख आपण निर्माण करू शकतो आणि आपल्या काळेपणाविषयीचा लोकांचा दृष्टीकोन बदलायचा असेल तर सौंदर्य स्पर्धा हे चांगलं माध्यम ठरू शकतं हे बरोबर हेरून त्या लहानग्या वयातच सॅनने सौंदर्य स्पर्धांचा मार्ग निवडला. पुढे जेव्हा या स्पर्धेत भाग घेण्याची वेळ आली तेव्हा वडिल आणि भावाने या निर्णयाला पाठिंबा दिला; बाकी कुणीही नाही. सौंदर्य स्पर्धांचं जगच वेगळं असतं. तिथे तू टिकू शकणार नाहीस. उगीच कशाला विषाची परीक्षा घ्या. असं म्हणून तिला टोकलं गेलं. काही काळ आपल्या स्वप्नांना तिने झाकून ठेवलं. अभ्यासात हुशार असल्यामुळे शिक्षणात आगेकूच सुरू असली तरी झाकलेली स्वप्नं मधून मधून बांग देतच होती. आपल्या स्वप्नांची वाट चोखाळण्याची सुरुवात करायचं तिने ठरवलं. 

सौंदर्य स्पर्धांची पहिली पायरी म्हणून सॅनने मॉडेलिंग सुरू केलं. अर्थातच तिथेही तिला लगेच संधी मिळाली नाही. जी मिळाली तीही ‘कमी तिथे आम्ही’ स्वरुपाची. दरम्यान, आधी आपण स्वत:ला स्वीकारलं पाहिजे तेव्हा जग आपल्याला स्वीकारेल हा दृष्टीकोन स्वीकारला. तिने स्वत:ला सौंदर्य स्पर्धांसाठी तयार केलं आणि कॉलेजमध्ये असताना कर्नाटकात होणाऱ्या सौंदर्य स्पर्धेत नुसता भागच घेतला नाही तर ती विजेती ठरली. त्यानंतर एका मागे एक तिने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. चार टायटल्स तिने जिंकले, तीन स्पर्धांमध्ये उपविजेती राहिली आणि अवघ्या आठ वर्षांच्या कारकिर्दीत सात पुरस्कार पटकावले. एवढं यश मिळवूनही सॅन रेचल ला स्वत:च्या देशातील स्पर्धांमध्ये प्रवेश दिला जात नाही. आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी अशा देशाचा आधार घ्यावा लागतो जिथे मुळातच ‘Black is Beauty’ म्हटलं जातं. पण आपली स्वप्न ज्यांना पूर्ण करायची असतात त्यांच्यासाठी ‘Sky is the limit’ असंही म्हटलं जातं.  

पाँडिचेरी या सॅनच्या होम रँपवर तिने नाव कोरलं. ‘मिस पाँडिचेरी २०२२’ हा खिताब जिंकल्यावर ‘मिस आफ्रिका गोल्डन वर्ल्ड २०२३’चे दरवाजे उघडले. यात सर्व विभागात अव्वल ठरल्यावर ३ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतील गुटेंग (Gauteng) इथं अंतिम फेरी झाली. त्यात ‘मिस सेनेगल’ किना मार्सिलीनने ही स्पर्धा जिंकली, भारताची सॅन रेचल गांधी दुसऱ्या क्रमांकाची, तर ‘मिस गिनी’ तिसऱ्या क्रमांकाची विजेती ठरली.



काळ्या रंगालाही इतर रंगाप्रमाणेच वागणूक द्या, असं वारंवार सांगणाऱ्या सॅनने काळ्या रंगालाही प्रतिष्ठा मिळू शकते हे स्वत:च्या उदाहरणाने सिद्ध केलं आहे. सॅनने तिचं स्वप्न नुसतं पूर्ण केलं नाही तर एका समजुतीच्या चौकटीला हादरे दिले आहेत. एमबीबीएसचं शिक्षण घेणारी सॅन जीवशास्त्र आणि रसायनशास्त्राचे वर्गही घेते. शिवाय ती मॉडेलिंग प्रशिक्षक म्हणजेच ‘रनवे कोच’ सुद्धा आहे. आपण घेतलेल्या अनुभवांवर आधारित ती या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या मुलींना मार्गदर्शन करतेय. एक माणूस म्हणून तिची भूमिका ती चोख पार पाडतेय. आता समाज तिच्या या माणूसपणाला त्वचेच्या रंगाची चाळणी लावून गाळूनच टाकणार असेल तर त्याला इलाज नाही. असो. सॅन रेचलला तिच्या या यशासाठी खूप खूप शुभेच्छा.     

 

विनिशा धामणकर