भारताची जवळपास ३३ टक्के जनता असलेल्या आणि देशाचं भवितव्य, भावी मतदार, भाग्यविधाते असलेल्या अठरा वर्षाखालील मुलांची कौटुंबिक, सामाजिक आणि शासकीय स्तरावर देखभाल होणं अपेक्षित असतं.
पण खरंच ती होते का? १४० कोटी लोकसंख्येच्या
या देशात ४७ कोटी २० लाख एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या मुलांना त्यांच्या
हक्काचं सर्व काही त्यांना मिळतं का? आईवडील सक्षम असोत की गरीब, आपल्या मुलांना
शाळेत घातलं की आपली जबाबदारी संपली असंच बहुतांशी मानलं जातं. फार क्वचित
त्यांच्या समस्यांवर बोललं, लिहिलं जातं. यामुळेच समाजात घडणाऱ्या अनिष्ट
गोष्टींचे सर्वात मोठे शिकार ही मुलं बनतात. बेकायदेशीररित्या होणाऱ्या अनेक अनिष्ट
गोष्टी टाळणं बरेचदा शक्य होत नाही. अशा वेळी या सगळ्याला बळी पडू शकणाऱ्या
मुलांनाच सावध करणं हा एकच उपाय असतो. अशाच मुलांना सावध करण्याचं, चांगलं काय,
वाईट काय याची मुलांना माहिती करून देण्याचं उल्लेखनीय काम मीरा भाईदर वसई विरार
पोलीस आयुक्तालयातील भाईंदरशाखेच्या ‘भरोसा कक्षा’च्या प्रभारी सहाय्यक पोलीस
निरीक्षक तेजश्री शिंदे यांनी करून दाखवलं आहे. त्यांच्या या अत्यंत महत्त्वाच्या
कार्याची दखल राज्य शासनाने घेतली आणि ‘बालसेन्ही पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव करण्यात
आला. २२ नोव्हेंबर रोजी मुंबईतील यंशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमात
बाल व हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुभीबेन शाह आणि महिला बाल विकास मंत्री
अदिती तटकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दिल्लीच्या निर्भया केसच्या न्यायाधीश उषा मेहरा
यांनी त्यांच्या निकालपत्रात मलेशिया, बांगलादेशात असलेल्या ‘वन स्टॉप क्रायसिस
सेंटर’ प्रमाणे स्त्रिया, मुलं आणि वृद्धांना एकाच छताखाली त्यांच्या सर्व समस्या
सोडवण्यासाठी एखाद्या केंद्रांची स्थापना आपल्याकडेही व्हायला हवी असं मत व्यक्त
केलं होतं. त्यावर आधारित भरोसा कक्षाची स्थापना हैदराबादमध्ये २०१७ मध्ये आणि
त्यानंतर त्याच वर्षी नागपूरमध्ये करण्यात आली. भाईंदरमध्ये भरोसा कक्षाची सुरुवात
२०२० मध्ये झाली आणि पूर्वी ‘पोलीस दीदी’ म्हणून काम केलेल्या सपोनि तेजश्री शिंदे
यांची नियुक्ती या कक्षाची प्रभारी म्हणून करण्यात आली.
एक मल्टि नोडल युनिट म्हणून काम करणाऱ्या या विश्वासार्ह कामाला अभिनव रूप देताना फक्त आपल्याकडे
येणाऱ्या केसेस वर अवलंबून न राहता सपोनि तेजश्री शिंदे यांनी लोकांमध्ये जाऊन जनजागृती
करण्याचा निर्णय घेतला आणि ‘कायद्याचे धडे’ नावाचा उपक्रम त्यांनी सुरू केला.
मुलांना अठरा वर्षे पूर्ण होण्याआधी जर कायद्याची माहिती मिळाली तर ते वेळीच सावध
होतील. सज्ञान झाल्यावर त्यांच्याकडून नकळतपणे ज्या लहानमोठ्या चुका होतात त्यामुळे
त्यांच्यावर भारतीय दंड संहितेची कलमे लागू होतु शकतात. एका चुकीमुळे त्यांचं
पूर्ण आयुष्य कायद्याच्या कचाट्यात अडकून बरबाद होऊ शकतं. त्यांच्याकडून अशा चुका होऊ
नयेत आणि कायद्याच्या बडग्याचा सामना त्यांना करावा लागू नये असा हेतू ठेवून सपोनि
तेजश्री शिंदे यांनी शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन ‘कायद्याचे धडे’ देण्याची सुरुवात
केली जे काम आजही अव्याहतपणे सुरू आहे. यात सायबर गुन्हे, बाल संरक्षण हक्क,
लैंगिक अत्याचार, अमली पदार्थांचं सेवन, ट्राफिकचे नियम याविषयी माहिती दिली जाते.
आजवर किमान ४० शाळांमध्ये झालेल्या ८० कार्यक्रमांमधून २५ हजार विद्यार्थ्यांना
त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. यात विशेष करून लैंगिक अत्याचारासाठी असलेल्या पोक्सो
कायद्याची माहिती दिली जाते. सोशल मीडिया आणि इतर माध्यमांचा परिणाम होऊन मुलं नकळत्या
वयात प्रेमात पडतात आणि त्यात नकार आला तर ते बिथरतात. तो नकार सकारात्मक पद्धतीने
सन्मानपूर्वक स्वीकारावा. चित्रपटात दाखवतात तसं कोणावर जबरदस्ती करू नये कारण
यामुळे तुम्हीच त्यात अडकाल हे त्यांना पटवून सांगणं आणि त्यासाठी असलेले कडक
कायद्याची माहिती देणं आवश्यक असतं. बरेचदा मुलांना माहितच नसतं की एखाद्या
प्रकरणात तेही आरोपी किंवा सहआरोपी होऊ शकतात. त्यामुळे या कायद्याचं गांभीर्य
त्यांना कळणं फार आवश्यक असतं.
या उपक्रमासाठी शाळेच्या परवानगीने हे जागृतीचे
कार्यक्रम केले जातात. मुलांना कायदा समजावून सांगण्यासाठी पूर्वी घडलेल्या घटना गोष्टी
स्वरुपात पीपीटीवर तयार करून त्यांचं प्रेजेन्टेशन वर्गावर्गात केलं जातं. याच
उपक्रमात मुलांशी संवाद साधल्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो आणि जर
त्यांच्या सोबत काही वाईट झालं असेल, होत असेल तर ते त्याची तक्रारही करतात. याची पोलीस
स्टेशनमध्ये रीतसर नोंद करून कारवाई केली जाते. अशा अनेक केसेस सपोनि तेजश्री
शिंदे यांनी सोडवल्या आहेत.
मुलांसोबतच स्त्रिया आणि वृद्धांना यात ‘भरोसा सेल’
मध्ये मदत केली जाते. बचत गट आणि स्त्रियांचे होणारे समारंभ अशा ठिकाणी महिलांना
मार्गदर्शन केलं जातं. अनेकदा स्त्रिया घरगुती अत्याचार सहन करत जगत असतात. आपण
बोललो तर, विरोध केला तर आपल्या डोक्यावरचं छत जाईल, आपली अन्नान दशा होईल.
मुलांना घेऊन कुठे जाणार, असे प्रश्न त्यांच्या समोर उभे असतात. पण त्या स्त्रियांच्या
घरातील ज्या व्यक्तीविषयी तक्रार असते त्यांच्याशी अत्यंत संवेदनशील पद्धतीने बोलल्याने,
चांगल्या वाईटाची जाणीव करून दिल्याने, काही वेळा कायद्याचा आधार घेऊन त्यांच्या
मनात भीती निर्माण करून त्या स्त्रीचं जीवन स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न केला
जातो. इथे फक्त स्त्रियाच नाही तर पुरुष सुद्धा आपले प्रश्न घेऊन येत असतात.
त्यांचे प्रश्न सुद्धा सामंजस्याने सोडवले जातात. या प्रयत्नांमुळेच अनेक कुटुंबे मोडण्यापासून,
विखुरण्यापासून सावरली आहेत.
अशाच प्रकारे वृद्धांच्या बाबतीतही होते. अनेकदा
मुलं आपल्या वयस्कर आईवडिलांना घराबाहेर काढतात किंवा त्यांच्या मालमत्तेवर बेकायदेशीर
रित्या कब्जा करतात. त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी भरोसा सेल काम करतं.
त्यासोबत वृद्ध आणि महिलांना आजारपणात उपचारासाठी योग्य मार्गदर्शन केलं जातं. दर
महिन्याला मुलं, स्त्रिया, पुरुष आणि वृद्ध मिळून ४० ते ४५ केसेस त्यांच्याकडे येत
असतात. आजवर अशा केसेसचा सक्सेस रेट हा ७५ टक्के आहे.
घरगुती समस्यांसोबातच एखादा खटला न्यायालयात दाखल
करण्याचा विचार जर कोणी करत असेल तर त्यातील कायदेशीर मुद्दे, बारीकसारीक बाबी आणि या कारवाई दरम्यान ज्या समस्या उद्भवू शकतात त्या देखील
अपीलकर्त्यांना समजावून सांगितल्या जातात. या समस्यांचं कोर्टाच्या बाहेरच निराकरण
करण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यामुळे कोर्टाचा आणि त्या अपीलकर्त्याचा वेळ आणि
पैसाही वाचतो.
हे सर्व करत असताना त्या त्या समुदायाचे लोक ‘आमच्या
बाबतीत ढवळाढवळ करू नका असं म्हणण्याची शक्यता असते. पण सपोनि तेजश्री शिंदेंकडे विविध
समुदायाचे लोक स्वत: काही केसेस घेऊन येतात आणि त्यात लक्ष घालण्यास सांगतात.
त्यामुळे या भरोसेमंद सेलचा आधारच जनसामान्यांना वाटत असतो.
आजवर मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या अखत्यारीत
येणाऱ्या अनेक तक्रारी यशस्वी रित्या सपोनि तेजश्री शिंदे यांनी हाताळल्या आहेत. एखाद्या
प्रकरणात कोर्टाची पायरी न चढता केवळ समुपदेशनाने आणि संवादाने भांडणं मिटवून अनेक
संसार तारले आहेत. यात सामाजिक संघटना, बचत गट यांचं सहकार्यही त्यांना लाभलं आहे.
ह्या कम्युनिटी पोलिसिंगमुळे समाजात स्थैर्य आणण्याच्या प्रयत्नांमुळेचा सपोनि
तेजश्री शिंदे राज्य शासनाच्या ‘बालस्नेही पुरस्कारा’च्या मानकरी ठरल्या आहेत. भरोसा
कक्षाच्या या भरोसेमंद रक्षकास मानाचा सल्युट....
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.